जागतिक आरोग्‍य दिन विशेष - स्वच्छतेतुन आरोग्याकडे


जागतिक आरोग्‍य दिन विशेष
सर्वांसाठी समान आरोग्य सुविधा, सर्वांसाठी आरोग्य !
``स्वच्छतेतून आरोग्‍याकडे''



दरवर्षी ७ एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी जागतिक आरोग्‍य संघटनेमार्फत एक घोषवाक्‍य निवडण्‍यात येते ज्‍याचा प्रचार व प्रसार जागतिक स्‍तरावर सर्वत्र करण्‍यात येतो. यंदाच्या आरोग्य दिनाचे घोषवाक्य “सर्वांसाठी समान आरोग्य सुविधा, सर्वांसाठी आरोग्य!” हे आहे. जवळजवळ ना‍हीशी होत चाललेली कोविड साथ पुन्‍हा एकदा डोके वर काढत आहे. आज राज्‍यात जवळपास ४ हजार कोविड आजाराचे रुग्‍ण राज्‍यातील विविध रुग्‍णालयांत उपचार घेत आहेत. असे असले तरी त्‍याचे फार गंभीर परिणाम सध्‍याच्‍या लाटेत दिसुन येत नसल्‍याने फार काळजी करण्‍याचे कारण नाही. मात्र संसर्ग पसरु न देण्‍यासाठी आवश्‍यक दक्षता घेतलीच पाहीजे. व्‍यक्‍तीगत स्‍वच्‍छता, मास्‍क, सामाजिक अंतर हया नियमांचे पालन करणे वाढत्‍या प्रादुर्भावाच्‍या पार्श्‍वभुमीवर अत्‍यंत आवश्‍यक आहे. कोविडच्‍या याच धास्‍तीच्‍या पार्श्‍वभुमीवर आज जागतिक आरोग्‍य दिन जगभर साजरा होत आहे. या दिवशी स्थापन झालेल्या जाग‍तिक आरोग्‍य संघटनेमध्ये जगातील जवळ जवळ १९२ देशांचा सहभागी झाले. लोकांच्या आरोग्यविषयक जास्तीतजास्त समस्यांकडे लक्ष पुरवणे हे या संघटनेचे मूळ उद्दिष्ट आहे. संघटनेची आरोग्यविषयक कल्पना केवळ रोग व त्यावरिल उपाय यावरच मर्यादित न रहाता त्यामध्ये मानसिक, शारीरिक आरोग्याबरोबरच सामाजिक आरोग्याचाही विचार केला जातो. नविन वैद्यकीय शोधांना मदत पुरविणे, रोग निवारण व रोगनियंत्रण यासाठी वैद्यकीय मदत पुरविणे, लोकांना आरोग्यविषयक सोयीसुविधांबाबत माहिती पुरवणे, लोकांमध्ये आरोग्य विषयक जागृती निर्माण करणे, इत्यादि कामे या संघटनेमार्फत केली जातात. शासनाच्‍या माध्‍यमातुन आज अनेक आरोग्‍य सेवा व योजना गरीब, गरजू लोकांसाठी उपलब्‍ध करुन देण्‍यात येत आहेत. सदर योजनांची व्‍यापक प्रसिध्‍दी व प्रचार होणे गरजेचे आहे जेणेकरुन जास्‍तीत जास्‍त लोकापर्यंत हया आरोग्‍य सेवा पोहोचतील. लोकांच्‍या बदललेल्‍या जिवनशैलीमुळे तसेच वातावरणातील बदलांमुळे निरनिराळे आजार जन्‍म घेत असुन त्‍यांवरील उपचार पध्‍दती व खर्चाची व्‍याप्‍तीदेखील वाढत आहे.
आज समाजात पसरत चाललेल्‍या निरनिराळया संसर्गजन्‍य व असंसर्गजन्‍य आजाराच्‍या पार्श्‍वभुमीवर प्रत्‍याकाने आरोग्‍याच्‍या दृष्‍टीने योग्‍य काळजी घेण्‍याची आहे.  