आठवण बाबांची
- Get link
- X
- Other Apps
By
vaibhavpatil
-
प्रिय बाबा,
वयाच्या ९६व्या वर्षी तुम्ही आम्हाला सोडून गेलात. मात्र तुमच्या आठवणी कायमच्या आमच्या मनात घर करून आहेत. बालपणातील सर्वात जास्त काळ मी तुमच्या सोबत राहिलो. ८०च्या दशकात गावात थाटलेल्या किराणा दुकानाच्या जोरावर तुम्ही भल्यामोठया कुटुंबाचा गाडा हाकलात आणि मोठ्या कष्टाने शेतीही कसलीत. ४ मुली आणि २ मुले असा कुटुंब कबिला असणारे तुम्ही कमालीचे करारी जीवन जगलात. मुलांना पायावर उभे राहण्याइतके चांगले शिक्षण तर दिलेच मात्र आम्हा नातवंडांवरदेखील निर्मळ व निरपेक्ष प्रेम केलेत. हिशोबाला अगदी काटेकोर असणारे तुम्ही आम्हा नातवंडांसाठी अत्यंत प्रेमळ व दिलदार व्यक्तिमत्व होतात. दिवाळीला फटाक्यांपासून शाळेची वह्यापुस्तके खरेदी करून देण्यामध्ये तुम्ही कधीही काटकसर केली नाही. कॉलेजला जाण्यासाठी मला भिवंडीवरून तुम्ही विकत आणलेली सायकल अजूनही माझ्या डोळ्यासमोरून जात नाही. मात्र प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवुन तुम्ही तुमचा व्यवहारीपणा कायम जपलात. व्यवहारीपणासोबत तुम्ही संपूर्ण कुटुंबाला संस्कारदेखील दिले. त्यामुळे मन कधीही चुकीच्या गोष्टींकडे भरकटले नाही. तुमच्या अस्तित्वाने आपले अख्खे कुटुंब नेहमीच एकसंघ राहिले. ९३व्या वर्षपूर्तीनिमित्त तुमचा वाढदिवस सोहळा संपूर्ण कुटुंबाने एकत्रितपणे गावी मोठ्या जल्लोषात साजरा केला. तुमच्यानंतर आईनेही (आजी) काही वर्षांतच सर्वांचा निरोप घेतला. तुम्ही घातलेले संस्कार, शिकवण आणि आयुष्य जगण्याचा दाखवलेला मार्ग आम्ही कदापि विसरू शकणार नाही. तुमची उणीव आज आपल्या कुटुंबात प्रकर्षाने जाणवते.
तुमचा नातू
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
मोबाईल ९८१९११२८८५
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment