रस्ते सुस्थितीत करा
महाराष्ट्रातील सत्ताकारणाचा पार खेळखंडोबा झालेला आहे. विधानसभा निवडणुकांना जेमतेम एक वर्ष बाकी असताना राष्ट्रवादीतील एका गटाने थेट भाजप सेनेच्या युती सरकारमध्ये सामील होत लोकांना आणखी एक धक्का दिला. लोकशाही मध्ये लोकांच्या मतांना आणि आता भावनांनादेखील शून्य किंमत राहिल्याचे दिसून येत आहे. आपण फक्त उमेदवारांना मते द्यायची मग त्यानंतर त्या उमेदवाराने पक्ष धोरणे, तत्वे सोडून कुठल्याही राजकीय पक्षासोबत मिलाप करावा अशी न भूतो परिस्थिती सध्या महाराष्ट्रात आहे. यात मतदारांना काय मिळते? तर वर्षानुवर्षे खराब रस्ते, गर्दीचा व जीवघेणा प्रवास, महागाई आणि बेरोजगारी. केंद्र व राज्य सरकारकडून रस्ते विकासासाठी मोठमोठे प्रकल्प राबविले जात असताना मुंबई ठाण्यापासून हाकेच्या अंतरावरील मुंबई गोवा, नाशिक, भिवंडी वाडा मनोर महामार्गांची दुरवस्था कुणालाच दिसत नाही. वर्षातून एकदा हे रस्ते डागडुजी करून दुरुस्त केले जातात जे एकाच पावसाळ्यात चाळणीसारखे होऊन जातात. या रस्त्यांचे फोटो पाहिल्यावर चांद्रयान मोहीमेत चंद्राच्या पृष्ठभागावरील फोटो काढल्याचा भास होतो. त्यामुळे रस्त्यांच्या देखभालीसाठी दरवर्षी वापरला जाणारा निधी नेमका कुठे मुरतो याचे उत्तर शोधावे लागेल. आजूबाजूचे रस्ते व महामार्ग चकाचक झालेले असताना अनेकांचे बळी घेणारे हे महामार्ग नव्याने का तयार करण्यात येत नाही हादेखील एक यक्षप्रश्नच आहे. मुंबई पुणे, समृद्धी महामार्गांसाठी वापरण्यात आलेले तंत्रज्ञान राज्यातील इतर रस्त्यांसाठीदेखील वापरणे गरजेचे आहे. मुंबईतील नोकरदार मंडळींचा सर्वाधिक प्रवास कोकणात होत असतो. अशा परिस्थितीत सुस्थितीतील रस्तेदेखील त्यांच्या नशिबी नसतील तर दुर्दैव दुसरे काय!
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
Comments
Post a Comment