अवयवदान प्रत्यारोपण प्रक्रिया - डॉ अरुण यादव

अवयवदान (कॅडेव्हर/मृत)- प्रत्यारोपण- प्रक्रिया 
              अवयव प्रत्यारोपण हि एक मोठी शस्त्रक्रिया असून त्याला सामाजिक,नैतिक,आर्थिक व कायदेशीर अशा अनेक बाजू आहेत. या सर्व प्रक्रियेत अवयव प्राप्तकर्त्या रुग्णांना व अवयव दात्यांना आणि त्यांच्या परिवाराला मदत व्हावी म्हणून केंद्र शासनाने मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा-१९९४ अंमलात आणला आहे
भारतात मानवी अवयवदान व प्रत्यारोपणाच्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र हे नेहमी अग्रेसर राहिलेले राज्य आहे.मुंबई पुण्या पाठोपाठ नागपूर,औरंगाबाद, कोल्हापूर,सोलापूर आणि नाशिक अशा ठिकाणीसुद्धा आता चांगल्या प्रकारे अवयव प्रत्यारोपणाच्या ऑपरेशनची सुविधा निर्माण होऊ लागली आहे.
मानवी उपचाराकरिता तसेच मानवी अवयवांची व्यवसायिक विक्री होऊ नये याकरीता मानवी अवयव काढणे,जतन करणे, प्रत्यारोपण करणेकरीता भारत सरकारने मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा-१९९४ लागू केला आहे.केंद्र शासनाने दि. ४ फेब्रुवारी १९९५ अन्वये राजपत्रातील अधिसूचनेद्वारे हा कायदा अंमलात आणलेला आहे. महाराष्ट्र शासनानेही त्याच दिवशी हा कायदा राज्यात लागू केलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्र हे मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा-१९९४ राबवणारे देशातील पहिलेच राज्य आहे.या कायद्यामध्ये सन २००८  व २०११ मध्ये काही सुधारणा करण्यात आलेल्या आहेत.
                   महाराष्ट्रात या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आरोग्य सेवा आयुक्तालयात " स्वतंत्र कक्षाची स्थापना " करण्यात आलेली आहे. दिनांक ९ जुलै,१९९९ रोजीच्या अधिनियमाद्वारे महाराष्ट्र शासनाने या कायद्याची प्रभावी अंमलबजावणीसाठी संचालक,आरोग्य सेवा,मुंबई यांना "समुचित प्राधिकारी" म्हणून घोषित केले आहे (State Appropriate Authority).मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा १९९४ अंतर्गत राज्यस्तरावरील समुचित प्राधिकारी म्हणून खालील महत्वाची कामे केली जातात.  
मानवी अवयव प्रत्यारोपणाकरीता रुग्णालयांना नोंदणी व पुनर्नोंदनी देणें,नोंदणीकृत रुग्णालयांची तपासणी करणे,तसेच नियमाचा भंग झाल्याबद्दल करण्यात आलेल्या तक्रारींची चौकशी करून संबंधितावर योग्य ती कारवाई करणे,इत्यादी कामे केली जातात... 
                    समुचित प्राधिकारी यांच्याकडून प्रत्येक अर्जदार रुग्णालयाकडून रुग्णालयस्तरावर मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा १९९४ अंतर्गत आवश्यक कंपेटंट औथोरिटी,ब्रेन स्टेम डेथ कमिटी व ट्रान्सप्लांट टिम गठीत केल्यावरच त्या रुग्णालयास मानवी अवयव प्रत्यारोपणासाठी मान्यता देण्यात येते. रुग्णालयस्तरावर गठीत केलेल्या अंतर्गत कमिटी अथवा कॉम्पेटंट औथोरिटी मार्फत जवळच्या रक्त संबंधातील (Closed related) व्यक्तींच्या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी परवानगी देण्यात येते.  
                   महाराष्ट्र शासनाने संचालक,वैद्यकीय शिक्षण व संशोधन यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण राज्यासाठी एक स्टेट औथोरिझशन कमिटी नेमण्यात आलेली आहे.या कमिटीत संचालक,आरोग्य सेवा मुंबई,अधिष्ठाता,सर जे.जे.समूह रुग्णालय मुंबई व काही तज्ञ अशासकीय सदस्य आहेत. अनरिलेटेड,परप्रांतातील,परदेशातील रिलेटेड अथवा अनरिलेटेड प्रत्यारोपणासाठी आलेल्या प्रकरणाची संपूर्ण शहानिशा करून स्टेट औथोरिझशन कमिटी परवानगी देण्यात येते.
                   मा.उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार राज्यात प्रत्येक महसूल विभागाकरीता वेगवेगळ्या औथोरिझशन कमिटींची स्थापना करण्यात आलेल्या आहेत.त्यानुसार मुंबई,पुणे,नागपूर,धुळे,औरंगाबाद व यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात या औथोरिझशन कमिट्या स्थापन करण्यात आल्या आहेत. 

                       मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा नियम 2014 मधील तरतुदी नुसार रुग्णालयस्तरावर सुध्दा अथोरिझशन कमिटी शासन निगर्मीत करते.जे रुग्णालय एका वर्षात 25 पेक्षा जास्त ऑर्गन ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया करतात अशा रुग्णालयानां वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वतीने रुग्णालयस्तरावर अथोरिझशन कमिटी स्थापन करण्याची मान्यता दिली जाते.या कमिटी मार्फत लिविंग अनरेलेटेड रुग्णांची ओळख पटवून परवानगी देण्यात येते,या कमिटीमध्ये शासनाचे दोन प्रतिनिधी असतात.
               दिनांक ९ जुलै १९९९ च्या शासन निर्णया अन्वये राज्यस्तरावर एक उच्चाधिकार समितीची (महाराष्ट्र कॉन्फरडेरेशन ऑफ ऑर्गन ट्रान्सप्लांट समिती MCFOT) स्थापना करण्यात आली आहे.या समिती मार्फत मस्तिक स्थंभ मृत व्यक्तीचे अवयव दान कार्यक्रमास चालना देण्याकरिता विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्रांची(ZTCC) स्थापना करण्यात आलेली आहेत.मुंबई,पुणे, नागपूर,औरंगाबाद येथे हि विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्रे कार्यरत आहेत.झेडटीसीसी(ZTCC) मार्फत शासनाने विहित केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार प्रतीक्षा यादीतील रुग्णांसाठी रुग्णालयांना अवयव उपलब्ध करून देण्यात येतात.

                 केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या वतीने मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा 1994 अधिनियम 2014 अन्वये सेट,जी.एस. मेडिकल कॉलेज व केईएम हॉस्पिटलमध्ये 2017 साली रोट्टो-सोट्टो (ROTTO-SOTTO) स्थापना केली आहे.रोट्टो- सोट्टो मुंबई मार्फत महाराष्ट्र,गुजरात,मध्यप्रदेश,छत्तीसगड,गोवा हि राज्य व सिल्वासा,दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातील कॅडेव्हर अवयव प्रत्यारोपण कामकाजावर देखरेख केली जाते.या सर्व विभागातील अवयव प्रत्यारोपण,पाठपुरावा आणि अवयव दात्यांची नोंद यांची माहिती संकलित करणे,अवयव दानासाठी विविध योजना राबविणे,अवयव दानाबाबत लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे,विभागात प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे, तांत्रिक मार्गदर्शन व सहकार्य करणे इत्यादी कामं केली जातात.सोट्टो(SOTTO) मार्फत झेडटीसीसीच्या मदतीने राज्यातील कॅडेव्हर अवयव प्रत्यारोपणाची कामे केली जातात.त्यामध्ये अवयव प्रत्यारोपणाच्या रुग्णांची नोंद घेऊन प्रतीक्षा यादी तयार करणे, मस्तिक स्थंभ मेंदू मृत दात्यांच्या अवयवांचे प्रतीक्षा यादीनुसार वितरित करणे,अवयव दानाबाबत लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे इत्यादी कामांचा समावेश आहे.देशपातळीवर कॅडेव्हर अवयव प्रत्यारोपणाची कामे केंद्र सरकारच्या नोट्टो (NOTTO) या संस्थेच्या माध्यमातून केली जातात. 
                    
                   राज्य समुचित प्राधिकारी यांचे मार्फत मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा-१९९४ अंतर्गत 124 किडनी,56 लिव्हर,33 हार्ट,17 लंगस,15 प्यांक्रियाज, 8 इंटेस्टाइन,1 स्मॉलबोवेल,6 हँड व 2 युटेरस प्रत्यारोपण केंद्रांना मान्यता दिलेली आहे.तसेच 7 टिश्यू बँकांनाही परवानगी देणेत आलेली आहे.याशिवाय सुमारे 303 आयडोनेशन सेंटर,आयबँक व केरॅटोप्लास्टी सेंटरना परवाना देणेत आला आहे.आणि 63 एनटीओआरसी सेंटरनासुद्धा नोंदणीकृत केलेले आहे

                    मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा अंमलात आल्यापासून(1995 पासून ते मे 2023 पर्यंत) महाराष्ट्रात एकूण 13769 लाईव्ह अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झालेल्या आहेत. त्यामध्ये किडनीच्या 12413 आणि लिव्हरच्या 1356 शस्त्रक्रिया झालेल्या आहेत.तसेच कॅडेव्हर अवयव प्रत्यारोणाच्या एकूण शस्त्रक्रिया 2810 आहेत.त्यामध्ये किडनीच्या 1548, लिव्हरच्या 801, हार्टच्या 190 आणि लंगच्या 28 व इतर 245 आहेत.
                
                   कॅडेव्हर अवयव प्रत्यारोपणाचे प्रमाण राज्यात कमी असल्याने अवयवदानात वाढ करणेकामी सार्वजनिक आरोग्य विभागाकडून काही उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये तामिळनाडू राज्यातील कॅडेव्हर ट्रान्सप्लांट कार्यक्रमा बाबतचे शासन निर्णय महाराष्ट्र शासनानेही निगर्मीत केलेले आहेत, असे एकूण चार शासन निर्णय खालील प्रमाणे आहेत...

 1)मस्तिक स्तंभ मृत्यू घोषित व प्रमाणित करणे हे सर्व नोंदणीकृत रुग्णालयांना व राज्यातील इतर नॉन ट्रान्सप्लांट ऑर्गन रिट्रायव्हल सेंटर (NTORC)रुग्णालयांनाही बंधनकारक करण्यात आले आहे. मस्तिक स्तंभ मृत्यू रुग्णांबाबत रुग्णालयांनीही त्वरित विभागीय प्रत्यारोपण समनव्य केंद्रांशी(ZTCC) संपर्क साधायचा आहे. झेडटीसीसी (ZTCC) कडून शासनाने विहित केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार प्रतीक्षा यादीतील रुग्णांसाठी रुग्णालयांना अवयव उपलब्ध करून देण्यात येतील.
2)ऑपरेशन थिएटर व अतिदक्षता विभाग असलेल्या राज्यातील सर्व रुग्णालयांना नॉन ट्रान्सप्लांट ऑर्गन रिट्रायव्हल सेंटर (NTORC) म्हणून आवश्यक करण्यात आले आहे.
3)नोंदणीकृत प्रत्यारोपण केंद्राकडून प्रत्यारोपण कार्यक्रमांतर्गत पारदर्शकता व उत्तरदायित्व असणे आवश्यक करण्यात आले असून प्रत्यारोपण शस्त्रक्रियाबाबतच्या चांगल्या गोष्टींच्याच प्रसार माध्यमाकडे प्रसिद्धीसाठी पाठवण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
4)नॉन ट्रान्सप्लांट ऑर्गन रिट्रायव्हल सेंटरमध्ये "मस्तिक स्तंभ "मृत" घोषित करण्याकरीता न्यूरोसर्जन / न्यूरोफिजिशियन उपलब्ध नसल्यास जवळच्या नोंदणीकृत प्रत्यारोपण रुग्णालयातील न्यूरोसर्जन/न्यूरोफिजिशियनकडून मस्तिक स्तंभ मृत्यू घोषित व प्रमाणित करण्याची मुभा देण्यात आली आहे.

                   
                        जनतेमध्ये मानवी अवयवदानाचे महत्व लक्षात आणून देणे तसेच कॅडेव्हर अवयव दानात वाढ होण्याकरीता व्यापक प्रमाणात जनजागृती करणे आवश्यक आहे. वैद्यकीय महाविद्यालये,जिल्हा रुग्णालये,उपजिल्हा रुग्णालये,ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रे यांचे स्तरावर शासनामार्फत जनतेमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. माहिती व जनसंपर्क कार्यालय,पुणे, रोट्टो-सोट्टो मुंबई (ROTTO-SOTTO) व राज्यातील सर्व विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्रे (ZTCC) यांचेमार्फत विशेषतः पथनाट्य,बॅनर्स,पोस्टर्स, सिनेमागृहातील जाहिराती,रेडिओ जिंगल्स,तसेच चर्चासत्राद्वारे जनजागृतीचे कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.

