तंबाखूमुक्त महाराष्ट्र हवा

राज्‍यात गुटखाविक्रीवर बंदी असली तरी गुटख्‍याची निर्मिती व वितरण अजिबात थांबलेले नाही. आजकाल सार्वजनिक ठिकाणांवर सरेआम गुटका व तंबाखूजन्‍य विकले जातात. ठोस कारवाई व यंत्रणेचा अभाव यामुळे हया गुटखा माफियांना कुणाचे भय राहिलेले नाही. या गंभीर सामाजिक विषयाकडे अधिक लक्ष केंद्रित करण्‍याची गरज असुन तंबाखू व तंबाखूजन्‍य पदार्थांच्‍या सेवनामुळे होणा-या दुष्‍परिणामांवर पुन्‍हा एकदा विचारमंथन करण्‍याची आवश्‍यकता निर्माण झाली आहे. भारतीय स्‍वातंत्र्याचा ७७ वा वर्धापन दिन येत्‍या १५ ऑगस्‍ट रोजी आपण साजरा करत आहोत. देशाला स्वातंत्र्य मिळून सात दशके लोटली तरी आपण अनेक अनिष्ट, अनुचित रूढी, परंपरा, सवयीच्या जोखडात बंदिस्त आहोत. व्‍यसन हे कुठलेही वाईटच. मात्र अनेक व्‍यसने ही प्राणघातक ठरु शकतात. त्यातीलच एक घातक व्‍यसन म्हणजे तंबाखू सेवन. आज आपल्याभोवती वावरणाऱ्या बहुतांशी लोकांना तंबाखूचे व्यसन असल्याचे दिसून येते. गुटखा, खर्रा, जर्दा, विडी, सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थांच्या विळख्यात आपला समाज आज सापडलेला आहे. आज आपण कार्यालये, सार्वजनिक स्‍थळे, बस, रेल्‍वे परिसर, सिनेमागृहे, सार्वजनिक प्रसाधनगृहे ही  सर्वच ठिकाणे बारकाईने पाहीली तर त्‍या ठिकाणी हे व्‍यसनी लोक हे परिसर अस्‍वच्‍छ व दुर्गंधीयुक्‍त करताना दिसतात. सरकारने तंबाखूबंदीचे कडक कायदे आणूनदेखील या पदार्थांचे सेवन करणारे आणि ही उत्‍पादने निर्माण करणारे लोक त्याला जुमानेसे झाले आहेत. तंबाखूविरोधी कायदा आज राज्‍यात अस्तित्‍वात आहे. तंबाखूच्या या पदार्थांची विक्री खुलेआम आज टपऱ्यांवर, बाजारात, रेल्वे मध्ये, कार्यालयांमध्ये होताना दिसते. तंबाखूच्या दुष्परिणामांची माहीती असतानादेखील त्याचे सेवन म्हणजे आत्मघातकीपणाच म्हणावा लागेल. मात्र व्यसनी लोक त्याच्या इतके आहारी गेले आहेत की त्यांचे व्यसन सोडवणे म्हणजे एक दिव्यच आहे अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आज देशाच्या स्‍वातंत्र्यदिनी तंबाखूमुक्‍तीची शपथ सर्वत्र देणे आवश्‍यक आहे. तंबाखूमुक्‍तीचा नारा आजच देऊन राज्‍य व देश तंबाखूमुक्‍त करणे काळाची गरज आहे. आज बहुतांशी सर्वच शाळा, महाविदयालये, सरकारी कार्यालये, चौक, पदपथ, राजकीय कार्यालये, गृहनिर्माण संस्‍थांच्‍या ठिकाणी स्‍वातंत्र्यदिनी ध्‍वजारोहनाचा कार्यक्रम आयोजित करण्‍यात येतो. त्‍यावेळीच उपस्थित नागरिकांना, शालेय- महाविदयालयीन विदयार्थ्‍यांना तंबाखूमुक्‍तीची शपथ देणे गरजेचे आहे. तंबाखूचे दुष्‍परिणाम व त्‍यापासुन होणा-या कर्करोगासारख्‍या गंभीर आजारांची माहिती सर्वांना करुन देण्‍यात यावी जेणेकरुन तंबाखूजन्‍य पदार्थांपासुन ते परावृत्‍त होतील व इतरांना देखील दुर ठेवण्‍याचा प्रयत्‍न करतील. तंबाखूमुक्‍त महाराष्‍ट्रासाठी ठोस प्रयत्‍न होणे गरजेचे असुन स्‍वातंत्र्य दिनापासुन त्‍याची सुरुवात करायला काय हरकत आहे?


वैभव मोहन पाटील
घणसोली,  नवी मुंबई


Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त