स्वावलंबी अगरबत्ती व धूप - ग्रामीण महिलांच्या कौशल्याचा अविष्कार
नैसर्गिक आणि दर्जेदार स्वावलंबी अगरबत्ती
ग्रामीण भागातील स्त्रिया आजदेखील देशाच्या अनेक भागांमध्ये चूल आणि मूल या संकल्पनेत अडकून आहेत. कमी शिक्षण, कौटुंबिक जबाबदाऱ्यांचा ताण, शेतीची कामे आणि पुरुषप्रधान संस्कृती यामुळे ह्या स्त्रियांना म्हणावी तशी मोकळीक मिळत नाही. नोकरी व्यवसाय वगैरे तर फार दुरचीच गोष्ट. समाजातील काही टक्के महिला आज चांगले शिक्षण घेऊन सक्षमपणे उद्योग व्यवसाय व नोकऱ्यांमध्ये स्वतःच्या पायावर यशस्वीरित्या उभ्या राहिल्या आहेत. शहरी भागात निश्चितपणे त्या दृष्टीने आशादायक चित्र आहे. मात्र ग्रामीण भागातील अवस्था महिलांच्या सक्षमीकरणाच्या बाबतीत फार बरी म्हणावी अशी मुळीच नाही. मात्र तरीदेखील आज काही महिला मोठ्या हिंमतीने नोकरी व्यवसायात उतरत आहेत आणि आपल्या बरोबरीच्या स्त्रियांनादेखील आपल्यासोबत अर्थार्जनासाठी प्रवृत्त करताना दिसत आहेत. गावोगावी स्थापन झालेल्या महिला बचत गटांच्या माध्यमातून व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून गृहोपयोगी वस्तूंची निर्मिती करण्यासाठी अनेक महिला आग्रही आहेत. त्यांना योग्य दिशा व हाताला काम दिले तर त्या घरसंसारात चांगल्या प्रकारे हातभार लावू शकतात. हाच ध्यास घेऊन पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील सौ दिक्षिता दिगंबर पाटील यांनी आपली नोकरी सांभाळत व्यवसायात देखील उडी घेतली आहे. वाड्याच्या Super Bond Adhesive Pvt Ltd या कंपनीत सिनियर एक्झिक्युटिव्ह ऍडमिन या पदावर कार्यरत असणाऱ्या दिक्षिता पाटील यांनी नोकरी सांभाळत स्वावलंबी एंटरप्राइजेस या नावाने एक नवा व्यवसाय सुरू केलाय ज्या माध्यमातून त्यांनी स्वावलंबी नैसर्गिक अगरबत्ती व धूप तयार करण्याचा गृहोद्योग सुरू केला आहे. या माध्यमातून गावातील व पंचक्रोशीतील अधिकाधिक महिलांच्या हाताला काम देऊन दर्जेदार अगरबत्तीचे उत्पादन त्या स्वतः करत आहेत. गावातील गृहिणी, जेष्ठ महिलांना त्यांनी या व्यवसायात सामावून घेतले असून त्यांच्या स्वउत्पादीत अगरबत्ती ग्रामीण भागांबरोबरच शहरी भागांमध्येही विकण्याचादेखील त्यांचा खटाटोप सुरू आहे. विशेष म्हणजे त्यांना हा उद्योगात त्या ज्या ठिकाणी नोकरी करतात त्यांचाही चांगला सहयोग लाभत आहे. ठाणे शहर कुणबी सेवा संघाच्या ठाण्यात नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात त्यांना स्टॉल देण्यात आला होता. त्यावेळेस त्यांच्या अगरबत्तीला ठाणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उत्पादन वापरल्यानंतर अनेकांनी ते अत्यंत उत्तम व प्रभावी असल्याचे सोशल माध्यमांतून सांगितले. स्वावलंबी अगरबत्ती पूर्णपणे नैसर्गिक, सुगंधित, केमिकल रहित व वातावरण प्रसन्न करणारी आहे. इतर अगरबत्तीप्रमाणे त्यात कुठलेही रसायन मिश्रीत नसल्याने त्याचा शरीराला कुठलाही अपाय संभवत नाही. त्यामुळे ही अगरबत्ती वापरायला अगदी सेफ व दर्जेदार आहे. तसेच या व्यवसायातून वाड्यासारख्या ग्रामीण भागांतील महिलांना मोठा रोजगार उपलब्ध होणार असल्याने या अगरबत्तीचा वापर सामाजिक जाणिवेचा जागर करणारा ठरणार आहे. आज या गृहोद्योगात मोजक्या संख्येने असणाऱ्या महिलांची संख्या ह्या व्यवसायाच्या वृद्धीने शेकडोंच्या घरात जाण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे घराघरात वापरल्या जाणाऱ्या व मांगल्ल्याचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या ह्या अगरबत्तीची आपण केलेली निवड, स्वावलंबी गृहोद्योग समूहाला निश्चित एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल व अनेक ग्रामीण कुटुंबांची आर्थिक स्थिती सुधारणारी देखील ठरणार आहे. दिक्षिता पाटील यांनी सुरू केलेल्या एका लहान उद्योगाला आपल्या सर्वांच्या लहानश्या सहयोगाची गरज आहे. स्वावलंबीची अगरबत्ती वापरून आपण ग्रामीण अर्थव्यवस्थेला नक्कीच हातभार लावणार आहात, अनेक महिलांना रोजगार निर्माण करणार आहात आणि घरामध्ये अगरबत्तीचे एक दर्जेदार उत्पादन देखील आणणार आहात. आपल्या घरात दरवळणारा स्वावलंबी अगरबत्तीचा सुगंध अनेक महिलांच्या अपेक्षांना नवे पंख लावण्यास मदत करेल. या उद्योग समूहाची सध्या अगरबत्ती व धूप ही दोन उत्पादने बाजारात आहेत. भविष्यात स्वावलंबी गोधडी नावाचे अस्सल कुणबी उत्पादन बाजारात आणण्याचा या महिलांचा मानस आहे. त्याचबरोबर स्वावलंबी सुगंधी परफ्यूम देखील लवकरच बाजारात आणण्याचा त्यांचा विचार आहे. ग्रामीण भागातील महिलांमध्ये कलाकुसरीचे गुण ठासून भरलेले असतात फक्त त्यांना योग्य पद्धतीने वाव मिळायला हवा. घरच्या घरी त्यांना एखादे काम करायला मिळाले तर त्या आपले पूर्ण कौशल्य त्या वस्तूच्या निर्मितीत पणाला लावतात व त्यामुळे वस्तूची गुणवत्तादेखील सुधारते. स्वावलंबी अगरबत्ती अशाच प्रकारे कुशल महिलांच्या कौशल्याने परिपूर्ण असून एक दर्जेदार उत्पादन आपल्यासमोर त्यांनी आणले आहे. त्यामुळे या अगरबत्तीचा वापर अधिकाधिक प्रमाणात व्हावा व एक रोपट्यातून सुरू झालेला हा उद्योग उद्या वटवृक्ष म्हणून बहरावा असे मनोमन वाटते. तुम्हाला ह्या अगरबत्ती व उद्योगाबद्दल अधिक माहिती जाणुन घ्यायची असेल किंवा अगरबत्ती, धूप मागवायची असेल तर या ८६००४४५५९० क्रमांकावर फोन करा. ठाणे व पालघर जिल्ह्यातील कुठल्याही भागात अगरबत्ती व त्यांची उत्पादने पोहोचवण्याची स्वावलंबीची तयारी आहे.
वैभव पाटील
Comments
Post a Comment