वाडा तालुक्यात मे महिन्यात देवघर व वाडा येथे भव्य बाल सुसंस्कार शिबिरांचे आयोजन

के जी पाटील विद्यालय देवघर व कुणबी समाज मंदिर, गांधरे येथे बाल सुसंस्कार शिबिराचे आयोजन

शालेय मुलांना नवे शैक्षणिक वर्ष सुरु होण्‍याअगोदर दरवर्षी दिड दोन महिने सुटटया मिळतात. या सुटटयांमध्‍ये बहुतांश मुलांना कुटुंबासह फिरायला जाणे, गावी जाणे किंवा मित्रांसोबत वेळ घालवणे आवडते. मात्र त्‍याशिवाय अनेक गोष्‍टी मुलांना या सुटटीमध्‍ये करता येण्‍यासारख्‍या आहेत. सध्‍याचे युग हे स्‍पर्धेचे युग आहे. नवनवे तंत्रज्ञान अवतरत असल्‍याने त्‍या गतीने मुलांनी स्‍वतःला गतीमान केलेच पाहिजे. यासाठी संगणकीय तंत्रज्ञानातील अदययावत बाबी आत्‍मसात करण्‍याकडे कल असायला हवा. संगणकातील बेसिक गोष्‍टी तसेच नवनवे सॉफटवेअर, एप्‍लीकेशन्‍स शिकायला हवेत जे शाळाबाहय आहे. शाळांमध्‍ये ज्‍या गोष्‍टी शिकवल्‍या जात नाहीत त्‍या गोष्‍टी शिकण्‍यासाठी या सुटटीचा वापर करता येईल. हे सर्व करत असताना मुलांनी आपल्‍या आवडीनुसार आपले छंददेखील जोपासायला हवेत. वाचन, लिखाण, गायन, नृत्‍य, मैदानी खेळ, विविध प्रकारच्‍या सुप्‍त कलांना सुटटीच्‍या काळात चालना दयायला हवी. आज गावोगावी अनेक संस्‍था, तज्ञ व्‍यक्‍तींकडून बाल संस्‍कार शिबिरे, अभ्‍यासवर्ग, छंदवर्ग, उन्‍हाळी शिबीरे भरवली जात आहेत. या शिबीरांतूनदेखील अनेक गोष्‍टी शिकता येतात. मुलांच्‍या कलागुणांना वाव देण्‍याचे व त्‍यांना अभ्‍यासाव्‍यतिरीक्‍त आयुष्‍यात कामी पडतील अशा इतर अनेक गोष्‍टी शिकवण्‍याचे काम ही शिबीरे करतात. त्‍यामुळे त्‍यांचा लाभ मुलांनी घेवून वेळ सत्‍कारणी लावायला हवा. या संस्कार शिबिरांच्या माध्यमातून सजग, सुजाण, संस्‍कारी, निष्‍णात, अष्‍टपैलू व पारंगत मुले घडवण्‍यासाठी पालकांनी उन्‍हाळी सुटटयांचा वापर करायला हवा.

बाल सुसंस्कार शिबिरे, देवघर व गांधरे

देवघर विभाग शिक्षण प्रसारक मंडळ ट्रस्ट व ग्रामस्थ मंडळ देवघर यांच्‍या वतीने सोमवार दिनांक १ मे ते १६ मे २०२३ या कालावधीत निवासी बाल सुसंस्‍कार शिबीराचे आयोजन पालघर जिल्‍हयातील वाडा तालुक्‍यातील देवघर या गावी करण्‍यात आले आहे. आजच्‍या विज्ञान युगामध्ये तरुण पिढी ही आपले आई वडिल, बहिण भाऊ व गुरुजन यांच्‍या आदरापासुन दुरावत चाललेली आहे. कारण कुटुंबे ही धनाने श्रीमंत झाली मात्र पण संस्काराची श्रीमंती गमावून बसली आहे. संस्‍कार चांगले असतील तर संतती चांगली होईल. संस्‍कारक्षम संतती निर्माण होण्‍यासाठी लहान मुलांवर संस्कार होणे अत्‍यंत आवश्‍यक आहे. याच उदात्‍त हेतुने देवघर पंचक्रोशीतील परमार्थिक हेतू जोपासणा-या हभप पांडुरंग म. भोईर यांच्‍या पुढाकाराने देवघर गावातील के.जी.पाटील विदयालय येथे या बाल सुसंस्‍कार शिबीराचे आयोजन ६व्‍या वर्षी करण्‍यात आले आहे. या शिबीरात जवळपास १०० मुले सहभागी होत असुन शिबीरादरम्‍यान आचरण व अध्‍यात्मिक संस्‍कारांबरोबरोबच योगासने, सूर्यनमस्कार, टाळ, पकवाज, पेटी, अभंग, हरिपाठ, हनुमान चालीसा, गीता, विष्णुसहस्त्रनाम इत्‍यादी मुलांना शिकविल्‍या जाणार आहेत. गेली ६ वर्षे या ठिकाणी या बाल संस्‍कार शिबीरासाठी परिसरातील मुले, मालक, ग्रामस्‍थ व दानशूर व्‍यक्‍तींचा अत्‍यंत मौलिक योगदान मिळत असल्‍याचे आयोजक हभप पांडूरग म भोईर हे सांगतात. अशाच प्रकारचे बाल संस्‍कार शिबीर श्री ज्ञानोबा तुकोबा सत्संग सेवा संस्था, आळंदी सारशी (वाडा) यांच्‍या वतीने हभप राजेश महाराज बांगर यांच्‍या माध्‍यमातून गांधरे, वाडा येथील कुणबी समाज सभागृह येथे दिनांक ४ मे ते १७ मे २०२३ या कालावधीत संप्‍पन्‍न होत आहे. आजच्‍या मोबाईलच्‍या युगात संस्‍कारक्षम पिढी घडवण्‍यासाठी बाल संस्‍कारांची नितांत गरज असुन त्‍यासाठी पालकांचे योगदान व इच्‍छाशक्‍ती फार महत्‍वाची असल्‍याचे हभप राजेश म बांगर यांनी सांगीतले. एकंदरीत ग्रामीण भागात उन्‍हाळी सुटटयांमध्‍ये सुरु झालेला बाल सुसंस्‍कार शिबीरांचा हा सिलसिला पाश्‍चात्‍य संस्‍कृतीचा अंगीकार करत असलेल्‍या आजच्‍या पिढीला संस्‍कारांची वाट दाखवणारा ठरत आहे एव्‍हढे नक्‍की.


वैभव मोहन पाटील
देवघर, ता. वाडा, जि. पालघर

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त