मुंबई लोकलची बिकट अवस्था

मुंबई उपनगरीय लोकल गाड्यांमधील बहुतांश डब्यांमधील दरवाजे व खिडक्या नादुरुस्त अवस्थेत आहेत. दरवाजे व खिडक्या बंदच होत नसल्याने सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात त्याचा मोठा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. खिडकी उघडणे व बंद करणे प्रवाश्यांसाठी एक दिव्यच असते. दररोजच्या कटकटीमुळे प्रवाशी हैराण आहेत. एकदा खिडकी उघडली तर बंद होत नाही आणि एकदा बंद झाली तर ती उघडता उघडता नाकी नऊ येतात अशी अवस्था आहे. जेष्ठ नागरिक तर ह्या उघडझाप क्रियेत पडतच नाहीत. पावसाचे पाणी ह्या तुटलेल्या खिडक्यांतून थेट आत येत असल्याने प्रवाशांना एकतर भिजत प्रवास करावा लागतो किंवा सीट सोडून उभ्याने प्रवास करावा लागतो अशी अवस्था अनेक गाड्यांमध्ये आहे. अनेक डब्यांतील दरवाजे बंदच होत नाहीत. त्यामुळे भर पावसात गाडीतून चढउतार करताना दरवाजात पाणी पडत असल्याने प्रवाशांना पावसाचे पाणी अंगावर घेत कार्यालय गाठावे लागते. मेल एक्सप्रेस गाड्यांमध्ये ज्या तत्परतेने अशा नादुरुस्त साहित्याची देखभाल केली जाते तशी लोकल डब्यांची केली जात नाही हे लोकल प्रवाशांचे दुर्दैव आहे. लांब पल्ल्यांच्या गाड्यांप्रमाणे लोकल गाड्यांचीही नियमित देखभाल केली गेली पाहिजे. मात्र दुर्दैवाने तसे होत नसल्याने सध्याचा पावसाळा लोकल प्रवाशांसाठी काहीसा असह्यच बनलेला आहे. रेल्वे प्रशासनाने ह्या त्रासाची दखल घेऊन सर्वच उपनगरीय लोकल गाड्यांमधील खिडक्या व दरवाजे दुरुस्त करून प्रवाशांचा प्रवास सुखकर करावा. 



वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त