                      शासकीय पातळीवर मुंबई पुणे येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन चालक परवाना मिळवण्यासाठी येणाऱ्या व्यक्तींना अवयव दानाचे महत्व व त्याचे फायदे एनजीओ मार्फत समजून सांगितले जाते.एनजीओच्या स्वयंसेवकांमार्फत प्रत्येक अर्जदाराला अर्जासोबत अवयवदाना बाबतचे प्लेजफॉर्म (प्रतिज्ञापत्र) देऊन त्यामध्ये स्वेच्छेने अवयवदान (मस्तिक स्तंभ मृत स्थितीत) करण्याची इच्छा असल्यास प्लेज फॉर्म भरून स्वाक्षरी घेण्यात येते.अशा अवयवदाता(organ donor) बनण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना वाहन परवाना देताना त्या वाहन परवाण्यावर अवयवदाता (organ donor) असे स्टिकर चिटकून देतात.मुंबई पुणे येथील परिवहन कार्यालयातील अवयव दानाची हि मोहीम संपूर्ण राज्यभर करणेत येणार आहे.
                  पदवी महाविद्यालयात विध्यार्थ्यांना प्रवेश घेणेपूर्वी प्रवेश अर्जामध्ये मृत्यूपश्चात अवयवदान करण्यास तयार आहेत किंवा कसे याबाबतची विचारणा करणाऱ्या रकान्याचा समावेश करण्याची विनंती केलेली आहे.जे विद्यार्थी अवयवदान करण्यास तयार असतील त्यांच्याकडून कायद्यानुसार अवयवदान प्लेजफॉर्म भरून त्यांच्या आयडेंटिटी कार्डवर ऑर्गन डोनरचा स्टिकर लावता येईल.वरीष्ठ शासकीय पातळीवर या बाबतीत कार्यवाही करण्यात येणार आहे.


                  गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात ब्रेनस्टेम डेथ झाल्या नंतरच्या अवयव दानात लक्षणीयरीत्या वाढ झालेली आहे.सप्टेंबर 2012 पासून ते जुलै 2023 पर्यंत महाराष्ट्रात एकूण 1300  ब्रेनस्टेम डेथ ओळखले आहेत त्यापैकी 850 कॅडेव्हरसाठी कॉन्व्हरटेड झाली आहेत.आणि आतापर्यंत 30129 ऑर्गन रिट्रायव्हल झाले आहेत,त्यापैकी 1732 किडणी, 890 लिव्हर,191 हार्ट व 316 इतर आहेत....

अवयव दानाला प्रोत्साहन देण्यासाठी अजून खूप काही साध्य करायचे आहे,कारण अनेक रुग्ण अवयवांच्या प्रतीक्षेत आहेत.सध्या राज्यातील प्रतीक्षा यादीत किडनीसाठी 5762, लिव्हरसाठी 1185,हार्टसाठी 112, लंगसाठी 46,पँक्रियाजसाठी 34, स्मॉल बोवेल 03 असे रुग्ण आहेत.या आकडेवारीनुसार यादीतील रुग्णांची संख्या जास्त आहे,त्यामानाने पुरवठा मात्र एकदम कमी आहे.

एका वर्षात एकूण अवयव प्रत्यारोपणाच्या संख्येत भारत हा यूएसए आणि चीन नंतर जगातील तिसरा देश आहे.भारतात अवयव प्रत्यारोपण संख्या तिप्पट झाली आहे. 2013 मध्ये 5000 वरून 2022 मध्ये 15000 पेक्षा अधिक अवयव प्रतिरोपन झाले आहे.(महाराष्ट्राने 2013 मध्ये 738 आणि 2019 मध्ये 1539 अवयव प्रत्यारोपण केले आहेत.) 2016 मध्ये 930 मृत दात्यांच्या 2265 अवयवांचा वापर करण्यात आला तर  2022 मध्ये 904 मृतदात्यांच्या 2765 अवयवांचा वापर करता आला.भारतात,2019 मध्ये एकूण अवयव प्रत्यारोपणाची संख्या 4990 वरून 12746 पर्यंत वाढली आहे.(महाराष्ट्राने 2013 मध्ये 738 आणि 2019 मध्ये 1539 अवयव प्रत्यारोपण केले आहेत.) भारताचा अवयवदानाचा दर पूर्वी पेक्षा चारपटच्या आसपास वाढत आहे. अवयव दानाचा दर 2013 मध्ये 0.27 प्रति दशलक्ष लोकसंख्येवरून आता 0.65 प्रति दशलक्ष पेक्षा जास्त वाढला आहे.तर 2019 मध्ये भारताचा हाच अवयवदान दर 0.52 होता.परंतु अवयव दानाचा हा दर स्पेन सारख्या पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत खूपच कमी आहे,जिथे हा दर 49.6 प्रति दशलक्ष लोकसंख्येच्या आसपास आहे. म्हणूनच भारतीय समाजात अवयव दानाबद्दल जागृकतेची आणि संवेदनशीलतेची गरज आहे.अवयव दानाचा विचार करता फक्त किडणी आणि लिव्हर सारख्या मर्यादित अवयवांसाठीच जिवंत व्यक्ती दान करू शकतात.अनेक किडणी व लिव्हर निकामी झालेल्या प्राप्तकर्त्याना अवयवदान करू शकणारे जवळचे नातेवाईक मिळत नाहीत.काही वेळा अवयवदान करू शकणारे नातेवाईक मिळतात पण त्यातील काही वेगवेगळ्या कारणाने वैद्यकीयदृष्टया अपात्र असू शकतात. ह्रदयासारखे अवयव तर केवळ मेंदू मृत दात्याकडूनच घेतले जातात. रुग्णांची निकड पाहता अधिकाधिक लोकांनी अवयवदान करण्यासाठी पुढे आले पाहिजे,ज्यामुळे अवयवांची मागणी आणि पुरवठा यातील अंतर कमी होण्यास मदत होईल.
                 अवयवदान हि एक चळवळ बनली पाहिजे,जिथे प्रत्येक नागरिकाला हे समजले पाहिजे की,त्यांच्या आयुष्याच्या शेवटी एखाद्याचा जीव वाचवण्याची संधी मिळणार आहे.म्हणून नागरिकानी आपल्या हयातीत अवयवदानाचा निर्णय घेवून,त्याबाबत प्रतिज्ञा फॉर्म भरणे हि खूप चांगली सुरवात होणार आहे.अवयवदानाचा फॉर्म भरल्यानंतर अवयवदानाचे डोनरकार्ड घेऊन तशी इच्छा नोंदवल्याने आयुष्याच्या शेवटी एखाद्याला जीवदान देण्याची संधी मिळणार आहे.अवयवदानाची इच्छा कुटुंब आणि मित्रांसोबत शेयर करणे खूप महत्त्वाचे आहे,कारण प्रत्यक्ष अवयवदान करताना त्यांची संमती अनिर्वाय असते.

एनजिओ आणि स्वयंसेवी संस्था ह्या जनजागृता निर्माण करण्यात आणि सामाजिक कारणांचा प्रसार करण्यात महत्वाची भूमिका बजावतात. त्यांच्यामार्फत अवयवदानाची व्यापक प्रसिद्धीची मोहीम राबविवण्याची आवश्यकता आहे.वृत्तपत्रे,मासिके, चित्रपट आणि लघुपट हे आजच्या परिस्थितीत लोकापर्यंत पोहोचण्यासाठी आणि सामाजिक कार्याचा प्रचार करण्यासाठी सर्वोत्तम माध्यमांपैकी एक आहे.यासर्व माध्यमांचाही उपयोग अवयवदानाच्या जनजागृतीसाठी करून घेतला पाहिजे....

अवयव प्रत्यारोपणाकरीता कॅडेव्हर अवयवदान (प्रक्रिया)...

महाराष्ट्रात ब्रेनस्टेम (मस्तिक स्थंभ) मृत व्यक्तीचे म्हणजेच कॅडेव्हर अवयवदान कार्यक्रमास चालना देण्याकरिता विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्रे (ZTCC) पूर्वी पासून कार्यरत आहेत.सर्व झेडटीसीसी  अवयवदान व प्रत्यारोपणाची कामे शासनाच्या विहित मार्गदर्शन तत्वानुसार करीत आहेत.झेडटीसीसी (ZTCC),सोट्टो (SOTTO),रोट्टो (ROTTO),नोट्टो (NOTTO) तसेच नोंदणीकृत रुग्णालये याच्या मार्फत प्रत्यारोपणाकरीता कॅडेव्हर अवयवदानाची प्रक्रिया समजून घेणे आवश्यक आहे.अवयवदानाची प्रक्रिया उपरोक्त संस्था मार्फत खालील प्रमाणे पार पडत असते ..

1) अवयवाची आवश्यकता असलेल्या सर्व रुग्णांची नोंदणी प्रत्यारोपणासाठी नोंदणीकृत असलेल्या रुग्णालयाद्वारे संबंधित झेडटीसीसी (ZTCC )कडे केली जाते.रुग्णांचे नोंदणी फॉर्म संबंधित नोंदणीकृत रुग्णालयातून झेडटीसीसीच्या कार्यालयाकडे पाठवले जाते.या नोंदणी फॉर्मवर रुग्ण,प्रत्यारोपणतज्ञ डॉक्टर, प्रत्यारोपण समन्वयक आणि रुग्णालय प्रमुख यांची स्वाक्षरी आवश्यक असते.कोणताही रुग्ण झेडटीसीसीकडे परस्पर नोंदणी करू शकत नाही. 
 2) झेडटीसीसी मार्फत अवयव लागणाऱ्या सर्व प्राप्तकर्ता रुग्णांची नोंदणी केल्यानंतर त्यांची प्रतीक्षायादी तयार करते.तसेच या प्रतीक्षा यादीवर नियमितपणे देखरेख ठेवून,ती अद्यावत करते.
 3) जेव्हा एखादा ब्रेनस्टेम डेथ डोनर(अवयवदाता) असतो,तेव्हा ते डोनर हॉस्पिटल(अवयव दाता असलेलं हॉस्पिटल) संबंधित झेडटीसीसीला त्याची माहिती देते. यानंतर स्कोअर सिस्टम किंवा पूर्व-निर्धारित निकषांनुसार झेडटीसीसीद्वारे त्याअवयवाचे वितरण रुग्णांच्या प्रतीक्षा यादीनुसार झोनमधील नोंदणीकृत रुग्णालयाकडे केले जाते.
 4)अवयवांचे वितरण करताना एक किडनी,डोनर हॉस्पिटलला (अवयवदाता हॉस्पिटल) दिली जाते आणि दुसरी किडणी सामान्य प्रतीक्षा यादीवर नोंद असलेल्या रुग्णाला क्रमांकानुसार दिली जाते.डोनर हॉस्पिटल प्रथम त्यांच्याकडील प्रतीक्षा यादीतील नोंद असलेल्या रुग्णांना क्रमांकानुसार किडनी देत असतात. यकृत आणि हृदय आणि फुफ्फुस हे अवयव प्रथम अतिअर्जंट रुग्णानां दिले जातात,जर अतिअत्यावश्यक रुग्णांची नोंद यादी नसेल तर नियमित प्रतीक्षा यादीतील रुग्णाला क्रमांकानुसार दिली जाते
 5) ब्रेनस्टेम डेथ अवयवदात्याकडून प्राप्त झालेले अवयव प्रथम झोनमध्ये,नंतर राज्यात,त्यानंतर प्रदेशात आणि शेवटी राष्ट्रीयस्तरावर वितरित केले जातात.  
6)अवयव वितरित करताना अवयवदान केलेले कोणतेही अवयव प्रथम भारतीय नागरिकाला,नंतर भारतीय वंशाच्या व्यक्तीला आणि त्यानंतर परदेशी नागरिकांना दिले जातात.  
7)परदेशी नागरिकाला जर अवयवांचे वाटप केले गेले असेल तर,तेथे कोणताही इच्छुक आणि योग्य नोंदणीकृत भारतीय रुग्ण नसल्याची पुष्टी केल्यावर नोट्टोद्वारे( NOTTO) त्याचे वितरण केले जाते.
8) राज्यस्तरावर आणि प्रादेशिकस्तरावर अवयवांचे वाटप अनुक्रमे सोट्टो(SOTTO) आणि रोट्टोद्वारे ( ROTTO) आणि राष्ट्रीयस्तरावर नोट्टोद्वारे (NOTTO) केले जाते.

             अवयव प्रत्यारोपणाकरीता कॅडेव्हर अवयवदानाच्या प्रक्रियांचे अवलोकन केले असता,खालील प्रमाणे काही महत्वाच्याचे टप्पे लक्षात घेतलेले असतात. 
1)संभाव्य अवयवदात्याची ओळख करणेबाबत... 
आयसीयु मधील संभाव्य ब्रेन स्टेम डेथ अवयवदाता ओळखण्यासाठी आयसीयू इन्चार्ज आणि तेथील काम करणारे डॉक्टर जबाबदारी घेत असतात.तथापि,रुग्णालयातील ट्रान्सप्लांट कॉऑर्डीनेटरने(प्रत्यारोपण समन्वयकाने) हि प्रक्रिया सुलभ करण्यासाठी खालील प्रमाणे उपाययोजना केलेली असते.
अ)आयसीयूचा दररोज राऊंड घेऊन संभाव्य अवयवदातांचा डेटा गोळा करतात..
ब)आयसीयु मधील सर्व रूग्णांच्या कुटुंबियांशी संबंध विकसित करणे,संबंधित संभाव्य अवयवदात्यांच्या केसची संपूर्ण माहिती घेणे,रुग्णांसोबत उपस्थित असलेल्या नातेवाईकांची नोंद घेऊन,निर्णय घेणार्‍यां जवळच्या नातेवाईकांची ओळख पटवतात. 
क)आयसीयू मधील रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी संपर्क साधून ऍपनिया टेस्टच्या रुग्णांची माहिती मिळवतात.  
ड) ब्रेन स्टेम डेथ रुग्णांवर ऍपनिया सारख्या चाचण्या करताना रुग्णालय प्रमुखशी समन्वय साधतात.

2)संभाव्य ब्रेन डेथ अवयवदाता रुग्णांची एचआयव्ही,ऍक्टिव्ह इन्फेक्शन व कॅन्सर सारख्या आजारांची तपासणी बाबत..
यासाठी अलीकडील रक्ताचे अहवाल आणि ऍक्टिव्ह इन्फेक्शन आणि कॅन्सर इत्यादीचा इतिहास असलयाचे रुग्णाच्या फाईल मधून तपासतात. यापैकी कोणीही ब्रेन डेथने मृत्यू झाल्यास आयसीयू इनचार्जला कळवणे आवश्यक असते.

3)अवयवदात्या रुग्णाची पहिल्या ऍपनिया टेस्ट बरोबर ब्रेन स्टेम डेथसाठी तपासण्या आयोजित करणे बाबत...
डॉक्टरांच्या अधिकृत ब्रेन स्टेम डेथ कमिटी मार्फत ब्रेन स्टेम डेथ रुग्णांचा मृत्यू प्रमाणित करण्यासाठी तपासणी आयोजित केली जाते.
अ)जर पहिली ऍपनिया टेस्ट पॉझिटिव्ह आली तर प्रौढांत 6 तासाच्या अंतराने दुसरी एपनिया टेस्ट करणे आवश्यक आहे.  लहानबालकात हेच अंतर किमान 12 तासांचे असेल.
ब)एपनिया टेस्टचा रिझल्ट नकारात्मक असल्यास त्याची नोंद  ठेवण्यात याते.

4) ब्रेन स्टेम डेथ बद्दल अवयव दात्याच्या कुटुंबाला माहिती देणे बाबत....
आयसीयूच्या इंचार्ज किंवा उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडून ब्रेन स्टेम मृत्यूची माहिती कुटुंबाला दिली जाते,जो कुटुंबातील एक प्रिय व्यक्ती असतो.ब्रेन स्टेम मृत्यू घोषित केल्यावर ट्रान्सप्लांट कॉऑर्डीनेटर उपस्थित असतो.

5)अवयवदानासाठी ब्रेन डेड रुग्णाच्या जवळच्या नातेवाईकांकडे संपर्क साधने बाबत...
अ)संभाव्य अवयवदात्याच्या नातेवाईकांशी एका खोलीत किंवा शक्य असेल तर खाजगीत समोरासमोर संवाद साधाला जातो.
ब)अवयवदानासाठी काही ओपन एंडेड प्रश्न विचारले जातात
क)अवयवदानासाठी नातेवाईकांना निर्णय घेण्यासाठी वेळ देणे आवश्यक आहे.

6)अवयवदानाची प्रक्रिया बाबत...
अ)नातेवाईकांनी अवयवदानासाठी सहमती दर्शवल्यास,आयसीयू  इन्चार्ज आणि हॉस्पिटलमधील अधिकृत व्यक्तीला अवगत केले  जाते....
ब) प्रोटोकॉलनुसार अवयवदानाची माहिती संपूर्णपणे तपशीलवार झेडटीसीसीला दिली जाते ..
क)ब्रेन स्टेम डेथ सर्टिफिकेटचा फॉर्म न.10 तपासून त्यावर बीएसडी कमिटीच्या चारही सदस्यांच्या स्वाक्षरी असल्याची खात्री करने आवश्यक असते.
ड)अवयवदानासाठी नातेवाईकांची लेखी संमती घेऊन,दुसऱ्या एपनिया टेस्टनंतर फॉर्म न.8 वर उपस्थित असलेल्या शक्य तितक्या जवळच्या नातेवाईकांच्या सह्या घेणे आवश्यक असते. 

7) मेडिकोलीगल केस बाबत..
अ)प्रथम एपनिया टेस्टनंतर आणि नातेवाईकांच्या संमतीनंतर,संभाव्य अवयवदात्याच्या शक्यतेबद्दल केस नोंदवलेल्या हॉस्पिटल जवळच्या पोलिस स्टेशनला कळवावे लागते.
ब)बीएसडी टेस्टचा दुसरा संच झाल्यानंतर,पोलीस चौकशी करण्याकरीता व अवयव काढण्याकरीता एनओसी देण्याबाबत   पोलिसांना लेखी विनंती करणे आवश्यक असते...
क)अवयव काढल्यानंतर शवविच्छेदन केले जाते...

8)ऑर्गन रेट्रीवल बाबत.... 
या)अवयव काढण्यासाठी अवयवदात्याला ऑपरेशन थिएटरमध्ये हलवले जाते.प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अवयवदात्याचा मृतदेह आदरपूर्वक नातेवाईकांच्या स्वाधीन केला जातो.
ब) मेडिकोलीगल केस असेल तर,अवयव काढल्यानंतर,मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला जातो.यासाठी ट्रान्सप्लांट कॉऑर्डीनेटर कुटुंबासमवेत शवविच्छेदन केंद्रात जातात...

9)झेडटीसीसी (ZTCC) बरोबरील समन्वया बाबत ...
 झेडटीसीसी (ZTCC) सोबतच्या समन्वयाने संपूर्ण अवयवदानाची  प्रक्रिया खालील प्रमाणे होत असते...
अ)झेडटीसीसी डोनर हॉस्पिटलमधील ऑर्गन रेसिपीएन्ट रुग्णांची प्रतीक्षा यादी विचारत असते.
ब)अवयवदात्याचे रक्त झेडटीसीसीने शिफारस केलेल्या अथवा मानांकित प्रयोगशाळेत क्रॉस मॅचिंगसाठी पाठवावे लागते.
क)ऑर्गन रेसिपीएन्ट रुग्णालयांशी संवाद साधने आणि ऑर्गन रेट्रीवल वेळेसाठी त्यांच्या रेट्रीवल टीमशी समन्वय साधत असते..
ड)"ग्रीन कॉरिडॉर" ची व्यवस्था करण्यासाठी जवळच्या पोलिस स्टेशनमधील ट्राफिक पोलिसांना अवयव आणि संबधीत रुग्णालये यांच्या वाहतुकीच्या वेळेबद्दल कळवणे आवश्यक असते.

ब्रेन स्टेममृत अवयवदात्यांनी दान केलेले अवयव हे मौल्यवान आणि दुर्मिळ संसाधने आहेत.ते अवयव सर्वात पात्र रुग्णांना समान रीतीने वितरित केले जावेत या हेतूने राज्य समुचित प्राधिकारी यांच्यावतीने सोट्टो महाराष्ट्र व झेडटीसीसी मार्फत राज्यासाठी मार्गदर्शक तत्वे तयार केलेली आहेत.उपयुक्तता,दान आणि न्याय या तत्त्वांनुसार ज्यास्तीत ज्यास्त रुग्णांना लाभ मिळावा या हेतूनेच हि अवयव वाटप प्रणाली तयार केलेली आहे.


ब्रेन डेथ ऑर्गन डोनोरची काही मार्गदर्शक तत्वे:

मार्गदर्शन तत्वानुसार काही ब्रेन डेथ डोनरच्या अवयवांना उपयुक्त नसल्याचे मानले जाऊ शकते किंवा एक्सटेंडेड क्रिटेरिया डोनर (ECD) म्हणून सावधगिरीने वापरले जाऊ शकते.
अवयवदात्यांमधील ट्यूमरचे वर्गीकरण डब्ल्यूएचओच्या (WHO) मार्गदर्शक तत्त्वांनुसार करून रेसिपीएन्ट रुग्णांना संक्रमण होण्याच्या जोखमीचा अंदाज लावावा लागतो.या मार्गदर्शन तत्वाने खालील प्रमाणे कॅटेगरी करता येईल. 
1)पूर्णपणे प्रतिबंध: प्रायमरी लिम्फोमा,सर्व सेकंडरी इंट्राक्रॅनियल ट्यूमर,अवयवाच्या बाहेर स्प्रेड झालेला ऍक्टिव्ह कॅन्सर,ऍक्टिव्ह हेमेटोलॉजिकल मॅलिग्नेंसी अशा प्रकारच्या डोनोरचे अवयव वापरण्यास पूर्णतः अयोग्य असतात.

2)अति जोखमीचे 10% पेक्षा ज्यास्त संक्रमणाचा धोका असलेल्या काही कॅन्सर डोनोरचे अवयव दुर्मिळ आणि अत्यंत अपवादात्मक परिस्थिती वगळता वापरण्यास परावृत्त केले जाते.

3)मध्यवर्ती जोखीमीचे 10% पेक्षा कमी संक्रमणाचा धोका असलेल्या कॅन्सरच्या डोनोर रुग्णांच्या अवयवांचा वापर करण्याची शिफारस केलेली नाही.परंतु लाईफ सेव्हिंग ट्रान्सप्लांटशिवाय रेसिपीएन्टचे अपेक्षित जगणे कमी असल्यास ते स्वीकार्य असू शकेल.(उदा.काही दिवस किंवा कमी दिवस)

4)कमी जोखीमीचे 1% पर्यंत संक्रमणाचा धोका असलेल्या कॅन्सर डोनोरचे अवयव रेसिपीएन्टमध्ये ट्रान्सप्लांट शिवाय लक्षणीय जोखमीवर वापरणेचा निर्णय घेणे शक्य आहे.

5)0.1%पेक्षा कमी संक्रमणाचा किमान धोका असलेलया कॅन्सर डोनोरचे अवयव,डॉक्टरांच्या क्लिनिकल जुजमेंटच्या आधारावर रुग्णांची इन्फॉर्मेड कॉंसेन्ट घेऊन निर्णय घेणे शक्य होईल.

ऑर्गन डोनरकडून रेसिपीएन्ट रुग्णांपर्यंत ट्यूमरचा प्रसार होण्याच्या जोखमीबद्दल रेसिपीएन्ट आणि त्यांच्या कुटुंबियांशी ऑर्गन ट्रान्सप्लांट टीमने चर्चा करावी लागते.तशी कागदपत्रे तयार करून योग्य त्या सर्व तपशीलांसह त्यांच्या संमतीची एक प्रत झेडटिसीसीकडे सादर करावी लागते.

ऑर्गन डोनरमध्ये ज्ञात संसर्गाच्या बाबतीत,जीवाणूंचे स्वरूप,संसर्गाची व्याप्ती आणि प्रतिजैविकांना संवेदनशीलता याद्वारे ऑर्गन सिलेक्शनचे मार्गदर्शन केलेले असते.

हर्पस सिम्प्लेक्स एन्सेफलायटीस, मल्टिड्रग रेझिस्टंट (एमडीआर) इन्फेकॅशन ज्यामुळे सेप्टिक शॉक किंवा मल्टीऑर्गन फेल्युअरचा धोका असतो अशा डोनरकडील अवयव वापरताना ट्रान्सप्लांट टीमने अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे. डोनरमध्ये संशयित किंवा ज्ञात इन्फेक्शनचा धोका आणि  संक्रमणाचा धोका रुग्णाच्या परिस्थितीनुसार मोजला जावा. रेसिपीएन्ट रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबाशी याबाबत चर्चा केली गेली पाहिजे.याची कागदपत्रे तयार करून त्याप्रमाणे संमतीपत्र बनवून त्याची एक प्रत झेडटीसीसीला सादर करतात. प्रभावी औषधांच्या उपलब्धतेमुळे क्षयरोग रुग्णांना ऑर्गन डोनेशनसाठी विरोध करता येऊ शकत नाही.तथापि,अपूर्ण उपचार घेतलेल्या एमडीआर टीबी( MDR Tb) रुग्णांना ऑर्गन डोनेशनसाठी विरोधाभास असू शकतो.

एचआयव्ही,एचबीव्ही,एचसीव्ही सारख्या संसर्ग असलेल्या डोनोरच्या अवयवांचा वापर समान संसर्ग असलेल्या रेसिपीएन्टसाठी केला जाऊ शकतो.यासाठी ट्रान्सप्लांट टीमने संबंधित रेसिपीएन्टमध्ये असलेल्या संसर्गावर उपचार चालू ठेवण्यासाठी योग्य ती उपाय योजना केलेली असते.काही वेळा जर अशा प्रकारच्या अवयवांना,कोणताही योग्य रेसिपीएन्ट उपलब्ध नसेल,तर संक्रमणांसाठी निगेटिव्ह असलेल्या रेसिपीएन्टना ते अवयव देऊ केले जाऊ शकते.जर अशा प्रकारच्या डोनरकडील अवयव अशा संसर्गाशिवाय रुग्णांना देऊ केले,तर डोनोरची पॉजीटीव्ह व्हायरल स्टेटस आणि संक्रमणाचा /पुन्हा सक्रिय होण्याच्या जोखमीबद्दल रेसिपीएन्ट रुग्णांशी आणि त्यांच्या कुटुंबियांशी चर्चा करणे आवश्यक आहे. याबाबतच्या संमती पत्रासह तयार कलेल्या कागदपत्रांची,एक प्रत झेडटीसीसीकडे सादर करणे आवश्यक आहे.   

कॅडेव्हर(मृत)डोनरकडून ऑर्गनचे वितरण वैज्ञानिक मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे केले जाते परंतु ऑफर स्वीकारणे किंवा नाकारणे ही ट्रान्सप्लांट टीम आणि रुग्णाची सर्वस्वी जबाबदारी आहे.सर्व झेडटीसीसी,रोट्टो,सोट्टो,नोट्टो यांचा समावेश असणारी वितरण संस्था अवयवांच्या गुणवत्तेसाठी जबाबदार नसतात.

रेसिपीएन्टच्या(अवयव प्राप्तकर्त्या) लिस्टिंगसाठी/नोंदणीसाठी मूलभूत आवश्यकता:

अवयवाची मागणीसाठी नोंदणीफॉर्म उपचार करणाऱ्या नोंदणीकृत हॉस्पिटलमार्फत झेडटीसीसीकडे करावयाचा असतो.सदरच्या नोंदणी फॉर्मवर रेसिपीएन्ट रुग्ण,उपचार करणारे डॉक्टर,ट्रान्सप्लांट सर्जन आणि हॉस्पिटलहेड यांची रीतसर स्वाक्षरी असावी लागते.रूग्ण नोंदणी मार्गदर्शक तत्त्वांनुसार रुग्णांचा रक्तगट,व्हायरल मार्कर(एचआयव्ही, एचसीव्ही,एचबीएसएजी) केसरिपोर्ट इत्यादी सादर करणे आवश्यक आहे. ओळख पटवण्याकरीत शासनमान्य एखादा फोटो आयडी पुरावा रुग्णास देने गरजेचे आहे.उपरोक्त माहिती बरोबर नोट्टो नोंदणीचा फॉर्म सुद्धा भरून देने आवश्यक आहे.रूग्ण, ट्रान्सप्लांट कॉऑर्डीनेटर व उपचार करणारे डॉक्टर यांनी रीतसर स्वाक्षरी केलेले रूग्ण नोंदणी मार्गदर्शकतत्वेही सादर करावी लागतात.

रेसिपीएन्ट(अवयव प्राप्तकर्त्या)रुग्णांची अवयव प्राप्त करण्याकरीता नोंदणी करण्यापूर्वी संबंधित प्रत्यारोपण केंद्रातील वैद्यकीय चमू मार्फत रुग्णाचे मूल्यमापन केले जाते.या तपासणीत तो रुग्ण अवयव प्रत्यारोपणासाठी वैद्यकीयदृष्ट्या योग्य असल्याचे आढळले पाहिजे. 
राज्य मार्गदर्शक तत्वानुसार नोंदणीच्यावेळी,रेसिपीएन्ट रुग्णांना खालीलपैकी एक किंवा अधिक क्रायटेरियामध्ये (श्रेणींमध्ये)अवयव स्वीकारण्यासाठी निवड करावी लागते:
अ)स्टॅण्डर्ड क्रायटेरिया ऑर्गन(Standard Criteria Organ) 
ब)एक्सटेंडेड क्रायटेरिया ऑर्गन(Extended Criteria Organ)

झेडटीसीसीद्वारे रेसिपीएन्ट रुग्णांच्या नोंदणी अर्जाची पूर्ण पडताळणी केली जाते.रुग्णांचा आवश्यक त्या तपशीलासह पूर्ण माहिती भरलेला अर्ज,तपासणी अहवाल फक्त लिस्टिंगसाठी विचारात घेतला जातो.लिस्टिंगसाठी कोणतेही अपूर्ण अर्ज विचारात घेतले जात नाहीत. कोणत्याही झेडटीसीसीकडे नोंदणी केलेला रुग आपोआपच सोट्टोकडे सुध्दा नोंदणीकृत होत असतो.रुग्ण लिस्टिंग केलेबाबतचा निर्णय,अर्ज करणाऱ्या संबंधित हॉस्पिटलला ईमेलद्वारे कळवला जातो.
रेसिपीएन्ट रुग्णांना नोंदणीच्या वेळी कठोर वैद्यकीय निकषांची  पूर्तता करने आवश्यक असते ज्यात एकापेक्षा जास्त अवयव निकामी न होणे,सतत किंवा व्यापक प्रमाणात जंतूसंसर्ग नसणे किंवा इतर कोणतेही उपचाराचे पर्याय उपलब्ध नसणे इत्यादींचा समावेश आहे.
सर्वसामान्यपणे लिस्टिंगसाठी/नोंदणीसाठी खालील रेसिपीएन्ट रुग्णांचा विचार होत नाही......
1)ऍक्टिव्ह/मेटास्टॅटिक मॅलीग्लनन्सीचे रुग्ण (कॅन्सर) 
2)ऍक्टिव्ह एमडीआर टिबी संसर्गामुळे सेप्सिस किंवा सेप्टिक शॉकचे रुग
3)बरे न होणारे गंभीर रोग असलेले रुग्ण (हृदय, फुफ्फुस, न्यूरोलॉजिकल किंवा इतर फारच कमी आयुष्य असणारे ) 
4)ऍक्टिव्ह किंवा अलीकडील बरे न झालेले मानसिक आजार असलेले रुग्ण.
 5)दीर्घकालीन इम्यूनोसप्रेशनचे पालन न करण्याचा ज्यास्त धोका असलेले रुग्ण. 
6) सामाजिक किंवा कौटुंबिक समर्थनाचा अभाव असलेले रुग्ण..


