राज्य मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा विभागाचे डॉ अरुण यादव सेवानिवृत्त

डॉ अरुण दिनकरराव यादव, सहाय्यक संचालक, मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा
डॉ अरुण दिनकरराव यादव. आरोग्य विभागातील मला भावलेल्या अधिकाऱ्यांपैकी एक संवेदनशील अधिकारी. मानवी अवयव प्रत्यारोपण कायद्याच्या अंमलबजावणीत सेवेचा बहुतांश काळ घालवलेले डॉ यादव, सहाय्यक संचालक पदावरून आयुक्तालयातून सेवानिवृत्त झाले. कार्यालयातील बहुतांश अधिकारी कर्मचाऱ्यांच्या व नातलगांच्या वैद्यकीय उपचारांमध्ये सदैव मदतीला धावून जाणारे अधिकारी म्हणूनदेखील ते परिचित आहेत. कामकाजात आपली भूमिका कुठलीही तडजोड मान्य न करता ठामपणे मांडणाऱ्या डॉ यादव सरांनी आपल्या भूमिकेसाठी अनेकदा वरिष्ठांची नाराजीही पत्करली. होटा कायद्याच्या सर्व बारीकसारीक खाचाखोणा माहीत असलेल्या डॉ यादव यांच्या निवृत्तीने या विभागात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. राज्यातील जिल्हा रुग्णालये, महिला रुग्णालयांसह मुंबईतील काही मोठ्या रुग्णालयांत महत्वाच्या पदावर काम केलेले डॉ यादव हे कान नाक घसा विशेषज्ञ. उत्तम रुग्णालयीन प्रशासक म्हणूनदेखील त्यांनी आपली छाप पाडली आहे. मूळचे कोल्हापूरचे असलेल्या डॉ यादव यांना पत्नीच्या निधनानंतर मोठ्या कौटुंबिक समस्यांचा सामना करावा लागला. मात्र अत्यंत संघर्षमय जीवन व्यतीत केलेल्या डॉ यादव सरांनी व्यक्तिगत आयुष्याचा कुठलाही परिणाम कार्यालयीन कामकाजात जाणवू दिला नाही. वैचारिक समानतेच्या निकषावर मला त्यांच्या सर्वाधिक सानिध्याचा लाभ घेता आला हे माझे भाग्यच आहे. त्यांच्या जमेच्या फिलॉसॉपी, पॉलिटिक्स, सामाजिक, जातीयता आदी विषयांशी निगडित धोरणांवर आम्ही कित्येक काळ चर्चा करत बसायचो. नागपूर येथे अधिवेशन काळात या चर्चांना अधिकच रंग चढायचा. माझ्या व्यक्तिगत आयुष्यात डॉ यादव सरांचे मार्गदर्शन व केलेली मदत विसरता येणार नाही. कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांच्या, ओळखीतल्या स्वकीयांच्या आजारपणात ते आपल्या ओळखीचा पुरेपूर वापर करून सदैव मदतीसाठी ठामपणे उभे राहायचे. डॉ डी वाय पाटील रुग्णालयात आजीच्या शस्त्रक्रियेवेळी ते स्वतः सकाळपासुन सोबत होते ही आठवण न विसरता येणारी आहे. त्यामुळे आज ते सेवानिवृत्त झाले असले तरी त्यांच्यासोबतचे ऋणानुबंध आयुष्यात कधीही कमी होऊ शकत नाहीत. त्यांना सुखी व निरोगी जीवनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.. 

वैभव

Comments

Popular posts from this blog

असा किर्ती कुमार न होणे

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा