उष्णतेचा अंदाज न आल्याने दुर्घटना

रविवारचा दिवस असल्याने १६ एप्रिल रोजी मीदेखील सकाळी दहाच्या सुमारास खारघर येथे होत असलेल्या 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार सोहळ्यासाठी जाण्यास निघालो होतो. परमपूज्य अप्पासाहेब धर्माधिकारी यांना हा पुरस्कार मिळणार असल्याने ह्या भव्यदिव्य सोहळ्याची उत्सुकता लाखो श्री सदस्यांसारखी मलाही होती. त्यामुळे घरापासून फारसे अंतर नसलेल्या सोहळ्यास्थळी जाऊ म्हणून घराबाहेर पडलो. मात्र त्या दिवशी उन्हाच्या झळा पाहून पुन्हा माघारी फिरलो. तळपता सूर्य त्या दिवशी अक्षरशः आग ओकत होता व त्या काहिलीने कुठे बाहेर जाण्याची इच्छा उरली नाही. त्यानंतर टीव्हीवरच हा संपूर्ण दिमाखदार सोहळा पाहिला. यात व्यासपीठावरील जवळपास सर्वच मान्यवरांनी प्रचंड संख्येने जमलेल्या जनसमुदायाचा उल्लेख केला. भरगच्च मैदान, मैदानाबाहेरील रस्ता व रस्त्याच्या पुढील मैदानदेखील गर्दीने भरल्याचे आवर्जून नमूद केले. मैदानावरील गर्दीचे नियोजन व इतर व्यवस्था अगदी चोखरीत्या केली गेली होती. मात्र डोक्यावरील ऊन असह्य होत होते. रखरखत्या उन्हात पुरस्कार सोहळा पार पडला, मात्र त्यानंतर अनेक श्री सदस्यांना उष्माघाताचा त्रास होऊ लागल्याने रुग्णालयांत दाखल करावे लागले. त्यात १३ लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. खरेतर इतके भव्य नियोजन व व्यवस्था केलेली असताना उन्हाचा अंदाज बांधणे फार अवघड मुळीच नव्हते. कारण मागील आठवडाभर या भागांत उन्हाचा ज्वर परमोच्च स्थानी होता. त्यात मंडप वगैरेसारखी व्यवस्थाही सहज करता आली असती. श्री सदस्यांचा परिवार मोठा आहे व त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमास हा संपूर्ण परिवार आवर्जून शिस्तबद्ध पद्धतीने उपस्थिती लावतो. त्यामुळे इतक्या मोठया प्रमाणावर लोक कार्यक्रमास येतील हे निश्चित व अपेक्षितच होते. त्यामुळे या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी तीन चार दिवस आधीपासूनच वरिष्ठ स्तरावर दररोज बैठकांची सत्रे सुरू होती. अगदी बारीक बारीक गोष्टींचा विचार करून नियोजन केले जात होते. सरकारी कार्यक्रम असल्याने निधीची उणीव नव्हतीच. मोठया प्रमाणावर सरकारी यंत्रणा या नियोजनामध्ये उतरल्या होत्या. असे असताना त्यांना होणाऱ्या उष्णतेच्या त्रासाचा विचार केला गेला नाही व हा दुर्दैवी प्रकार घडला. वास्तविक हे टाळता आले असते. उन्हाची काहिली पाहता कार्यक्रमाची वेळ सायंकाळची करणे क्रमप्राप्त होते. सभामंडप उभारता आला असता. त्यात पंखे, कुलरची व्यवस्था करणे गरजेचे होते. एखाद्या भल्यामोठ्या शाळेचे वा विद्यापीठाचे मैदान व वर्ग खोल्यांमध्ये टीव्ही स्क्रीन बसवुनदेखील कार्यक्रमाचे नियोजन करता आले असते. मर्यादित स्वरूपात व रुग्ण, वृद्ध, महिला यांना टाळूनही कार्यक्रम घेता आला असता. मात्र वातावरणाचा चुकलेला अंदाज व चुकलेली वेळ यामुळे एका नियोजनबद्ध कार्यक्रम करण्याच्या प्रयत्नांना गालबोट लागले व पुरस्कार प्रदानाचा आनंद क्षणात विरला. मात्र त्यानंतर राजकीय पक्षांमध्ये सुरू झालेले राजकारण निश्चितच योग्य नाही. या राजकारणामुळे गेलेल्या लोकांचा जीव परत येणार नाही मात्र या कार्यक्रमाच्या निमित्ताने भविष्यात एखाद्या मोठ्या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या दर्शकांना केंद्रस्थानी ठेवून योग्य नियोजनाची अपेक्षा आहे जेणेकरून संभाव्य दुर्घटनांमध्ये होणारी जीवितहानी टाळता येईल. 




वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त