लोकलच्या सामान्य डब्यांमध्येही हवे महिलांना सिटचे आरक्षण

परवा सकाळी नेहमीप्रमाणे वाशीवरून सीएसटी लोकल पकडली. रोजच्याप्रमाणे पनवेलवरून आलेली ती लोकल प्रवाशांनी खचाखच भरलेली होती. त्यात एका लहानग्या मुलाला घेऊन एक जोडपे गाडीत चढले. दरवाजातून आत शिरायलाही जागा नाही अशा परिस्थितीत त्या महिलेचे व मुलाचे प्रचंड हाल झाले. आत सीटपर्यंत पोहोचल्यावर संवेदनशील प्रवाशांनी त्यांना बसायला जागा दिली हा भाग वेगळा. मात्र सर्वसामान्य डब्यांमध्ये महिलांचे होणारे हाल काही नवीन नाहीत. त्यात सामान्य वर्गामध्ये आरक्षित सीट नसल्याने अनेकदा महिलांना उभे राहूनच प्रवास करावा लागतो. महिला प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे महिला आरक्षित डबे आधीच कमी पडायला लागलेत. त्यामुळे अनेक महिला सामान्य डब्यांमध्ये प्रवास करताना दिसतात. त्यात कुटुंबासह प्रवास करणाऱ्या महिलांची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळे लोकल रेल्वे डब्यांमध्ये जेष्ठ नागरिकांच्या धर्तीवर काही जागा महिलांसाठी आरक्षित ठेवायला हव्यात जेणेकरून काही अपरिहार्य कारणास्तव सर्वसामान्य डब्यांमधून प्रवास करणाऱ्या महिलांची कुचंबणा होणार नाही. ज्यावेळी महिला प्रवाशी ह्या डब्यांमध्ये चढतील त्या वेळी पुरुष प्रवाशी त्यांना ह्या आरक्षित सीट उपलब्ध करून देतील व बसायला जागा मिळण्यासाठी महिला प्रवाशांना इतर सहप्रवाशांवर विसंबून राहावे लागणार नाही व त्यांचा प्रवासही सुखकर होईल. 




वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त