शब्द चुकला तर वाक्य बिघडते मात्र संस्कार चुकले तर आयुष्य बिघडते - वैभव पाटील

मुलांना मोबाईलमधून बाहेर काढण्यासाठी बाल संस्कार शिबिरे उपयुक्त 
वाडा तालुक्यात निवासी बाल संस्कार शिबिरांचे आयोजन
सध्या शालेय मुलांना उन्हाळी सुट्ट्या लागलेल्या आहेत. या सुट्ट्यांमध्ये मुलांवर अध्यात्मिक संस्कार व्हावेत या हेतूने पालघरमधील वाडा तालुक्यातील देवघर व गांधरे येथे निवासी बाल संस्कार शिबिरांचे आयोजन परमार्थप्रेमींच्या माध्यमातून करण्यात आले आहे. देवघर विभाग शिक्षण प्रसारक मंडळ ट्रस्ट व ग्रामस्थ मंडळ देवघर यांच्‍या वतीने सोमवार दिनांक १ मे ते १६ मे २०२३ या कालावधीत के जी पाटील विद्यालय देवघर येथे सलग सहाव्या वर्षी तर श्री ज्ञानोबा तुकोबा सत्संग सेवा संस्था, आळंदी सारशी (वाडा) यांच्‍या वतीने हभप राजेश महाराज बांगर यांच्‍या माध्‍यमातून गांधरे, वाडा येथील कुणबी समाज सभागृह येथे दुसऱ्या वर्षी दिनांक ४ मे ते १७ मे २०२३ या कालावधीत निवासी बाल सुसंस्‍कार शिबीरे सुरू झाली आहेत. दोन्ही शिबिरांमध्ये एकूण १२० मुले सहभागी झाली आहेत. शिबीरादरम्‍यान आचरण व अध्‍यात्मिक संस्‍कारांबरोबरोबच योगासने, सूर्यनमस्कार, टाळ, पकवाज, पेटी, अभंग, हरिपाठ, हनुमान चालीसा, गीता, विष्णुसहस्त्रनाम इत्‍यादी गोष्टी मुलांना शिकविल्‍या जात आहेत. रविवारी नवी मुंबई येथील वृत्तपत्रलेखक श्री वैभव मोहन पाटील यांनी या दोन्ही शिबिरांमध्ये उपस्थिती दर्शवत मुलांसाठी प्रश्नमंजुषा, निबंध व चित्रकला स्पर्धा घेतल्या. तसेच मुलांना संस्कार शिबिरांचे महत्व पटवत मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी आज समाजात संस्कार शिबिरांचे असलेले महत्व पटवून देत अशी शिबिरे गावोगावी पंचक्रोशीत आयोजित केली जावीत अशी अपेक्षा व्यक्त केली. मोबाईलच्या दुनियेत हरवलेल्या व भरकटत चाललेल्या भावी पिढीला संस्कारांच्या कक्षेत आणण्यासाठी ही शिबिरे अत्यंत उपयुक्त ठरतात असे मत त्यांनी मांडले. वाक्य तयार करताना शब्द चुकले तर ते वाक्य बिघडते मात्र मुलांवरील संस्कार चुकले तर त्यांचे पूर्ण आयुष्य बिघडते अशी भावना व्यक्त करत संस्कार शिबिरांचे आयोजक, सहभागी मुले व त्यांना निवासी शिबिरात दाखल करणाऱ्या पालकांचे कौतुक करत शिबिरास शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी मुलांना स्पर्धा साहित्य व खाऊचे वाटपदेखील केले. स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ शिबिराच्या समारोप प्रसंगी करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. शिबिरात शिकवणाऱ्या गुरुवर्य व मार्गदर्शकांना त्यांनी यावेळी पुस्तके भेट दिली. एकंदरीत ग्रामीण भागात उन्‍हाळी सुटटयांमध्‍ये सुरु झालेला बाल सुसंस्‍कार शिबीरांचा हा सिलसिला पाश्‍चात्‍य संस्‍कृतीचा अंगीकार करत असलेल्‍या आजच्‍या पिढीला नक्कीच अध्यात्मिक व कौटुंबिक संस्‍कारांची वाट दाखवणारा ठरत आहे. 






Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त