तिर्थयात्रांच्या माध्यमातून धार्मिक स्थळांची अनुभूती

आळंदीवासी हभप पांडुरंग म भोईर यांचा उपक्रम
ग्रामीण भागातील लोकांना पर्यटन आणि तिर्थयात्रांचे नेहमीच अप्रूप असते. शेती व इतर कामधंद्याच्या व्यापातून सवड मिळणे मुश्किल असल्याने यात्रांचा योग फार दुर्मिळच येतो. तसेच फिरायला जायचा विचार करत असताना अनेक ठिकाणांची नावे केवळ वाचन्यात आणि एकण्यातच आलेली असतात. तिथे कसे जायचे, काय पाहायचे, तेथील महात्म्य काय याबाबत त्यांच्या मनात प्रचंड अनभिज्ञता असते. गावातील अनेक लोकांसाठी सामुदायिक वारीचा प्रसंग यापूर्वी फक्त पंढरीच्या वारीपुरता मर्यादित असायचा. मात्र आता देशभरातील विविध तीर्थक्षेत्र अनुभवण्यासाठी यात्रा काढल्या जात आहेत. अशा यात्रा खाजगी एजन्सीमार्फत किंवा व्यक्तिगतरित्या केल्यास त्या अधिक खर्चिक ठरत असल्यामुळे त्याकडे ग्रामस्थ फारसे वळत नाहीत. मात्र नफ्याचा कुठलाही उद्देश न ठेवता स्थानिक ग्रामस्थांना तीर्थयात्रा घडवून त्यांना अध्यात्मिक अनुभूती अत्यल्प शुल्कात  मिळावी यासाठी ग्रामीण भागातील काही परमार्थ प्रेमी अशा यात्रांचे आयोजन नियमितपणे करताना दिसत आहेत. त्यातलेच एक म्हणजे पालघर जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाचे प्रसारक हभप पांडुरंग म भोईर. यंदा त्यांनी सलग दुसऱ्या वर्षी २१ मे पासून ३१ पर्यंत ११ दिवसांची काशी, बनारस, वाराणसी अशी तीर्थयात्रा पालघर व ठाणे जिल्ह्यातील यात्राप्रेमींसाठी आयोजित केली आहे ज्याची सुरुवात कल्याण स्टेशनवरून २१ तारखेला झाली. मागील वर्षीप्रमाणे यंदाही या यात्रेला मोठा प्रतिसाद मिळालेला असून ५० हुन अधिक यात्रेकरू या भ्रमंतीत सहभागी होत तीर्थक्षेत्र पर्यटनाचा लाभ घेत आहेत. ही यात्रा रामटेक, वाराणशी (काशी), आयोध्या, प्रयागराज, चित्रकूट, भेंडा घाट अशी तिर्थस्थळे करून नागपूर मार्गाने पुन्हा गावाकडे परतणार आहे. यात त्यांना सर्व तिर्थस्थळांची इत्यंभूत माहिती तसेच प्रवास, निवास खर्च नाममात्र शुल्कात उपलब्ध करून दिला जात आहे. केवळ परमार्थ व धर्म प्रचारासाठी हा उपक्रम आयोजित करत असल्याचे हभप पांडुरंग भोईर हे सांगतात. हभप पांडुरंग भोईर हे आळंदीवासी प्रख्यात किर्तनकारदेखील असून पालघर जिल्ह्यातील आपल्या गावाकडच्या लोकांसाठी सातत्याने विविध धार्मिक उपक्रम राबवत असतात. गेल्या ६ वर्षांपासून ते गावात लहान मुलांसाठी भव्य निवासी बाल संस्कार शिबिर मुलांच्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये आयोजित करून शेकडो मुलांना अध्यात्मिक, वादन, गायन, श्लोक, अभंग पाठांतर यांसह संस्कारांचे शिक्षण देण्याचे काम करतात. त्यांच्या प्रयत्नांतूनच या परिसरात भव्य वारकरी शिक्षण संस्थादेखील उभी राहत आहे त्याचा लाभ भविष्यात पारमार्थिक शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या अनेक मुलांना होणार आहे. यासोबतच त्यांचा परिसरातील लोकांसाठी तीर्थयात्रा घडवण्याचा सुरू असलेला हा उपक्रम निश्चितच प्रशंसनीय असून त्यासाठी अनेक जेष्ठ परमार्थप्रेमींचे आशीर्वाद आणि ग्रामस्थांचा सक्रिय पाठिंबा त्यांना लाभत आहे. यंदाच्या ऑक्टोबर महिन्यात हरिद्वार, ऋषिकेश, दिल्ली, आगरा, मथुरा, गोकुळ, वृंदावन अशी यात्रादेखील त्यांनी आयोजित केली आहे. एकंदरीत ना नफा ना तोटा या तत्वावर आयोजित करण्यात येत असलेल्या या तीर्थयात्रांच्या माध्यमातून मोठया प्रमाणावर भाविकांना देशभरातील धार्मिक तिर्थस्थळांची अनुभूती मिळताना दिसत आहे. 

वैभव मोहन पाटील 

Comments

Popular posts from this blog

असा किर्ती कुमार न होणे

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा