ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे दुःखद निधन

ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे वयाच्या ८८व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले आहे. जयंत सावरकर यांनी मराठी रंगभूमिपासून आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. १९५५ पासून रंगभूमीशी नाळ जुळलेल्या सावरकर यांनी त्यावेळी पडद्यामागे राहून मिळेल ती छोटीमोठी कामे अगदी प्रोम्पटिंग केले, प्रॉपर्टीची मांडणी केली, पार्श्वसंगीत वाजवण्यास मदत केली, तर कधी हिशोब लिहिणे तर कधी डोअर किपिंगचे सुद्धा काम त्यांनी केले होते. मोठ्या संघर्षातून त्यांनी नंतर नाट्य, टीव्ही व चित्रपटसृष्टीत आपला जम बसवला. मिळालेल्या भूमिकेशी अत्यंत प्रामाणिक राहिल्याने त्यांना सकारात्मक भूमिका मिळत गेल्या व त्यांनी त्या भूमिकांना योग्य न्यायदेखील दिला. अपराध मीच केला या नाटकात त्यांनी साकारलेली गोळे मास्तरची भूमिका खूप गाजली. प्रपंच, ईजा बिजा तिजा, धमाल बाबल्या गणप्याची, गडबड गोंधळ, झंगडगुत्ता, गजरा, अपूर्णांक,अलीबाबा चाळीस चोर, अल्लादीन जादूचा दिवा, आम्ही जगतो बेफाम, एकच प्याला, कळलाव्या कांद्याची कहाणी अशा नाटक चित्रपट तसेच मालिकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली. त्यांच्या सहजसुंदर अभिनयाने घराघरातील लोकांच्या मनात त्यांनी आपले वेगळे व आदराचे स्थान निर्माण केले. सिंघम, शासन, वास्तव, समुद्र या हिंदी चित्रपटातूनही ते महत्वपूर्ण भूमिकेत झळकले होते. ‘मी एक छोटा माणूस’ हे आत्मचरित्र त्यांनी लिहिलं आहे. जयंत सावरकर यांना मराठी सृष्टीत अण्णा म्हणून ओळखले जाते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत १०० हून अधिक नाटकातून काम केलं आहे.  आज त्यांच्या निधनाने जुन्या जाणत्या अनुभवी कलावंताचा एक अध्याय काळाच्या पडद्याआड गेला असला तरी अनेक अजरामर कलाकृतीतुन त्यांचे अस्तित्व नेहमीच जाणवत राहील एव्हढे नक्की. त्यांना भावपूर्ण आदरांजली. 



वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त