सुंदर माझा दवाखाना

जागतिक आरोग्य दिनानिमित्त ‘सुंदर माझा दवाखाना’ स्वच्छता मोहीम
 सरकारी आरोग्य संस्था स्वच्छतेच्या बाबतीत दिवसेंदिवस कात टाकताना दिसत आहेत. खाजगी रुग्णालयांच्या तुलनेत नेहमीच सरकारी दवाखान्यांना दुय्यम स्थान दिले जाते. याचे मूळ कारण आहे शासकीय दवाखान्यांमध्ये आढळून येणारी अस्वच्छता, डॉक्टर, कर्मचाऱ्यांची उपलब्धता व रुग्णांना मिळणाऱ्या सुविधा. मात्र गेल्या काही वर्षांपासून हे दवाखाने या सर्वच बाबतीत स्वयंपूर्ण होताना दिसत आहेत. शासकीय आरोग्य संस्थांमध्ये स्वच्छतेवर भर दिला जात असून रुग्णांना स्वच्छ वातावरणात उपचार मिळावेत यासाठी आरोग्य यंत्रणा आग्रही आहेत. याचाच भाग म्हणून सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये कर्मचाऱ्यांच्या सहयोगातून नियमित पणे स्वच्छता मोहिमा राबविल्या जात आहेत. दरवर्षी ७ एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी या दिवसानिमित्त एक घोषवाक्य निश्चित केले जाते. यंदाच्या आरोग्य दिनाचे घोषवाक्य “सर्वांसाठी समान आरोग्य सुविधा, सर्वांसाठी आरोग्य!” ही आहे. राज्याच्या आरोग्य मंत्री महोदयांच्या संकल्पनेतून  सार्वजनिक आरोग्य विभागाने यानिमित्त या वर्षी राज्यातील सर्व सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये स्वच्छता मोहीम  जनमानसात आरोग्य सेवा अधिक सुंदर, स्वच्छ व लोकाभिमुख करण्यासाठी दि. ७ एप्रिल ह्या जगातीक आरोग्य दिनापासून ते १४ एप्रिल पर्यंत “सुंदर माझा दवाखाना’ हा उपक्रम राज्यभर राबविण्याचा अत्यंत स्तुत्य निर्णय घेतला आहे. जागतिक आरोग्य दिनाचे घोषवाक्य संपूर्ण जगभरात समान आरोग्य सेवा सुविधांबद्दल जागरुकता पसरवणे आणि आरोग्याशी संबंधित सर्व गैरसमज दूर करणे हा आहे. यासोबतच, विविध आरोग्यविषयक धोरणे तयार करण्यास आणि त्यांची योग्य अंमलबजावणी करण्यास प्रवृत्त केले जाते. सरकारी रुग्णालये आणि आरोग्य संस्थेत सर्वांना समान सुविधा उपलब्ध आहेत आणि जास्तीत जास्त लोकांनी सार्वजनिक रुग्णांलयांच्या सुविधांचा वापर केला पाहिजे, याविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे जागतिक आरोग्य दिनानिमित्त "सुंदर माझा दवाखाना" हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. सध्या आरोग्य संस्थांमध्ये दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी स्वच्छता दिवस पाळला जातो. हा स्वच्छता दिवस नियमित राबवायचा असून स्वच्छता दिनाचा कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. त्यानुसार आरोग्य विभागाने जिल्ह्यांना  “सुंदर माझा दवाखाना” हा उपक्रम राबविण्याविषयी सूचना दिलेल्या आहेत.  या उपक्रमांतर्गत राज्यातील सर्व आरोग्य संस्थांमध्ये दिनांक ७ एप्रिल ते १४ एप्रिल २०२३ या कालावधीत "सुंदर माझा दवाखाना" हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात आरोग्य संस्था व भोवतालचा परिसर, सर्व विभाग, स्वच्छतागृहे, भांडारगृहे इत्यादींची स्वच्छता करण्यात यावी, तसेच आरोग्य संस्थांच्या आवारात व दर्शनी भागात सुशोभीकरण, रंगरंगोटी आणि आरोग्य संस्थेमार्फत जनतेला देण्यात येणाऱ्या सेवांचे फलक लावण्यात यावेत, अशा सूचना क्षेत्रीय आरोग्य यंत्रणांना देण्यात आलेल्या आहेत. स्वच्छता ही प्रत्येकाची व्यक्तिगत व सामाजिक गरज आहे. लोकांचे आरोग्य सुदृढ राखायचे असेल आरोग्य संस्था ह्या सुंदर व स्वच्छ व्हायला हव्यात. यासाठी रुग्णांना उपचारादरम्यान चांगल्या वातावरणाचा अनुभव दयायचा असेल तर रुग्णालयीन स्वच्छता राखणे हे फार महत्वाचे आहे. यासाठी 'सुंदर माझा दवाखाना' हा उपक्रम नक्कीच स्तुत्य व लाभदायी आहे. स्वच्छतेचा हा पायंडा भविष्यातदेखील सरकारी आरोग्य संस्थांमध्ये कायमस्वरूपी टिकून राहील व सर्वसामान्य लोकांचा सरकारी दवाखान्यांकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन तयार होईल, अशी आशा आहे. 



वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई 


Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त