२५ एप्रिल - जागतिक हिवताप दिन
२५ एप्रिल - जागतिक हिवताप दिन
आज २५ एप्रिल २०२३. २५ एप्रिल हा दिवस सर्वत्र जागतिक हिवताप दिन म्हणून साजरा केला जातो. डासांच्या उपद्रवामुळे निर्माण होणारा हिवताप हा आपल्याला ज्ञात असलेला खूप जूना आजार आहे. हा रोग मानवी वसाहतींच्या काळाइतका पुरातन आहे. हिवताप हा मानवास फार पुर्वीपासून माहिती असलेल्या रोगांपैकी एक रोग आहे. मानवाची आणि हिवतापाची उत्क्रांती एकाच वेळी झाली असावी. ज्यामुळे लाखो वर्षापासून मानवाला या आजाराची माहिती आहे. मोठया प्रमाणात आर्थिक आणि जीवितहानी करणारा हा आजार असल्याने सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने ही एक गंभीर समस्या आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या वेळी देशात हिवतापाचे वार्षिक प्रमाण सुमारे ७.५ कोटी रुग्ण व ८ लाख मृत्यू एवढे होते. प्लाझामोडीयम प्रजातीच्या एकपेशीय सूक्ष्म परजीवी जंतूंचा संसर्ग झाल्याने हिवताप होतो आणि त्याचा प्रसार काही विशिष्ट जातीच्या अॅनाफीलिस मादीमुळे होतो. भारतात आढळणा-या अॅनाफीलिसच्या सुमारे ५८ जातीपैकी केवळ काही हिवतापाच्या प्रमुख प्रसारक समजल्या जातात. ग्रामीण भागात अॅनॉफीलिस क्युलेसिफेसीस व शहरी भागात अॅनाफीलिस स्टिफेन्सी हे अतिशय महत्वाचे रोगवाहक डास आहेत. मानवाला प्लासमोडीयम व्हायव्हॅक्स, प्लासमोडीयम फॅल्सीपॅरम, प्लासमोडीयम मलेरी व प्लासमोडीयम ओव्हेल या चार परजीवीमुळे हिवताप होतो. हिवताप परजीवी २ जीवनचक्रात वाढतो. मानवी शरीरातील जीवनचक्र (अलैंगिक) आणि डासांच्या शरीरातील जीवनचक्र (लैंगिक) अशी ती २ जीवनचक्रे आहेत. वय, लिंग, वंश, गरोदरपण, लोकांचे स्थलांतर, माणसांच्या सवयी, व्यवसाय इत्यादी घटक हिवताप प्रसारास कारणीभूत ठरतात. हिवतापाची लागण केवळ अॅनाफीलिस डासांच्या मादीपासून होते. हिवतापाच्या प्रसारास डास घनता, डासांचे आयुष्यमान, राहण्याच्या सवयी, अंडी घालण्याच्या सवयी, किटकनाशकास प्रतिकार इत्यादी बाबी कारणीभूत आहेत. भारताच्या बहुतांश भागात हिवताप हा विशिष्ट ऋतूत होणारा आहे. या आजारांचे जास्तीत जास्त प्रमाण जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत आढळते. तापमान आर्द्रता पर्जन्यमान,सांडपाण्याचे नियोजन इत्यादी बाबी हिवताप प्रसारास कारणीभूत ठरतात. हिवतापाचा प्रसार काही विशिष्ट जातीच्या दूषित अॅनाफीलिस मादी चावल्यामुळे होतो. त्वचेव्दारे, स्नायुव्दारे आणि शिरेव्दारे देण्यात येणा-या रक्त अथवा प्लाझमामुळे अपघाताने हिवताप लादला जाऊ शकतो. दूषित मातेकडून नवजात अर्भकास जन्मजात हिवताप होऊ शकतो. परजीवीच्या प्रजातीनुसार अधिशयन काळात बदल होतो. सर्वसाधारणपणे परजीवीचा शरीरात शिरकाव झाल्यापासून सुमारे १४ ते १५ दिवसात रोगांची प्राथमिक वैदयकिय चिन्हे व लक्षणे दिसू लागतात. सामान्यतः हिवताप आजारात थंड अवस्था, उष्ण अवस्था आणि घाम येण्याची अवस्था या तीन अवस्था असतात. या अवस्थानंतर लक्षण विरहीत अवस्था असून त्यामध्ये रुग्णाला आराम वाटू लागतो. थंड अवस्थेत थकवा, डोकेदुखी, मळमळ, थंडी वाजणे आणि त्यानंतर हुडहुडी भरणे अशी लक्षणे दिसतात. ताप त्वरेने वाढत जातो, तीव्र स्वरुपाची डोकेदुखी आणि उलटया होणे ही सर्वसाधारण लक्षणे दिसतात. उष्ण अवस्थेत शरीराचे तापमान खूप वाढते तसेच त्वचेस स्पर्श केल्यास त्वचा गरम व कोरडी भासते. मात्र् उलटया नाहीशा होतात. घाम येण्याची अवस्थेत भरपूर घाम येऊन ताप कमी होतो. तापमान त्वरेने कमी होऊन त्वचा थंड पडते आणि घामेजते. हिवतापाचे निदान सर्वसाधारणपणे रक्तनमून्यांची सूक्ष्मदर्शक यंत्राव्दारे तपासणी करुन किंवा अॅन्टीजेन युक्त आर.डी.के.चा वापर करुन केले जाते. सर्वसाधारणपणे रक्तनमून्यांतील हिवताप परजीवी शोधण्यासाठी सूक्ष्मदर्शक यंत्राव्दारे तपासणी करण्याची पध्दत वापरली जाते. औषधोपचार, डासांवर नियंत्रण आणि डासांच्या चावण्यापासून बचाव करणे ही हिवताप रोखण्याची त्रिसुत्री आहे. शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने मोठया प्रमााणावर जनजागृती उपक्रम या आजाराच्या नियंत्रणासाठी हाती घेण्यात येत आहेत. हिवतापाचा प्रादुर्भाव यशस्वीरित्या कमी करण्यासाठी नियंत्रणात्मक उपाययोजनांचे बाबत जनतेत जागृती निर्माण करण्यात येत आहे. हिवतापाचे निदान त्वरीत ओळखल्यास या रोगाने होणारे मृत्यू टाळता येऊ शकतात. साचलेल्या पाणी साठयाबाबत घ्यावयाची खबरदारी, उदा. पाण्याच्या साठ्यांमध्ये गप्पीमासे सोडल्याने डासांकरीता आदर्श अशा डासोत्पत्ती स्थानांत डासोत्पत्त्ती रोखली गेल्याने हिवतापाचा प्रसार आणि पर्यायाने जोखीम कमी करण्यास मदत होते. केंद्र शासनाच्या समन्वयाने राज्यात राष्ट्रीय हिवताप नियंत्रण कार्यक्रम राबविला जात असुन ग्रामीण तसेच शहरी भागात हिवतापाचे नियंत्रण करणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. याकरिता शहरी व ग्रामीण भागात हिवताप नियंत्रणाचे काम आरोग्य यंत्रणांमार्फत राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत शहरी भागात अळीनाशक फवारणी, हिवताप रुग्ण शोधून त्यांच्यावर समूळ उपचार करणे. यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. शक्य त्या सर्व उपाययोजना अमलात आणून कीटकजन्य आजाराचा प्रादुर्भाव कमी करून प्रसार रोखणे, हिवतापाने होणारे मृत्यू रोखणे, हिवतापाचा प्रादुर्भाव व प्रसार कमी करणे ही या कार्यक्रमाची मुख्य उददीष्टे आहेत. कीटक नियंत्रणासाठी डासांची उत्पत्ती रोखणे, अळीनाशकाचा वापर करणे, अळीभक्षक गप्पीमासे व वापर करणे, कीटकनाशक फवारणी, किरकोळ अभियांत्रिकीद्वारे डासांची उत्पत्ती कमी करणे, कीटक नियंत्रणासाठी कायदेशीर उपाययोजनांची अंमलबजावणी करणे, नागरी कायद्याचा वापर करून घरगुती, सरकारी, व्यापारी, इमारती इत्यादी ठिकाणी होणाऱ्या डासोत्पत्तीवर नियंत्रण ठेवणे, नाले, तळी, तलाव, इत्यादी ठिकाणी अळीनाशकाचा वापर करणे, गप्पीमासे सोडणे या उपायांचा अवलंब केला जातो. हिवतापापासून स्वसंरक्षण करण्यासाठी मच्छरदाणीचा वापर करावा, दारे खिडक्या सायंकाळच्या वेळी बंद वा जाळीदार अवस्थेत असाव्यात, अंगभर कपडे परिधान करावेत जेणेकरून हा आजार पसरवणाऱ्या डासांचा उपद्रव होणार नाही. कीटकजन्य आजाराला आळा घालण्याच्या दृष्टीने आरोग्य विभागामध्ये राबवण्यात आलेल्या हिवताप नियंत्रण मोहिमेमुळे गेल्या काही वर्षात हिवतापाच्या रुग्णसंख्येत घट झालेली असुन हिवतापाचे समुळ उच्चाटन होण्यासाठी सर्व स्तरांतून व्यापक प्रयत्न अपेक्षित आहेत.
Comments
Post a Comment