हया आजारांचा सामना करावा लागू नये यासाठी सर्वात मोठी काळजी घ्‍यावी लागेल ती स्‍वच्‍छतेची. वैयक्तिक व सामाजिक स्‍वच्‍छता ही माणसाच्‍या आरोग्‍यावर विपरित व दुरगामी परिणाम करते. सार्वजनिक स्‍वच्‍छतेची सुरुवात वैयक्तिक स्‍वच्‍छतेपासून होते. प्रत्‍येकाने आपले घर व परिसर स्‍वच्‍छ ठेवण्‍यासाठी प्रयत्‍न केले पाहिजेत. शिक्षण ही विकासाची पहिली पायरी आहे व स्‍वच्‍छता हा आरोग्‍याचा अविभाज्‍य भाग आहे. आपल्‍या घरांची,  गावांची, परिसराची व पर्यायाने देशाचीही स्वच्छता वैयक्‍तीक योगदानातून कशी होईल याचा विचार प्रत्‍येकाने करणे व त्‍यायोगे ``स्वच्छतेतून समृध्दीकडे'' ही संकल्पना मूर्तरुपात येणे अपेक्षित आहे. अस्वच्छ परिसर व वैयक्तिक स्वच्छते अभावी उदभवणाऱ्या रोगांमुळे पिडीत असलेल्यांची आकडेवारी वाढत आहे, त्यामुळे स्‍वच्‍छतेतून लोकांचे आरोग्‍यमान उंचावण्‍यासाठी शासनही प्रयत्नशील असुन संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान,  निर्मल भारत अभियान, पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना यांसारख्‍या योजनांमध्‍ये ग्रामस्थांचा सक्रीय सहभाग घेऊन स्‍वच्‍छतेचे महत्‍व पटविण्‍यात येत आहे. परदेशात जाऊन आल्‍यानंतर आपण तेथील शहरांची स्वच्छता पाहुन त्यांचे गुणगान गातो,  मात्र तेथील स्वछता, शिस्त,  सौंदर्य,  सृष्टी व हिरवळ वाखाणण्याजोगी आहे ती केवळ तेथे राहणाऱ्या लोकांमुळेच हेदेखील विसरता कामा नये. आपण आपले घर स्वच्छ ठेवतो, पण परिसराशी आपल्‍याला काही देणेघेणे नसते. अस्वच्छतेमुळे होणाऱ्या आजारांमुळे आपले आरोग्य धोक्यात येऊन आपला घामाचा पैसा व वेळ वाया जात आहे. आज सार्वजनिक ठिकाणी बस, ट्रेन, इमारती, कार्यालये, उदयान, रस्‍ते  या ठिकाणी आपल्याला अस्वच्छतेचे साम्राज्‍य दिसते. कुठेही थुंकणे, पान खाऊन पिचकारणे, सिगारेटची थोटके, खाद्यपदार्थांची वेष्टने, कागदाचे तुकडे, तंबाखू, गुटख्याच्या पिचकाऱ्यांनी रंगविलेल्या भिंती दिसतील. आपल्याकडील नदया व नाले या सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटारी बनल्या आहेत. कचऱ्याचे डोंगर शहरांमध्ये तयार होत आहेत. अनेक रोग हे अस्वच्छतेमुळे होत आहेत. आपल्‍या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकानेच अंगी बाळगावयास हवी. आपण केवळ वैयक्तिक स्वच्छतेवरच भर न देता सामुदायिक पातळीवर एकत्र येवून काम केल्यास आपले शारीरिक स्वास्थ्य व सामाजिक स्वास्थ्य टिकण्यास व वृध्दींगत होण्यास मदत होईल. स्‍वच्‍छतेमुळे आपण केवळ वैयक्तिक स्वार्थ साधत नाहीतर, ती एक मोठी देश सेवा व निसर्ग सेवाही आहे.
आपल्‍या सभोवतालचा परिसर स्‍वच्‍छ राखण्‍यासाठी वैयक्तिक पातळीवर खूप गोष्‍टी करता येतात. आजकाल जागोजागी पसरलेल्‍या क-चयामध्‍ये सर्वात मोठया प्रमाणावर दिसणारा घटक म्‍हणजे प्‍लॅस्टिक. एकतर प्‍लॅस्टिकचे विघटन होत नाही व हा प्‍लॅस्टिकचा कचरा आरोग्‍यासाठी खूप घातक आहे. त्‍यामुळे आपण सर्वांनी प्‍लॅस्टिक पिशव्‍या व प्‍लॅस्टिकचे आवरण असलेले खादयपदार्थ वापरणे बंद करायला हवे तसेच प्‍लॅस्टिकचे विघटनदेखील योग्‍य मार्गाने करायला हवे. सार्वजनिक ठिकाणी कचरा न फेकणे, न थुंकणे या बाबीदेखील कटाक्षाने पाळल्‍या पाहिजेत. घरातील व सोसायटीतील  कच-याची योग्‍य त्‍या ठिकाणी ओला – सुका वर्गीकरण करुन विल्‍हेवाट लावली गेली पाहिजे. जमेल तशी व तेव्‍हा परिसराची स्‍वच्‍छता केली पाहिजे व इतरांनादेखील त्‍यासाठी प्रवृत्‍त करायला हवे. केंद्र शासनाने आणलेली स्‍वच्‍छ भारत संकल्‍पना देशाला अधिक समृध्‍द व सुंदर बनवणारी असुन यासाठी आपला सर्वांचाच सहभाग अत्‍यंत मोलाचा आहे.
राज्‍याच्‍या सार्वजनिक आरोग्‍य विभागाने ७ एप्रिल ह्या जगातीक आरोग्य दिनापासून ते १४ एप्रिल पर्यंत “सुंदर माझा दवाखाना’ हा उपक्रम राज्यभर राबविण्याचा अत्यंत स्तुत्य निर्णय घेतला आहे. जागतिक आरोग्य दिनाचे घोषवाक्य संपूर्ण जगभरात समान आरोग्य सेवा सुविधांबद्दल जागरुकता पसरवणे आणि आरोग्याशी संबंधित सर्व गैरसमज दूर करणे हा आहे. सरकारी रुग्णालये आणि आरोग्य संस्थेत सर्वांना समान सुविधा उपलब्ध आहेत आणि जास्तीत जास्त लोकांनी सार्वजनिक रुग्णांलयांच्या सुविधांचा वापर केला पाहिजे, याविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे जागतिक आरोग्य दिनानिमित्त "सुंदर माझा दवाखाना" हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात आरोग्य संस्था व भोवतालचा परिसर, सर्व विभाग, स्वच्छतागृहे, भांडारगृहे इत्यादींची स्वच्छता करण्यात यावी, तसेच आरोग्य संस्थांच्या आवारात व दर्शनी भागात सुशोभीकरण, रंगरंगोटी आणि आरोग्य संस्थेमार्फत जनतेला देण्यात येणाऱ्या सेवांचे फलक लावण्यात यावेत, अशा सूचना क्षेत्रीय आरोग्य यंत्रणांना देण्यात आलेल्या आहेत. स्वच्छता ही प्रत्येकाची व्यक्तिगत व सामाजिक गरज आहे. लोकांचे आरोग्य सुदृढ राखायचे असेल तर आरोग्य संस्था ह्या सुंदर व स्वच्छ व्हायला हव्यात. यासाठी रुग्णांना उपचारादरम्यान चांगल्या वातावरणाचा अनुभव दयायचा असेल तर रुग्णालयीन स्वच्छता राखणे ही फार महत्वाची आहे. यासाठी 'सुंदर माझा दवाखाना' हा उपक्रम नक्कीच स्तुत्य व लाभदायी आहे. स्वच्छतेचा हा पायंडा भविष्यातदेखील सरकारी आरोग्य संस्थांमध्ये कायमस्वरूपी टिकून राहायला हवा जेणेकरुन सर्वसामान्य लोकांचा सरकारी दवाखान्यांकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन तयार होईल.
आज जागतिक आरोग्‍य दिनाच्‍या निमित्‍ताने आपण स्‍वच्‍छतेची शपथ घेऊन आपला परिसर व घर स्‍वच्‍छ राखण्‍याचा संकल्‍प करु या आणि “सर्वांसाठी आरोग्‍य'' हा गजर सर्वत्र करु या.

जागतिक आरोग्‍य दिनाच्‍या सर्वांना आरोग्‍यमयी शुभेच्‍छा


वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी  मुंबई


Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त