अवयव प्राप्तकर्त्या रुग्णासाठी स्टेट वेटिंग लिस्ट्स (राज्य प्रतीक्षा यादी).... 
प्रत्येक झेडटीसीसी रेसिपीएन्ट रुग्णांचीं खालील प्रमाणे रक्तगटनिहाय वेटिंग लिस्ट्स(प्रतीक्षा याद्या) ठेवत असते....
१) सुपर-अर्जंट वेटिंग लिस्ट (हृदय, फुफ्फुस आणि यकृतासाठी).  2) सेमी -अर्जंट वेटिंग लिस्ट (हृदयासाठी).  
३) रुटीन वेटिंग लिस्ट (सर्व अवयवांसाठी)

सुपर-अर्जंट नोंदणी/ऑर्गन लिस्टिंगच्या सर्व रेसिपीएन्ट रुग्णांचे अर्ज सोट्टो/झेडटीसीसीच्या सुपर-अर्जंट कमिटीच्या किमान 3 स्वतंत्र सदस्यां मार्फत पुनरावलोकन केलेले असते.चार तासांच्या आत सदस्यांनी पुनरावलोकन केलेले सर्व उत्तर निर्णयासाठी विचारात घेतले जाते.निर्णयांती सुपर-अर्जंट लिस्टिंगचा अंतिम निर्णय अर्ज करणाऱ्या हॉस्पिटलला,इतर हॉस्पिटल्सना व झेडटीसीसी यांना ईमेल/मेसेजद्वारे कळवला जातो. तसेच इतर सर्व झेडटीसीसी आणि सोट्टो यांना देखील अलर्ट केले जाते.हृदयासाठी सुपर-अर्जंट लिस्टिंग केलेला रुग्ण, 30 दिवसांपर्यंत  प्राधान्य 1 मध्ये प्रतीक्षेत राहू शकतो, त्यानंतर मात्र त्यारुग्णाला प्राधान्य 2 प्रतीक्षा यादीमध्ये हलवले जाते. 

अवयव वाटपाची तत्त्वे:

राज्य मार्गदर्शक तत्वानुसार प्रत्येक झेडटीसीसी सोट्टो महाराष्ट्रच्या मदतीने कॅडेव्हर अवयवांचे वाटप मूलभूत नियमानुसार खालील प्रमाणे करीत असतात... 
1)प्रथम प्राधान्य सुपर-अर्जंट रुग्णांना. 
2)नंतरचे प्राधान्य अवयवदात्या रुग्णालयातील रुग्णांना.
3)त्यानंतरचे प्राधान्य शहरातील प्रतीक्षा यादीतील रुग्णांना. 4)त्यानंतरचे पुढील प्राधान्य महाराष्ट्रातील इतर शहरांतील रुग्णांना, हे वाटप सोट्टोच्या मदतीने उपलब्ध प्रतीक्षा यादीनुसार केले जाते.
5)त्यानंतर इतर राज्यातील सोट्टोकडे उपलब्ध असलेल्या प्रतीक्षा यादीतील रुग्णांना रोट्टो आणि नोट्टोच्या मार्फत केले जाते.
6)सर्वात शेवटी नोट्टोच्या मदतीने विहित मार्गदर्शक तत्वानुसार इतर देशातील रुग्णांना केले जाते. 

एखाद्या मेंदूमृत अवयवदात्याला नोंदणी नसलेल्या केंद्रातून (एनटीओआरसी) ऑर्गन रेट्रीवलसाठी नोंदणीकृत ट्रान्सप्लांट हॉस्पिटलमध्ये हलवले गेल्यास,संबंधित ट्रान्सप्लांट हॉस्पिटलला मार्गदर्शक तत्वानुसार त्यांच्या आवडीचा कोणताही एक अवयव इन-होऊस अवयव म्हणून वापरण्याची परवानगी असते.इतर सर्व अवयवांचे वाटप झेडटीसीसी मार्फत त्यांच्याकडे उपलब्ध प्रतीक्षा यादी प्रमाणे करीत असते.  

नोंदणीकृत ऑर्गन ट्रान्सप्लांट हॉस्पिटलमधील,ऑर्गन ट्रान्सप्लांट करीत नसल्याने उपलब्ध होत असलेले अवयव प्रतीक्षा यादीनुसार झेडटीसीसी वाटप करीत असते. एनटीओआरसी मधून किंवा झेडटीसीसी बाहेरील सोट्टो/रोट्टो/नोट्टो मार्फत उपलब्ध झालेलं अवयव सुद्धा प्रतीक्षा यादीनुसार त्याचे वाटप करीत असतात.

मृत अवयवदान प्रत्यारोपणात महाराष्ट्र राज्याची एकंदरीत कामगिरी प्रगती पथावर आहे. असे असले तरी सध्य स्थितीत राज्याच्या अवयव प्रतीक्षा यादीत रुग्णांची संख्या जास्त आहे,त्यामानाने पुरवठा मात्र एकदम कमी आहे.यात सुधारणा करणेसाठी व अवयवदानाला प्रोत्साहन देण्यासाठी अजून खूप काही साध्य करायचे आहे.जनजागृती बरोबर विविध स्तरावर काम करणे आवश्यक आहे.आपले डॉक्टर्स, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ व्यक्ती आणि रुग्णालये अवयवदात्यांची इच्छा पूर्ण करण्यास सक्षम आहेत हे देखील तितकेच महत्वाचे आहे.त्यामुळे राज्यात अधिकाधिक नोंदणीकृत रुग्णालये आणि एनटीओआरसी असणे महत्त्वाचे आहे. आयसीयू डॉक्टरांचे,प्रत्यारोपण समनवयकांचे प्रशिक्षण,सरकारी रुग्णालयामध्ये गंभीर रुग्णांची काळजी घेण्यासाठी क्रिटिकल केअर युनिट सारखे स्वतंत्र विभाग असणे आवश्यक आहे.अवयवदान आणि प्रत्यारोपणाबद्दल रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाने संवेदनशीलता आणणे असे काही उत्तम उपाय आहेत.सर्व नोंदणीकृत रुग्णालयात ब्रेनस्टेम डेथचे रुग्ण नोंदवले जाईल,ब्रेन डेथ अवयवदात्यांची देखभाल केली जाईल आणि ब्रेन डेड व्यक्तीच्या प्रत्येक कुटूंबाला अवयवदान करण्याची विनंती केली जाईल यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे...


डॉ. अरुण दिनकरराव यादव
सहाय्यक संचालक (सेवानिवृत्त)
मानवी अवयव प्रत्यारोपण, 
आरोग्य सेवा, मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त