एक अजनबी चित्रकार

काल सायंकाळी नेहमीप्रमाणे कार्यालयातून सुटल्यावर सीएसएमटी ते वाशी लोकलप्रवास करत होतो. वाशी गाडी पकडल्यावर नेहमीप्रमाणे सीट पकडून मोबाईलवर टाईप करत लिखाणाला लागलो. काही वेळाने लक्षात आले बाजूला विंडो सीटवर बसलेली व्यक्ती बॅगेतून ड्रॉईंग बुक काढून पेन्सिलने काहीतरी रेखाटत होती. समोर बसलेल्या एका लहान मुलीकडे थोड्या थोड्या वेळाने पाहत चित्र रेखाटण्याचे त्याचे काम सुरूच होते. काही वेळाने कुर्ल्याला ती मुलगी आपल्या पालकांसह उतरली मात्र डोळ्यात साठवलेल्या कल्पनाचित्राच्या साहाय्याने त्या व्यक्तीने मुलीचे चित्र हुबेहूब कागदावर वठवत पूर्ण केले. त्यांनतर त्या मुलीच्या मागे दरवाज्याच्या जवळ बसलेल्या एका प्रवाशाचे चित्र काढण्यात ती व्यक्ती मग्न झाली. मीदेखील काही वेळ माझ्या लिखाणात गुंतलो. वाशी आल्यावर चित्रावर नजर टाकली तर आमच्या समोरचे काही वेळापूर्वीचे ते चित्र, ती लहान मुलगी व तिच्या मागे खाली बसलेल्या व्यक्तीसह अगदी तंतोतंत त्या कागदावर उतरले होते व तेदेखील केवळ ३०-३५ मिनिटांमध्ये. उतरताना त्या चित्राचा फोटो घेत व प्रशंसा करत मी त्या व्यक्तीची तोंडओळख करून घेतली तर मध्य मुंबईमध्ये एका खाजगी कंपनीत कामाला असलेला कपिल सिंग नामक हा व्यक्ती केवळ छंद म्हणून डोळ्यांना दिसणारी व मनाला आवडणारी प्रत्येक गोष्ट कागदावर चित्राच्या माध्यमातून रेखाटत असल्याचे समजले. आज त्याची ही कला एका नोकरदाराबरोबर एक "कलाकार" म्हणूनदेखील त्यांची ओळख निर्माण करणारी ठरत आहे. छंदाचे रूपांतर काही काळात कलेमध्ये होते व हीच कला आयुष्यात समाधान व आत्मविश्वास निर्माण करण्याचे साधन होऊन जाते हे पुन्हा एकदा ह्या उदाहरणावरून उमजले. निरोप घेताना मुद्दामच कपिल यांचा मोबाईल नंबर घेतला नाही कारण 'अगर किस्मत मे हुआ तो फिर मिलेंगे मगर अजनबी नही दोस्त बनकर!'

 वैभव

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त