जीवावर बेतणारे पर्यटन काय कामाचे?

सहलीसाठी जाणारे पर्यटक, विविध दुर्घटनांमध्ये दगावण्याचे प्रकार नवे नाहीत. अतिउत्साहीपणा, अतिधाडस, आततायीपणा, सेल्फीचा नाद, मद्यपान करून पाण्यात उतरणे, स्थानिकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणे, भौगोलिक परिस्थितीचे ज्ञान नसणे यासारखे घटक अपघातास कारणीभूत ठरत आहेत. दुर्घटनांमध्ये सातत्याने होणाऱ्या मृत्यूंमुळे अनेक धबधबे व पावसाळी पर्यटन स्थळे प्रशासनाला बंद ठेवावी लागतात. वास्तविक पावसाळ्यात निसर्गाचे एक प्रकारे विलोभनीय दृष्य पाहायला मिळते. त्यामुळे हौशी पर्यटकांना पावसाळी सहल म्हणजे एक पर्वणीच असते. निसर्गाचा खराखुरा आस्वाद पावसाळ्यातच घेता येतो. त्यामुळे पावसाळ्यात अनेक ठिकाणी बंदी आणून एक प्रकारे पर्यटकांच्या निसर्ग अनुभवण्याच्या अधिकारावर गदा आणली जाते. पर्यटक याबाबत अनेक ठिकाणी नाराजी व्यक्त करतात. स्थानिकांचे रोजगार बुडत असल्याने त्यांनीही यावर आक्षेप नोंदवला आहे. त्यामुळे हुल्लडबाजी करून अपप्रकार करणाऱ्यांना रोखण्यासाठी पावसाळ्यात अशा ठिकाणी विशेष सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करायला हवी. तसेच पर्यटकांनीही वर्षा सहलीचा आणि पावसाळ्यातील निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेत असताना काही गोष्टींची खबरदारी घेण्याची गरज आहे. पर्यटन स्थळांवर स्टंटबाजी रोखायला हवी. धबधबे, नदी, तलाव, धरणे याठिकाणी सहलीस गेल्यावर तर अधिक दक्ष राहावे लागते कारण तिथे एखादी छोटी चूकही जीवघेणी ठरु शकते. उत्साहाच्या भरात अनेकांना त्याचे भान राहत नाही व अपघात घडतात. त्यामुळे पावसाळ्यात पर्यटन स्थळांचा मनमुराद आनंद लुटा मात्र आपला उत्साह आपल्या जीवावर बेतणार नाही याची खबरदारी बाळगायलाच हवी.



वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त