अशा घटना रोखायला हव्यात

रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळील इर्शाळवाडी या आदिवासी वस्‍तीच्‍या सर्वात दुर्गम गावावर दु:खाचा डोंगर कोसळला. दरड कोसळून घडलेल्‍या ह्या दुर्घटनेत २८ जणांचा दुर्दैवी मृत्‍यू झाल्‍याची घटना ह्रदय हेलावणारी आहे. गडाच्‍या पायथ्याशी असलेलं इर्शाळवाडी गाव अक्षरशः उद्ध्वस्त झालं आहे. इर्शाळवाडी दरड दुर्घटना ही जणू काही वर्षांपूर्वी  झालेल्‍या माळीण दुर्घटनेची पुनरावृत्तीच आहे. यामुळे डोंगरमाथ्‍यांच्‍या पायथ्‍याशी असलेल्‍या गावांच्‍या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्‍हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. जिल्‍हा प्रशासनाने अशा प्रकारच्‍या धोकादायक स्‍थळांचा आढावा घेऊन सुरक्षेच्‍या दृष्‍टीने उपाययोजना करण्‍याची आवश्‍यकता निर्माण झाली आहे. इर्शाळवाडीसारख्‍या दुर्गम ठिकाणी जिथे कुठलीही व्‍यवस्‍था उपलब्‍ध नाही अशा ठिकाणे हेरुन तिथे दरड कोसळण्‍याच्‍या परिस्‍थीतीचा आढावा घेऊन पावसाळयात आपात्‍कालीन व्‍यवस्‍था उपलब्‍ध करुन दयायला हवी. ज्‍याप्रमाणे महामार्गांवर दरळ कोसळण्‍याच्‍या संभाव्‍य ठिकाणी लोखंडी जाळया बसवण्‍यात येतात त्‍याप्रमाणे डोंगरमाथ्‍यांशेजारी वसलेल्‍या गावांना संरक्षण दयायला हवे. प्रसंगी सुरक्षिततेचा उपाय म्‍हणून लोकांना अशा ठिकाणांवरुन इतरत्र स्‍थलांतरीत करायला हवे. खरेतर माळीण व इर्शाळवाडीची दुर्घटना एक धडा आहे. डिजीटल क्रांतीच्‍या युगात इतक्‍या मोठया दुर्घटनेची पूर्वकल्‍पना घेणे अशक्‍य नाही. गावेच्‍या गावे उध्‍वस्‍थ करणारी आपत्‍ती, त्‍यात नाहक बळी जाणारे निष्‍पाप जीव व गोरगरीबांच्‍या मालमत्‍तेचे प्रचंड नुकसान या सर्वांची भरपाई होऊ शकत नाही. आज इर्शाळवाडी दुर्घटनेत बचावलेल्‍या लोकांची लोकांची मानसिकता प्रचंड वेदनादायी आहे. अनेक कुटुंबांवर दुखःचा डोंगर कोसळलेला आहे. त्‍यांना सर्व स्‍तरातून आधार व मदतीची आवश्‍यकता आहे. कुटुंबातील सदस्‍यांच्‍या मृत्‍यूने बसलेला मानसिक आघात, उध्‍वस्‍थ घर व नष्‍ट झालेली मालमत्‍ता या सर्वांमधून सावरत नव्‍याने संसार उभा करण्‍याचे संकट त्‍यांचेसमोर आहे. यापूर्वीही अनेकदा घडलेल्या अशा घटनांमधून बोध घेत भविष्यात त्यावर मार्ग काढणे क्रमप्राप्त आहे जेणेकरून अशा घटनांमध्ये होणारी जीवित व वित्त हानी टाळता येईल.



वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त