श्रीमती चंदा धुरंदर उ.श्रे. लघुलेखक यांची स्वेच्छानिवृत्ती
श्रीमती चंदा धुरंदर, उच्चश्रेणी लघुलेखक. ९०च्या दशकात स्टेनोग्राफर म्हणून आरोग्य सेवेत रुजू झालेल्या सौ. धुरंदर यांनी ३२ वर्षांची प्रदीर्घ सेवा बजावून शासन सेवेतून स्वेच्छा निवृत्ती स्वीकारली. आरोग्य विभागातील अनेक प्रशासकीय कक्षांमध्ये काम केलेल्या धुरंदर यांनी खरेदीसारख्या किचकट विभागात जवळपास दहा वर्षे कामकाज केले. दोन वर्षांपूर्वीच त्या मा आयुक्त कक्षात रुजू झाल्या. मात्र प्रकृती अस्वास्थ्य व कौटुंबिक जबाबदाऱ्या यामुळे त्यांनी स्वेच्छा निवृत्तीचा मार्ग पत्करला. त्यांचे पती नेव्हीत असून मुलगा सध्या टीसीएस मध्ये कार्यरत आहे. त्यामुळे कौटुंबिक स्थिरता प्राप्त करण्यासाठी त्यांनी निवृत्ती स्वीकारली. स्टेनोग्राफर या पदाला एकेकाळी अष्टपैलूत्व बहाल होते. कार्यालयातील रिसोर्स पर्सन म्हणून तो ओळखला जायचा. कालपरत्वे, संगणकातील आधुनिक क्रांतीमुळे शॉर्टहॅन्ड हा एकेकाळचा हुकमी पॅटर्न शासकीय कामकाजातून हद्दपार होऊ पाहतोय. त्यामुळे स्टेनोग्राफर पदाच्या मूळ जबाबदाऱ्या दूर होत त्याचे रूपांतर आता अधिकाऱ्यांचे स्वीय सहाय्यक, टायपिस्ट, दूरध्वनी इथपर्यंत सिमित होत असल्याचे पाहायला मिळत आहे. असो, सौ धुरंदर यांच्यासोबत मागील दोन वर्षे काम करण्याची संधी मिळाली. त्यांचेवर सोपवलेली एखादी जबाबदारी त्याच दिवशी पार पाडून मगच कार्यालय सोडण्याची त्यांची सवय विशेष भावली. बाकी आरोग्य सेवेतील त्यांचे ज्ञान व अनुभव नक्कीच प्रगल्भ आहे. त्यांच्या स्वेच्छानिवृत्तीने विभागातील आणखी एका अनुभवी स्टेनोची खुर्ची रिकामी होतेय. काल कार्यालयातच एका छोटेखानी कार्यक्रमाच्या माध्यमातून कार्यालयीन सहकाऱ्यांसह त्यांना औपचारिक निरोप देत निरोगी व समाधानी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
वैभव
Comments
Post a Comment