भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना १३२व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
- Get link
- X
- Other Apps
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या देशाला लाभलेले असामान्य व्यक्तिमत्व. भारतीय राज्यघटना ज्यांनी आपल्या कुशाग्र बुध्दीमत्तेच्या जोरावर लिहीली व जीचे आजदेखील आपण विनयशिलतेने पालन करतो त्या राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म वडील रामजी व माता भीमाबाई यांच्या पोटी १४ एप्रिल १८९१ रोजी झाला. आपल्या देशात अनेक थोर पुरुषांनी जन्म घेतला. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यापासुन सामाजिक कार्यात स्वतःला वाहून घेतलेल्या अनेक महापुरुषांची नावे घेता येतील. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या देशाला लाभलेले एक रत्नच. डॉ. बाबासाहेब उर्फ भीमराव यांचे वडील रामजी आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून दक्ष असत, त्यांना चांगली पुस्तके वाचावयास आणून देत. त्यामुळेच बाबासाहेबांच्या आयुष्याच्या अंतिम क्षणापावेतो वाचनाची व अभ्यासपूर्ण चिंतनाची सवय त्याच्या ठायी आढळते. डॉ. बाबासाहेब म्हणजे अष्टपैलू व्यक्तीमत्व होते. त्यांना प्रत्येक क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान व माहिती होती. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक धार्मिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या अमोघ वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीन, दलितांच्या, श्रमिकांच्या विस्थापितांच्या, शोषितांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नुसते पुस्तकी पंडित नव्हते तर त्यांनी आपल्या आयुष्यात आचार आणि विचार यांची सांगड घातली आणि आपल्या तत्वज्ञानाला कृतीची जोड दिली. त्यांनी मनुष्य मात्रांच्या जीवनातील दुःख, दारिद्रय आणि क्लेश दूर करण्यासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले पूरे ज्ञान माहिती व बळ लावले आणि रंजल्या गांजल्या जनतेच्या तसेच स्त्री वर्गाच्या शेतकरी, मजूर वर्गाच्या आणि दलितांच्या उद्धारार्थ आपले प्राण पणाला लावून मानवतेची दिव्य ज्योत निर्माण केली. त्यामुळेच ही व्यक्ती केवळ वंदनीय नव्हे तर ती व्यक्ती प्रेरक, उद्धारक व तारक शक्ती आहे. अत्यंत सत्यप्रिय असणा-या बाबासाहेबांना भ्रष्टाचार, अनीति, अत्याचार, अन्याय यांचा प्रखर तिरस्कार होता. जातीभेद म्हणजे समाजाला लागलेली किड असे ते मानत असत. ही सामाजिक किड नष्ट केल्याशिवाय समाज एकसंघ होणार नाही असे ते समजत त्यामुळेच तळागळातील लोकांना बौद्धिक व समाजिक गुलामगिरीतून मुक्त करण्याचा त्यांचा संकल्प होता. शिकल्याशिवाय आपल्यावरील न्याय, अन्याय, आपले हक्क ही आपल्याला कळत नाही ही शिकवण देत सामाजिक क्रांतीचे रणशिंग समाजात फुंकले. स्त्रियांना पुरुषांप्रमाणे समान हक्क मिळावेत यासाठी त्यांनी अनेक चळवळी केल्या. १९२७ ते १९५६ पर्यंतच्या काळात बाबासाहेबांनी भारतीय स्त्रीचा सामाजिक, कायदेशीर आणि राजकीय दर्जा, वाढावा म्हणून सतत प्रयत्न केला. दलितांना सन्मानाचे जीवन जगता यावे म्हणून ते सातत्याने संघर्ष करीत राहीले. केवळ दलितासाठीच नव्हे तर शेतकरी व मजूर यांच्या प्रश्नासंबंधीही त्यांनी जोरदार लढा दिला.
जगभरातील ६५ पेक्षा अधिक देशांत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हर्षात साजरी केली जाते. दादर येथील चैत्यभूमीवर लाखो अनुयायी या महामानवाला अभिवादन करण्यासाठी एकत्र येतात. बाबासाहेबांच्या १४ एप्रिल या जन्मदिवशी प्रत्येक वर्षी त्यांचे लक्षावधी अनुयायी नागपूरातील दीक्षास्थळ, दीक्षाभूमी येथेदेखील त्यांना अभिवादन करण्यासाठी एकत्र येतात. याच दिक्षाभुमीविषयी थोडेसे जाणून घेऊ या. नागपूर शहर व संपूर्ण महाराष्ट्रातील एक महत्वपूर्ण स्थान म्हणजे दीक्षाभूमी. रामदास पेठेजवळ व माताकचेरी परिसरासमोर उपराजधानी नागपूर मध्ये स्थित हे ठिकाण आहे. याला धम्म चक्र स्तूप असेही म्हटले जाते. दरवर्षी लाखो भीम अनुयायी व पर्यटक या ठिकाणाला भेट देत असतात. विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशधन कालावधीत मीदेखील दरवर्षी दिक्षाभुमीला आवर्जून भेट देतो. अत्यंत शांत, अचल व मनशक्ती वाढवणारे हे ठिकाण आहे. बाजूला अगदी विस्तीर्ण मैदान, बोधिवृक्ष व आकर्षक प्रवेशद्वार यामुळे दिक्षाभूमीचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. दीक्षा भूमी हे बौद्ध धर्माचे अतिशय महत्वाचे ठिकाण आहे. १४ ऑक्टोबर १९५६ मध्ये डॉ. भीमराव रामजी (बाबासाहेब) आंबेडकरांनी लाखो दलित लोकांसह याच जागेवर बुद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. एकाच दिवशी तेही शांततेच्या मार्गाने घडून आलेले जगाच्या इतिहासातील हे पहिलेच धर्मांतर होते. दरवर्षी या दिवशी लाखो लोक इथे जमा होतात आणि हा दिवस मोठ्या उत्साहानी साजरा करतात. दीक्षा भूमीचा विस्तार मोठा आहे, कलेचा एक उत्तम नमुना आपल्याला इथे पाहायला मिळतो. दीक्षा भूमीच्या बांधकामासाठी ५००० लोकांनी अहोरात्र परिश्रम घेतले आहे. याच्या बांधकामासाठी धौलपूर इथून आणलेल्या मार्बल आणि ग्रेनाइट चा वापर केलेला आहे. दीक्षा भूमीचा डोम हा १२० फूट उंचीचा आहे. दीक्षाभूमीचा आकार हा एका भव्य बौद्ध स्तुपाप्रमाणे आहे, म्हणून याला 'धम्मचक्र स्तूप' असेही म्हटले जाते. भारतातील व विदेशातील, मुख्यत्वे जपान, जर्मनी, म्यानमार, श्रीलंका येथील अनेक अनुयायी व प्रसिद्ध व्यक्ती या स्थळास भेट असतात. यात बौद्ध उपासक व भिखु अधिक असतात. सम्राट अशोकांनी इसवी सन पूर्व तिसऱ्या कलिंग युद्धानंतर बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. आणि म्हणून बौद्ध इतिहासात हा दिवस अशोक विजयादशमी म्हणून साजरा केला जातो. या स्थळाला राज्य सरकारने अ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा दिलेला असून दरवर्षी येथे पंचवीस लाखापेक्षा अधिक देशी, विदेशी बौद्ध अनुयायी व पर्यटक भेट देत असतात. नागपूर शहराच्या केंद्रस्थानी असलेले हे स्थळ मनःशांतीचे उत्तम ठिकाण आहे.
डॉ. बाबासाहेबांची शिकवण व त्यांचे कार्य आज देशाला आदर्शवत व मार्गदर्शक असुन त्यांच्या नावावे जगभरात उभ्या राहिलेल्या शैक्षणिक व सामाजिक संस्था तसेच वास्तू त्यांच्या कार्याची साक्ष आपल्याला वेळोवेळी देत असतात. त्यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही या विश्वाला मिळालेली महान देणगीच आहे. डॉ बाबासाहेबांच्या विचारातून निर्माण झालेला निखारा घेऊन तरुण पिढीने अन्यायाने गांजलेल्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी घटनेच्या बळावर पुढाकार घ्यायला हवा. डॉ बाबासाहेबांनी दाखवलेला मार्ग केवळ दलितच नव्हे तर समस्त देशवासीयांना विकास व उध्दाराचा मार्ग खुला करणारा आहे. त्यामुळे तरुणांनी या चळवळीत हिरीरीने सहभाग घेऊन आदर्श राष्ट्रासाठी प्रयत्न करायला हवेत.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
मोबाईल ९८१९११२८८५
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment