मुंबईत भटक्या कुत्र्यांची गणना

मुंबई व उपनगरांमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे नागरिकांना रात्री अपरात्री, भल्या पहाटे त्रासाला सामोरे जावे लागते. निर्जन ठिकाणी ही कुत्री लोकांचा पाठलाग करत त्यांचे लचके तोडत असल्याचीही अनेक उदाहरणे समोर आली आहेत. मुंबईत २०१४ मध्ये भटक्या कुत्र्यांची गणना झाली होती. त्यानंतर भटक्या कुत्र्यांच्या संख्येत वाढ होत आहे. सार्वजनिक ठिकाणे, बस, रेल्वे स्थानकांच्या ठिकाणीही ही कुत्री ठाण मांडून बसलेली दिसतात. त्यामुळे मुंबईकर या भटक्या कुत्र्यांपासून हैराण आहेत. ह्युमन सोसायटी इंटरनॅशनल संस्थेच्या माध्यमातून भटक्या कुत्र्यांची गणना होणार आहे. गेल्या पाच वर्षांत भटक्या कुत्र्यांनी साडेतीन लाख मुंबईकरांना चावा घेतल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. सन २०१४ मध्ये मुंबई महापालिकेने ह्युमन सोसायटी ऑफ इंटरनॅशनल संस्थेच्या माध्यमातून श्वानांची गणना केली असता मुंबईत जवळपास ३ लाख भटके कुत्रे आढळले होते. मात्र सध्या मुंबईत भटक्या कुत्र्यांची संख्या नेमकी किती हे निश्चित नसल्याने महापालिका आता ह्युमन सोसायटी इंटर नॅशनल संस्थेच्या माध्यमातून भटक्या कुत्र्यांची गणना करत आहे. शहरातील वयोवृद्ध नागरिक, लहान मुले, महिला यांना मुख्यत्वे या कुत्र्यांचा सर्वाधिक त्रास होतो. भटक्या कुत्र्यांची संख्या वाढतच असल्याने पालिकेच्या निर्बिजिकरण प्रक्रियेवरच शंका घेण्यास वाव आहे. भटक्या कुत्र्यांची ही संख्या आटोक्यात आणण्यासाठी कुठलीही ठोस मोहीम हाती घेण्यात येत नसल्याने पालिका या गंभीर सामाजिक प्रश्नाविषयी उदासीन असल्याचे दिसून येते. येत्या तीन चार महिन्यांत ह्युमन सोसायटी इंटर नॅशनल संस्थेच्या माध्यमातून मुंबईतील भटक्या कुत्र्यांची सध्याची आकडेवारी स्पष्ट होईल. त्यानंतर पालिका याविषयी काय उपाययोजना करते हे पाहावे लागेल. 



वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त