चांगले लोकप्रतिनिधी निवडून द्या
आजकाल सार्वजनिक हिताच्या प्रत्येक कामात राजकीय हस्तक्षेपाचे प्रमाण वाढत आहे. कुठलाही प्रकल्प, रस्ता, वास्तू तयार करताना त्यात काम करणाऱ्या कंत्राटदारांना अनंत अडचणी येत असतात. अगदी राजकीय नेत्यांपासून अधिकाऱ्यांपर्यंत मोठी जुळवाजुळव करत कंत्राटे मिळवली जातात व त्यानंतर त्यांना टक्केवारी वाटण्यात रस्ता वा प्रकल्पाची गुणवत्ता खालावली जाते. अनेक प्रकल्प तर श्रेयवादाच्या लढाईत अडकून पडले आहेत. एखाद्या ठिकाणचा प्रकल्प उदघाटनासाठी तयार असेल तर त्याचे लोकार्पण करण्यावरून स्थानिक नेत्यांमध्ये जुंपते. नेरुळ उरण रेल्वेमार्ग, बेलापूर पेंधर मेट्रोमार्ग लोकार्पणासाठी बड्या नेत्यांना वेळ नसल्याने खोळंबला आहे. मागील वर्षी ऐरोली येथे तयार होत असल्येल्या नाट्यगृहाच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी अशाच प्रकारचा राजकीय राडा नवी मुंबईकरांनी अनुभवला होता. ठेकेदार, बिल्डर, छोटेमोठे कंत्राटदार यांनी कामे सुरू केल्यानंतर राजकीय पुढाऱ्यांचा त्यातील हस्तक्षेप व अपेक्षा वाढत चालल्यामुळे तेदेखील हैराण आहेत. जोवर समाजाला चांगले लोकप्रतिनिधी मिळत नाहीत तोवर विकासकामांमध्ये गती व पारदर्शकता मिळणार नाही. यासाठी निवडणुकांमध्ये लोकांच्या प्रश्नांची जाण असणारे व त्यासाठी कुठलीही तडजोड न स्वीकारणारे लोकप्रतिनिधी निवडून देण्याची जबाबदारी तुमची आमची सर्वांची आहे.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
Comments
Post a Comment