कारवाईत सातत्य हवे
मागील आठवड्यातच एक धक्कादायक बातमी वाचण्यात आली. मित्राच्या लग्नाच्या वरातीत मोठया आवाजातील डीजेच्या तालावर नाचल्यानंतर एका तरुणाच्या कानाचा पडदा फाटून त्याला एका कानाचा कायमचा बहिरेपणा तर दुसरा कान निम्मा झाल्याची ती बातमी होती. हल्ली आपल्याकडे हळद, साखरपुडा, लग्न, वाढदिवस, पूजा, सण उत्सव व इतर कोणतेही निमित्त असले की मोठया आवाजात ध्वनिक्षेपक लावले जातात. जणू ज्या कार्यक्रमातील आवाजाची पातळी मोठी तो कार्यक्रम तितकाच भव्य व मान सन्मान वाढवणारा म्हणून ओळखला जातो अशी यजमान मंडळींची भावना असते. तसेच बिनासायलेन्सरच्या गाड्या, वेळी अवेळी वाजणारे भोंगे, कारखान्यांतील आवाज, बांधकाम साईट व घरगुती कामांच्या ठिकाणी लावण्यात येणाऱ्या मोठ्या आवाजाच्या मशिन्स यामुळेही ध्वनी प्रदूषणाच्या समस्येची व्याप्ती वाढते. मात्र या आवाजाने इतरांना होणाऱ्या त्रासाचा दुर्दैवाने विचार केला जात नाही. शासनाकडून कुठलाही कार्यक्रम साजरा करण्यास परवानगी देताना आवाजाची मर्यादा आखून दिली जाते. मात्र ती पातळी कधीही पाळली जात नाही व आवाज मोजण्याची कुठलीही यंत्रणाही उपलब्ध नसते. कारवाईच होत नसल्याने अशा कर्णकर्कश डीजे बहाद्दरांचे फावते व त्यांची हिंमत अधिकच वाढते. त्यामुळे पोलिसांनी नागरिकांमध्ये जनजागृतीबरोबरच साउंड, डीजे, इव्हेंट चालकांना बोलावून त्यांना जर सक्त ताकीद दिली व संभाव्य कारवाईची माहिती दिली तर अशा प्रकारांना काही प्रमाणात तरी आळा बसेल असे मत आहे.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
Comments
Post a Comment