तब्बल २२ वर्षांनी झाली वर्गमित्र प्रसादची भेट

३० जुलै - जागतिक मैत्री दिनाच्या निमित्ताने

*तब्बल २२ वर्षांनी झाली वर्गमित्र प्रसादची भेट*

आपला जवळचा मित्र वा सोबती काही दिवस जरी नजरेआड झाला तरी आपण अस्वस्थ होतो. मित्रांमधील नात्याचे ही पकड शालेय जीवनापासून ते कॉलेजपर्यंत अगदी घट्ट बांधलेली असते. मात्र एकदा शिक्षण संपवून करीअरच्या मागे लागले की शाळा कॉलेजमधील जुने मित्र भेटेनासे होतात आणि मग अचानक एके दिवशी त्यांची भेट झाल्यावर होणारा आनंद गगनात मावेनासा असतो. अशीच घटना दोन महिन्यांपूर्वी माझ्या बाबतीत घडली. वाड्यात पीजे कॉलेजला महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना माझ्याच वर्गात शिकलेला प्रसाद गणोरे हा माझा वर्गमित्र मला उन्हाळी सुट्ट्यांमध्ये वाडा येथे सुरू असलेल्या एका बाल संस्कार शिबिरादरम्यान त्या दिवशी भेटला. आपला वाढदिवस शिबिरातील मुलांसोबत साजरा करण्यासाठी प्रसाद सहकुटुंब तिथे आला होता. नेमके त्याच दिवशी मीदेखील आमचे परमस्नेही हभप श्री राजेश बांगर यांनी आयोजित केलेल्या त्या निवासी बाल संस्कार शिबिराला भेट देण्यासाठी तिथे पोहोचलो होतो. योगायोगाने आम्हाला कॉलेजमध्ये शिकवणारे प्राध्यापक मोकाशी सर देखील शिबिरातील मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी तिथे आल्याने आम्ही दोघे विद्यार्थी आणि आमचे शिक्षक या तिघांची अनपेक्षित भेट तब्बल २२ वर्षानंतर घडून आली. लहान मुलांसोबत वेळ घालवायला गेलेलो आम्ही आमच्यादेखील बालपणात रमून गेलो. प्रसाद सध्या डहाणू येथे एलआयसीमध्ये विकास अधिकारी म्हणून कार्यरत आहे तर मोकाशी सर सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य व्यतीत करत आहेत. २२ वर्षानंतर झालेल्या ह्या मित्र - शिक्षक भेटीने मी पुरता भारावून गेलो होतो. प्रसादचीही अवस्था काही वेगळी नव्हती. त्यानंतर मुलांसोबत आम्ही काही काळ व्यतीत करत त्यांना खाऊचे व शैक्षणिक साहित्याचे वाटपही केले. इतक्या वर्षानंतर भेटीचा आनंद आमच्या गप्पांमधून लपून राहत नव्हता. सरांनीही आमच्या मैत्रीचे व सामाजिक उपक्रमांचे कौतुक करत कॉलेज जीवनातील आठवणींना उजाळा दिला. मुलांसाठी त्या दिवशी आम्ही विविध स्पर्धाही घेतल्या. प्रसाद व मोकाशी सरांना मी माझी स्वलिखित पुस्तके तर प्रसादने त्याच्या वडिलांचा काव्यसंग्रह मला भेट दिला. सामाजिक जाणिवेतून गरीब गरजू लोकांसाठी काहीतरी मदत करण्याचे ध्येय बाळगणाऱ्या प्रसादचे भविष्यात एखाद्या सोशल ग्रुप अथवा संस्था उभी करून त्या माध्यमातून समाजकार्य करण्याचे उद्दिष्ट असून त्याच्या ह्या उपक्रमात सर्वतोपरी योगदान देण्याचा मनोदय मी त्याच्याकडे व्यक्त केला. आज मैत्री दिनाच्या निमित्ताने माझ्या एका खास मित्राची ही तोंडओळख. माझ्या सर्व मित्रांना, सहकाऱ्यांना, शुभचिंतकांना मैत्री दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.. 

वैभव 


Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त