आरोग्य विभागातील अधीक्षक श्री राजेश भंकाळ सेवानिवृत्त

आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या खरेदी कक्षात अधीक्षक या पदावर कार्यरत असलेले आमचे कार्यालयीन सहकारी व मित्र श्री राजेशजी भंकाळ हे नियत वयोमानानुसार ३१ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर २८ एप्रिल रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्ताने त्यांचा दिमाखदार सेवानिवृत्ती समारंभ शुक्रवारी आरोग्य भवनात आयोजित करण्यात आला. कौटुंबिक, मित्रमंडळी व कार्यालयीन अधिकारी सहकाऱ्यांच्या गोतावळ्यात पार पडलेला हा समारंभ जितका खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला तितकाच भावनिक देखील झाला. कर्मचाऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागातून आयोजित केलेला व मी पाहिलेल्या आजवरच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमांपैकी एक सर्वोत्कृष्ट असा हा सोहळा होता. वडिलांच्या सेवानिवृत्तीवेळी मुलाची उपस्थिती सामान्य आहे पण मुलाच्या सेवानिवृत्तीप्रसंगी त्यांचे वडील श्री अनंत भंकाळ हे स्वतः उपस्थित राहून मुलाबद्दल अभिमानास्पद भाषण करण्याचे चित्र मी पहिल्यांदाच पाहिले. त्याचप्रमाणे अनेक कर्मचारी व मित्र श्री भंकाळ यांच्या सौहार्दपूर्ण, मदतीच्या, मैत्रीला जागणाऱ्या व दिलदार वृत्तीबद्दल भावनिक होत व्यक्त झाले. त्यांनी अनेकांचे संसार, घरे, मुलांचे शिक्षण व करिअर उभारण्यात त्यांचा अमूलाग्र वाटा विषद केला. त्यांच्या स्वभावाला असलेली सामाजिक जाणिवेची किनारदेखील यानिमित्ताने उलगडली. त्यामुळे हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने श्री भंकाळ यांच्या आजवरच्या कारकिर्दीला उजाळा देणारा ठरला. खरेतर असे प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, मैत्री, आदर, एकनिष्ठता फार कमी लोकांना मिळते. त्याबद्दल श्री राजेशजी खूप भाग्यवान आहेत. राजेशजी भंकाळ हे आरोग्य विभागातील एक अत्यंत जेष्ठ, अनुभवी, संवेदशील व आपल्या विषयातील अत्यंत जाणकार म्हणून ओळख असलेले व्यक्तिमत्त्व. खरेदीसारख्या किचकट कक्षामध्ये अनेक वर्षांपासून काम करत असताना कर्मचारी संघटनेचे कार्यदेखील तितक्याच उत्साहाने करताना ते दिसले. कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर त्यांनी प्रशासनासोबत समन्वयाची भूमिका घेत मार्ग काढला. गेली अनेक वर्षे त्यांच्यासोबत काम केल्याने त्यांचा स्वभाव, गुणविशेष याची थोडीफार जाणीव आहे. राजेश भंकाळ हे कार्यालय व कार्यालयातील बहुतांश कर्मचार्यांशी भावनिक नाळ जुळलेले नाव. अनेकांना त्यांच्या अडचणीच्या व कठीण समयी तन मन धनाने केलेल्या मदतीमुळे एक संवेदनशील व भक्कम पाठीराखा म्हणून त्यांची ओळख आहे. एखाद्याला वैयक्तिक पातळीवर केलेले सहकार्य असो की एखाद्या सार्वजनिक उपक्रमात सक्रिय सहभाग घेत सर्वतोपरी दिलेले योगदान असो सर्वच बाबतीत त्यांचा सहभाग दखल घेण्याजोगा राहिला. नुकत्याच कार्यालयांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धा यशस्वी करण्यामागे त्यांचे योगदान लपून राहिले नाही. सेवानिवृत्ती होत असली तरी त्यांचा काम करण्याचा उत्साह दांडगा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून खरेदीसारखी किचकट बाब सांभाळताना त्यांनी आपल्याला मिळालेल्या पदाला आणि कामाला पुरेपूर न्याय दिला. त्यामुळेच विभागातील वरिष्ठांच्यादेखील ते विश्वासातील आहेत. खरेदी कक्षातील प्रशासकीय अधिकारी पदाचा कार्यभार देखील त्यांनी सक्षमपणे सांभाळला. आज ते शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होत असले तरी यापुढेही सातत्याने ते इतरांच्या अडीअडचणीत ठामपणे उभे राहून आपली संवेदनशीलता जोपासतील याची खात्री वाटते. कार्यालयीन कामकाजानिमित्त त्यांच्याशी सातत्याने संपर्क करावा लागला व त्यांच्यातील मला भावलेल्या विशेषत्वाबद्दल लिहिणे न राहवले म्हणून हा लेख प्रपंच. सवयीनुसार निवृत्तीप्रत्यर्थ त्यांना वाचनीय पुस्तकाची शिदोरी दिली. त्यांचे उर्वरित आयुष्य यशस्वी, आरोग्यदायी व समाधानी जावो ह्याच या निमित्ताने सदिच्छा. 

वैभव

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त