नाट्यगृहांना योग्य सुविधा उपलब्ध करा

रंगभूमी असो वा मालिका किंवा चित्रपट, तीनही क्षेत्रात आपल्या बहारदार अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे अभिनेते भरत जाधव हे रत्नागिरीतील नाट्यगृहाच्या दुरावस्थेवरून प्रचंड संतापल्याचे मागील शनिवारी पाहायला मिळाले. भरत जाधव यांच्या 'तू तू मी मी' ह्या नाटकाचा प्रयोग सुरू असताना येथील साऊंड सिस्टम सतत बंद पडत होती. या ठिकाणी असलेले एसी देखील नादुरुस्त झाले होते. प्रयोगात सतत येणारा व्यत्यय तसेच, प्रेक्षकांची होणारी गैरसोय पाहून भरत जाधव यांनी नाट्यगृहाची अशी अवस्था असेल, तर रत्नागिरीत पुन्हा पाय ठेवणार नाही, असा संताप व्यक्त केला. एका प्रतिभावंत मराठी कलाकाराचा हा आक्रोश स्थानिक प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे. नाट्यगृहांच्या बाबतीत नेहमीच दुजाभाव केला जातो. त्याकडे दुर्लक्ष केले जाते. नाट्यकलावंतांमधूनच मोठया पडद्यावरील कलाकार घडत असतात. जिथे रिटेकला संधी नसते अशा प्रत्यक्ष रंगमंचावरील अभिनयाची अनुभूती प्रेक्षकांना देणारे नाटक चांगल्या वातावरणात कलाकारांना करायला मिळावे व नाट्यप्रेमींना पाहायला मिळावे ही माफक अपेक्षादेखील नाट्यगृहात पूर्ण होऊ शकत नसेल तर ते दुर्दैवी आहे. दुसरीकडे त्याच दिवशी शनिवारी प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे या 'चारचौघी' नाटकाच्या निमित्ताने नवी मुंबईतील वाशीत विष्णुदास भावे नाट्यगृहात आल्या असता त्यांनी नाट्यगृहातील स्वच्छता व एकूण सुविधेबद्दलचा व्हिडीओ पोस्ट करत नाट्यगृहाची तोंड भरून स्तुती केली. वास्तविक रत्नागिरी व वाशीतील ही दोन्ही नाट्यगृहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अखत्यारीतील असताना त्यांतील सुविधांबाबत आढळणारा हा प्रचंड विरोधाभास पचनी पडणारा नाही. नाटकात काम करणारे कलावंत समाधानी असले तरच त्यांची कला बहरेल व उत्तम कलाकृती पाहण्याचे समाधान नाट्यप्रेमींना मिळेल. त्यामुळे सर्वच नाट्यगृह प्रशासनांनी वरील दोन घटनांमधून बोध घेत दर्जेदार नाटके दर्शकांसमोर सादर होण्यासाठी चांगल्या सुविधा नाट्यगृहांना उपलब्ध कराव्यात. 



वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

Comments

Popular posts from this blog

असा किर्ती कुमार न होणे

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर