श्री प्रमोद कदम सेवा निवृत्त
प्रदीर्घ सेवेची निवृत्ती
श्री प्रमोद कदम, भांडार पडताळणी अधिकारी या आणखी एका कर्तव्यनिष्ठ, जबाबदार, अभ्यासू व अनुभवी अधिकाऱ्याने आज राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालयातून प्रदीर्घ सेवेनंतर नियत वयोमानानुसार एक्झिट घेतली. अभियानातील सर्वात जुने व जेष्ठ अधिकारी म्हणून ते सर्वांना परिचित होते. खरेदीसारख्या किचकट विषयात त्यांनी आपले कौशल्य सिद्ध करत अनेक अडचणीचे विषय लीलया हाताळले. कार्यालयातील अनेक कर्मचार्यांशी त्यांचे असलेले जिव्हाळ्याचे ऋणानुबंध आज त्यांच्या छोटेखानी सेवानिवृत्ती कार्यक्रमातदेखील दिसून आले. त्यांचे व्यक्तिमत्व व आत्मविश्वास कार्यालयीन कामकाजात त्यांची अनुभवसंपन्नता सिद्ध करणारा होता. त्यामुळेच एखाद्या कार्यक्रमाची, बैठकीची, कार्यशाळेची जबाबदारी असो की तातडीची खरेदी, प्रत्येक विषयात कुठलेही दडपण त्यांच्या चेहऱ्यावर कधी जाणवले नाही. प्रत्येक घटनेला ते अगदी आत्मविश्वासाने व नेतृत्वकौशल्याने सामोरे गेले मात्र त्याची किंमतही त्यांना काहीदा चुकवावी लागली हेही खरेच. अधिकाऱ्यांसमोर वावरताना त्यांच्यातील कॉन्फिडन्स आमच्या नेहमीच कुतूहलाचा विषय. एखादा विषय मांडताना त्यांच्या हजरजबाबीपणा व ठामपणाचे खूप कौतुक वाटायचे. त्यामुळे ते अधिकाऱ्यांच्यादेखील अगदी जवळचे व हक्काचे अधिकारी म्हणून परिचित होते. या सर्वात त्यांचा खरेदी प्रक्रियेतील अभ्यास वाखाणण्याजोगा होता. खरेदीतील बारकावे, शासन नियम, निविदा व दरपत्रके प्रक्रिया, रेकॉर्ड किपिंग, सादरीकरणाची पद्धत या सर्वाचा फायदा त्यांच्या सोबत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नक्कीच झाला असेल. आयुक्त कक्ष म्हणून माझेसोबत त्यांचा कामकाजाच्या निमित्ताने नियमित संपर्क व्हायचा. त्यांची भूमिका ठामपणे मांडत असताना ते आमचेही मत आवर्जून विचारात घेत होते जी पद्धत आम्हाला त्यांच्या अधिक जवळ करणारी होती. आमच्यासाठी अनेकदा ते घरून आणलेला जेवणाचा डबा आग्रहाने व आपुलकीने दुपारी आम्हाला पाठवायचे. मधुमेह व इतर आजारपणामुळे त्रस्त असलेले कदम सर इतरांना खाऊ घालण्यात मात्र कुठलही पथ्य पाळत नाहीत. आज त्यांच्या निवृत्तीने कार्यालयातील रिकामी झालेली त्यांची खुर्ची त्यांच्या उणिवेची जाणीव देत राहील. मात्र शो मस्ट गो ऑन या उक्तीनुसार शासकीय काम हे कधीही न थांबणारे यंत्र आहे. असे असले तरी त्यांच्या निवृत्तीने निर्माण झालेली पोकळी भरून निघण्यास नक्कीच काही कालावधी लागेल. आज त्यांच्याविषयी अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलेल्या मते त्यांच्या अभियानातील प्रदीर्घ व यशस्वी कारकिर्दीची साक्ष देत होती. सवयीनुसार त्यांना आज वाचनीय पुस्तकाची शिदोरी देत निरोप दिला. त्यांचे उर्वरित आयुष्य सुख समाधान व निरोगी जावो याच यानिमित्ताने शुभेच्छा.. वैभव
Comments
Post a Comment