भटक्या कुत्र्यांना आवरा

खारघरमध्ये भटक्या कुत्र्याने तब्बल २० जणांना चावा घेतल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. मागील आठवड्यात एका १२ वर्षाच्या मुलीला चावा घेतल्यानंतर सोसायटी रहिवाश्यांनी खारघर पोलीस स्थानकात तक्रार दिली. यानंतर पालिका या कुत्र्यावर उपचार करून त्याला पुन्हा याच परिसरात सोडून देणार आहे. वास्तविक मुंबई व उपनगरांमध्ये ह्या भटक्या कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. मात्र त्यावर उपाययोजना करण्यासाठी कुठलीही पालिका यशस्वी ठरत नसल्याने भटक्या कुत्र्यांचा त्रास नागरिकांच्या जीवावर उठत आहे. दिवसेंदिवस मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत चालल्याने पालिकांच्या निर्बीजीकरण प्रक्रियेवरच शंका उपस्थित होत आहे. मुंबई पालिका हद्दीमध्ये तर ह्या भटक्या कुत्र्यांची नेमकी संख्या किती याची माहितीच उपलब्ध नसल्याने आता ती मोजण्यासाठी ह्युमन सोसायटी इंटरनॅशनल या संस्थेकडून हे काम करून घेण्यात येणार आहे. एकीकडे नुकत्याच एका प्रकरणात न्यायालयाने अशा कुत्र्यांकडे संवेदनशीलतेने पाहा असा निर्वाळा दिला आहे तर दुसरीकडे ह्या भटक्या कुत्र्यांचा सामाजिक उपद्रव सुरूच आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांच्या बाबतीत ठोस धोरण आखण्याची गरज आहे. त्यांची रस्त्यावरील संख्या नियंत्रणात आणण्यासाठी पावले उचलण्याची आवश्यकता आहे अन्यथा भविष्यात लोकसंख्या नियंत्रणासारखा भटके कुत्रे नियंत्रण दिवस साजरा करण्याची वेळ येऊ शकते. 



वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त