ऐतिहासिक घटनांची साक्षीदार "जव्हारची शिरपामाळ"

मागील आठवड्यात पालघरमधील जव्हार येथे जाण्याचा योग आला. निमित्त होते आमच्या जॉय ऑफ गिव्हिंग या सामाजिक संस्थेच्या वतीने तेथील कर्णबधिर मुलांच्या शाळेत शैक्षणिक साहित्य वाटपाच्या नियोजित कार्यक्रमाचे. त्यावेळी जव्हारचे सौंदर्य जवळून न्याहाळण्याचा आनंद घेतला. ठाण्यावरून गुजरात हायवेमार्गे मनोर फाट्यावरून उजवीकडे वळण घेतले की सरळ विक्रमगडमार्गे जव्हारला जाता येते. जव्हार हे एक नैसर्गिक शहर आहे. समुद्रसपाटीपासूनची त्याची उंची ५१८ मीटर आहे. त्यामूळे हे हिल स्टेशनच आहे. मुंबईपासून जव्हार १५० तर नाशिक पासून ८० किलोमीटरवर आहे. जव्हार मधील बहुसंख्य लोक आदिवासी समाजाचे आहेत. जव्हार हे खूप सुंदर ठिकाण असल्याने मुंबई, ठाणे, नाशीक यासारख्या शहरातून पर्यटक मोठ्या संख्येने येथे येतात. डोंगरामाथ्याची वळणे व रिपरिप पडणाऱ्या पावसाचा आस्वाद घेत आम्ही दुपारी एकच्या सुमारास जव्हारला पोहोचलो. शाळेतील कार्यक्रम आटोपल्यावर आम्ही तेथून जवळच असलेल्या 'शिरपामाळ' ह्या एतिहासिक स्थळाला भेट दिली. शिवरायांची अद्भुत दूरदृष्टीची आणि पराक्रमाची साक्ष देणारी ही शिरपामाळ म्हणजे एका दिव्य स्थळाचा अविष्कार आहे. पौष शुद्ध द्वितीया अर्थात ३१ डिसेंबर १६६३ रोजी सुरतेवर स्वारी करण्यासाठी छत्रपती शिवराय आपले सैन्य घेऊन जव्हार संस्थानात आले व तत्कालीन जव्हार संस्थानचे राजे विक्रमशहा यांनी शिवरायांचे स्वागत केले त्यांना मानाचा शिरपेच दिला. ज्या ठिकाणी त्यांची भेट झाली ते ठिकाण म्हणजे 'शिरपामाळ'. या ठीकाणी आजूबाजूचा परिसर चांगला विकसीत करण्यात आलेला आहे. या टेकडीवर गेल्यावर एकीकडे निसर्गसौंदर्याने नटलेले जव्हार तर दुसरीकडे दरीत नजर पोहोचत नाही तिथवर दूरचे दृश्य दिसते. लांबून येणारा शत्रू सहज नजरेस पडावा म्हणून या ठिकाणची निवड महाराजांनी केली असावी. हिंदवी स्वराज्याची स्थापना करतांना स्वराज्याचा विस्तार करण्याच्या हेतूने शिवाजी महाराजांची नजर सुरतेकडे वळली. सुरत म्हणजे ऐश्वर्य ! अनेक परदेशी व्यापारी इथून व्यापार करत असत. सुरत त्यावेळी मुघलांच आर्थिक केंद्र आणि प्रमुख व्यापारी बंदर होतं. सुरतेला जाताना महाराजांच्या मुक्कामाची जागा उंच भाग असलेल्या डोंगर टेकड्यांवर असे आणि रात्री प्रवासास निघत. ३१ डिसेंबर १६६३ या दिवशी शिवाजी राजे त्र्यंबकेश्वराच्या उत्तररांगांची खिंड आणि घाट उतरून जव्हार मुलुखात उतरले. त्यावेळी जव्हारचे विक्रमशहा यांनी राजे शिवछत्रपती जव्हार संस्थानात प्रवेशकर्ते झाले म्हणून आनंदाने त्यांचे जव्हारच्या सीमेवर असणाऱ्या उंच टेकडीवर जंगी स्वागत केले. जव्हार नरेश पहिले विक्रमशहा यांनी शिवाजी राजांना सुरतेकडे जाण्याच्या जवळच्या वाटांचे मार्गदर्शन केले. हा दिवस जव्हार संस्थांनच्या इतिहासातील एक सुवर्ण दिन ठरला. ज्या टेकडीवर छत्रपति शिवाजी महाराजांनी वास्तव्य केले ती जव्हार शहरातील टेकडी आज शिरपामाळ म्हणून ओळखली जाते. ५ जानेवारी १६६४ रोजी शिवाजी राजांनी सुरत लुटली. इतिहास काळापासूनचं लुट ह्या शब्दाचा अर्थ लुटणे किंवा हिसकावणे असा होतो. पण ह्या शब्दाला देखील महाराजांनी वेगळाच अर्थ दिला. लूट करत असताना कुठलेही ठिकाण सोडले जात नाही पण परधर्माची मंदिरेच काय, साध्या मुक्या जनावरांना देखील धक्का लागणार नाही अशी लुट शिवाजी राजाने घडविली. ४ दिवस हि लुट चालू होती. कृतज्ञता म्हणून महाराजांनी परतीच्या प्रवासात लुटीतील काही खजिना जव्हारच्या राजांना दिला. अशा ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या, जव्हार आणि राजे विक्रमशहा यांच्या  भेटीची साक्ष असणारी ही 'शिरपामाळ' छत्रपतींच्या  ऐतिहासिक कामगिरीची साक्ष देणारी आहे. तिथला काही काळ आम्हाला सदैव लक्षात राहणारा आणि इतिहासाची उजळणी करणारा ठरला एव्हढे नक्की. 


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त