रुग्ण व रुग्णालयांमध्ये सुसंवाद असावा

ठाण्यातील कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रविवारी घडलेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे. एका रात्रीत रुग्णालयात तब्बल १७ मृत्यू होत असतील तर ते निश्चितपणे रुग्णालयीन अपयशच मानावे लागेल. असे असले तरी सदरच्या रुग्णालयावरील रुग्णांचा भार, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी संख्या व दाखल होत असलेल्या रुग्णांची स्थिती हे मुद्देदेखील विचारात घ्यावे लागतील. ठाणे व पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागांतून मोठ्या संख्येने रुग्ण कळवा रुग्णालयात संदर्भित होत आहेत. वैद्यकीय महाविद्यालय संलग्न असल्याने गेली कित्येक वर्षे हे रुग्णालय असंख्य रुग्णांना चांगल्या प्रतीच्या सेवा देत आहे. मात्र गेल्या काही वर्षांत मुख्यत्वे कोविड काळापासून या रुग्णालयावरील रुग्णसंख्येचा ताण वाढत असून त्याचा परिणाम रुग्णसेवा बाधित होण्यावर होताना दिसत आहे. ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय अगोदर कोविड समर्पित होते व सध्या अद्ययावत सुविधांसह नव्याने उभारण्याचे काम प्रगतीपथावर असल्याने हे रुग्णालय मनोरुग्णालयाशेजारी स्थलांतरित झाले असून कळव्याच्या रुग्णालयावरील वाढता भार चिंताजनक आहे. अवाढव्य ठाणे जिल्हा व त्याला जोडले गेलेले पालघर व रायगड हे दोन भौगोलिकदृष्ट्या मोठे विस्तारित जिल्हे येथून मोठ्या संख्येने रुग्ण ठाण्यात उपचारांसाठी दाखल होत आहेत. ठाण्यातही त्यांना बेड मिळाला नाही तर असे रुग्ण मुंबईच्या रुग्णालयांमध्ये पाठवण्यात येतात. अशा वेळी रुग्ण अत्यवस्थ होऊन गंभीर होण्याचे प्रमाण वाढते आहे. यात अनेक रुग्णांना जीवदेखील गमवावा लागतो. त्यामुळे या तीनही जिल्ह्यांची लोकसंख्या व रुग्ण यांच्या दृष्टीने शासकीय रुग्णालयांची संख्या अपुरीच आहे. त्यामुळे ठाणे, नवी मुंबई व मुंबई या मोठ्या बजेटच्या महानगरपालिकांनी रुग्णालय क्षमता व रुग्णसेवांमध्ये वाढ करायला हवी. संदर्भित होणारे रुग्ण बऱ्याचदा गंभीर अवस्थेत येत असतात. ग्रामीण भागातून येणारे बहुतांश रुग्ण सर्पदंश, विंचूदंश, कावीळ यासारखे असतात तर सध्या डेंग्यु, मलेरिया यासारख्या साथीचे रुग्णदेखील वाढत आहेत. त्यामुळे त्यांना योग्य व तातडीचे उपचार मिळणेसाठी रुग्णालयांमधील अत्यावश्यक सेवा अधिक सक्षम करायला हवी. रुग्णांच्या वर्तमान स्थिती नुसार वर्गीकरण करून उपचार सुरू केल्यास मृत्यूचे प्रमाण नक्कीच कमी करता येईल. प्रत्येक रुग्णाचा जीव महत्वाचा असून तो वाचवणे रुग्णालय व डॉक्टरांच्या हाती आहे. तसेच रुग्णालय प्रशासनाने रुग्णाच्या नातलगांशी सुसंवाद साधत त्यांना रुग्णाची अवस्था व उपचारांबाबत योग्य माहिती दिल्यास संभाव्य संघर्ष देखील टाळता येईल. शेवटी डॉक्टर, रुग्णालय, पेशंट व त्यांचे नातेवाईक एकमेकांना पूरक घटक आहेत. त्यांचा परस्पर समन्वय व विश्वासार्हता रुग्णसेवेला अधिक बळकट करणारी ठरणार आहे. 



वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त