इर्शाळवाडीला गरज आधाराची
- Get link
- X
- Other Apps
By
vaibhavpatil
-
रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळील इर्शाळवाडी या आदिवासी वस्तीच्या सर्वात दुर्गम गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. बुधवारी रात्री साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास इर्शाळगडावर दरड कोसळून घडलेल्या दुर्घटनेत १६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ह्रदय हेलावणारी आहे. गडाच्या पायथ्याशी असलेलं इर्शाळवाडी गाव अक्षरशः उद्ध्वस्त झालं आहे. ४५ ते ५० घरांच्या वस्तीच्या हया गावातील बहुतांश घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली आहेत. मुंबई-पुणे जुना महामार्गावरुन जात असताना कर्जत आणि पनवेलच्या मधोमध इर्शाळगडला जाण्यासाठीचा रस्ता असुन हे स्थळ रायगडमधील प्रसिद्ध ट्रेकिंग पॉईंटदेखील आहे. खालापूरजवळून मोरबे डॅम मार्गे गावाकडे जाता येते. इर्शाळवाडी दरड दुर्घटना ही जणू काही वर्षांपूर्वी झालेल्या माळीण दुर्घटनेची पुनरावृत्तीच आहे. यामुळे डोंगरमाथ्यांच्या पायथ्याशी असलेल्या गावांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. जिल्हा प्रशासनाने अशा प्रकारच्या धोकादायक स्थळांचा आढावा घेऊन सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. इर्शाळवाडीसारख्या दुर्गम ठिकाणी जिथे कुठलीही व्यवस्था उपलब्ध नाही अशा ठिकाणे हेरुन तिथे दरड कोसळण्याच्या परिस्थीतीचा आढावा घेऊन पावसाळयात आपात्कालीन व्यवस्था उपलब्ध करुन दयायला हवी. ज्याप्रमाणे महामार्गांवर दरळ कोसळण्याच्या संभाव्य ठिकाणी लोखंडी जाळया बसवण्यात येतात त्याप्रमाणे डोंगरमाथ्यांशेजारी वसलेल्या गावांना संरक्षण दयायला हवे. प्रसंगी सुरक्षिततेचा उपाय म्हणून लोकांना अशा ठिकाणांवरुन इतरत्र स्थलांतरीत करायला हवे. खरेतर माळीण व इर्शाळवाडीची दुर्घटना एक धडा आहे. डिजीटल क्रांतीच्या युगात इतक्या मोठया दुर्घटनेची पूर्वकल्पना घेणे अशक्य नाही. गावेच्या गावे उध्वस्थ करणारी आपत्ती, त्यात नाहक बळी जाणारे निष्पाप जीव व गोरगरीबांच्या मालमत्तेचे प्रचंड नुकसान या सर्वांची भरपाई होऊ शकत नाही. आज इर्शाळवाडी दुर्घटनेत बचावलेल्या लोकांची लोकांची मानसिकता प्रचंड वेदनादायी आहे. अनेक कुटुंबांवर दुखःचा डोंगर कोसळलेला आहे. त्यांना सर्व स्तरातून आधार व मदतीची आवश्यकता आहे. कुटुंबातील सदस्यांच्या मृत्यूने बसलेला मानसिक आघात, उध्वस्थ घर व नष्ट झालेली मालमत्ता या सर्वांमधून सावरत नव्याने संसार उभा करण्याचे संकट त्यांचेसमोर आहे. संवेदनशील समाज व शासन त्यांना यातून सावरायला नक्कीच मदत करेल अशी आशा आहे.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment