डीएड ऐवजी बीएड नवी शिक्षणपद्धती

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आता शिक्षक होण्यासाठी बीएड करणे बंधनकारक असणार आहे. त्‍यामुळे डीएड आता कायमचे बंद होणार आहे. सध्याच्या शैक्षणिक पद्धतीनुसार जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक विभागाचे शिक्षक होण्यासाठी बारावीनंतर दोन वर्षाचे डीएड करावे लागते. तर माध्यमिक-उच्च माध्यमिक शाळांवरील शिक्षकांसाठी ‘बीएड’ बंधनकारक आहे. बारावीनंतर चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमात शिक्षणशास्त्र विषय घेऊन विद्यार्थ्यांना 'बीएड'च करावे लागणार आहे. विद्यार्थ्यांना चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर शेवटच्या सेमिस्टरला ज्या क्षेत्रात आवड आहे, त्यास त्यासंबंधीची सहा महिने ॲप्रेटायशेन, इंटर्नशिप करावी लागेल. त्यानंतर विद्यार्थी नोकरी करण्यासाठी पूर्णपणे तयार होतील. बारावीनंतर नव्याने पदवीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा पॅटर्न लागू असणार आहे. सध्या शिकत असलेल्यांना हा पॅटर्न लागू असणार नाही. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी सात वर्षांचा काळ विद्यार्थ्यांना देण्यात आला आहे. कोणत्या विषयाचे शिक्षक व्हायचे यानुसार विद्यार्थ्यांना विषय निवडण्यास वाव मिळणार आहे. मात्र शासनाच्‍या या निर्णयामुळे प्राथमिक शिक्षक सहजासहजी मिळणे कठीण होणार आहे. यापूर्वी डीएड अभ्‍यासक्रम पूर्ण केलेल्‍या शिक्षकांची भरती मोठया प्रमाणावर व्‍हायची. मात्र आता चार वर्षांच्‍या डीग्री कोर्सकडे विदयार्थी वळणे मुश्‍कील असल्‍यामुळे नव्‍या शिक्षकांची निर्मिती गोठणार आहे. करीअरची चार वर्षे खर्ची करुन शिक्षकी पेशा पत्‍करण्‍यापेक्षा अभियांत्रिकी व वैदयकीय अभ्‍यासक्रमांकडे विदयार्थी अधिक प्रमाणात वळण्‍याची शक्‍यता आहे. डीएड करुन शिक्षक होणे सहजसोपे व कमी खर्चिक मानले जात होते. त्‍यामुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्‍य व गरीब कुटुंबातील शिक्षीत विदयार्थ्‍यांचा ओढा डीएड कडे अधिक होता. त्‍यामुळे सर्वसामान्‍य कुटुंबांतील अनेक मुले पूर्वी डीएड शिक्षक म्‍हणून नोकरीला लागलेली आहेत. यात मुलींचा समावेश अधिक प्रमाणात होता. आता अशा मुलांना चार वर्षांचा पदवी अभ्‍यासक्रम पूर्ण करणे खर्चिक व जिकीरीचे ठरणार आहे. तसेच शिक्षण क्षेत्रात कंत्राटी पध्‍दतीमुळे अगोदरच डीएड, बीएड उमेदवार मेटाकुटीला आलेले आहेत. त्‍यात आता ही नवी शैक्षणिक पध्‍दत, शिक्षक बनू इच्‍छीणा-या विदयार्थ्‍यांसाठी टेन्‍शन वाढवणारी आहे.         


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त