मोबाईल खिशातून पडला अन..
- Get link
- X
- Other Apps
By
vaibhavpatil
-
सन २००८-०९ सालची घटना असेल. नोकरीवर नवीनच रुजू झालो होतो. रोजचा घणसोली ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंतचा रेल्वे प्रवास म्हणजे माझ्यासाठी एक दिव्यच पार करण्यासारखे होते. घणसोलीवरून ट्रान्स हार्बरने ठाणे आणि ठाण्यावरून मध्य रेल्वेमार्गे सीएसएमटी असा रोजचा गर्दी आणि धकाधकीचा प्रवास असायचा. ठाण्यावरून लोकल पकडताना प्रचंड दडपण असायचे. अशातच नऊ नंबरच्या प्लॅटफॉर्मवरून धीम्या लोकलसाठी चार किंवा जलद लोकलसाठी सहा नंबरच्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी जिन्यात आणि ब्रिजवर प्रचंड कसरत असायची. प्रचंड रेटारेटी, डब्यातील असह्य गर्दीतून प्रवास करत ऑफिसला पोहोचल्यावर काहीतरी मोठा पराक्रम केल्याचा भास व्हायचा. अशातच एके दिवशी ठाणे स्थानकात जिन्यावरून चढताना खिश्यातून काहीतरी पडल्याचा भास झाला. पण गर्दीमुळे त्या ठिकाणी उभे राहून नक्की काय पडलेय हेदेखील पाहणे सोयीचे नव्हते. त्यामुळे नऊ नंबर प्लॅटफॉर्मचा जिना चढल्यावर पाहतो तर खिशातून मोबाईल गायब होता. गर्दीच्या रोजच्या धक्क्यांपेक्षा हा धक्का मला मोठाच होता जो पचवणे सहज शक्य नव्हते. त्यामुळे थोडे थांबून गर्दी कमी झाल्यावर तो जिना अक्षरशः पिंजून काढला पण मोबाईल काही हाती लागला नाही. तोवर नेहमीच्या बऱ्याचशा लोकल्सदेखील निघून गेल्या होत्या. बाहेर येऊन माझ्याच मोबाईल नंबरवर फोन करत राहिलो मात्र कुणी फोन उचललाच नाही. शेवटी बहुधा बॅटरी संपल्यामुळे मोबाईल लागणेही बंद झाले. तेव्हा नंबर पाठ असलेल्या एका मित्राला फोन केला व घडलेली हकीकत सांगितली. त्याने प्लॅटफॉर्मवरील पोलीस चौकीत जाऊन रीतसर तक्रार नोंदवण्यास सांगितले व त्याची प्रत घेऊन व्होडाफोन कंपनीच्या गॅलरीत जाऊन जुने सिमकार्ड तात्काळ बंद करून नवीन सिमकार्ड घेण्यास सांगितले. तोवर बराच वेळ गेला होता. शेवटी हताश होत मी मित्राने दिलेल्या सल्ल्याप्रमाणे केले. पण रेल्वे प्रवासातील तो प्रसंग मनातून आजही जात नाही. काही वर्षांनी मी ठाणे मार्गे प्रवास बंद करून वाशी मार्गे सीएसएमटी असा प्रवास सुरु केला जो आजही तसाच सुरू आहे.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment