ग्रामीण साहित्यिक योगेश गोतारणे यांच्या "आगोठच्या बाता" या कुणबी बोलीभाषेतील कथासंग्रहाचे प्रकाशन
ग्रामीण साहित्यिक योगेश गोतारणे यांच्या बहुप्रतिक्षित _"आगोठच्या बाता"_ या कुणबी बोली भाषेतील कथासंग्रहाचे प्रकाशन
शेती करणारा तो कुणबी, कुणब्यांच्या सांस्कृतिक वाटचालीचा लिखित ठेवा जपण्याचे काम हा कथासंग्रह करेल - विश्वनाथ पाटील, कुणबी सेना प्रमुख
वाडा तालुक्यातील गातेस गावचे योगेश गोतारणे यांच्या बहूप्रतिक्षित "आगोठच्या बाता" या कुणबी बोली भाषेतील कथासंग्रहाचे आज (ता.३ ) प्रकाशन झाले. नॅशनल स्कूल कुडूस येथे रंगलेल्या या कार्यक्रमास साहित्यिक, प्रकाशक तथा जोशी बेडेकर काॅलेज ठाणे येथील मराठी विभाग प्रमुख डाॅ. संतोष राणे, कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील, नॅशनल कॉलेजचे संस्थापक मुस्तफा मेमन, चित्रकार सतिश खोत
आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जेष्ठ कला समीक्षक लक्ष्मण पाटील यांनी भूषविले.
विजय जोगमार्गे यांच्या रंगतदार प्रकाशनाने प्रकाशित केलेले हे पुस्तक खऱ्या अर्थाने कुणबी संस्कृतीचा उलगडा करून दाखवणारे ठरेल अशी प्रतिक्रिया मुस्तफा मेमन यांनी दिली.
कुणबी भाषेमध्ये लेखन करून अशा प्रकारचे पुस्तक प्रकाशित करण्याचे धाडस योगेश गोतारणे यांनी केले आहे त्याला वाचक चांगला प्रतिसाद देतील अशी अपेक्षा सर्वच उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
योगेश गोतारणे हे शिक्षक असून साहित्य क्षेत्रात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. अनेक कविता, लेख, कथा याद्वारे त्यांनी विपुल लेखन केले आहे. यापूर्वी वाडा येथील पुरातन शिवमंदिराचा विस्तृत इतिहास लेखनाचे काम त्यांनी आपल्या 'श्री शिवक्षेत्रं वाडा तालुका' या पुस्तकातून केले आहे. अनेक काव्य संमेलने, साहित्य संमेलने यामध्ये सहभागी होऊन त्यांनी आपल्या साहित्य लेखनाची चुणूक दाखवलेली आहे. योगेश गोतारणे यांच्या साहित्याची दखल घेऊन आजपर्यंत त्यांना अनेक साहित्यिक पुरस्काराने गौरविले आहे.
अभिजात मराठी साहित्य सेवा संघ महाराष्ट्र राज्य याची स्थापना करण्यात त्यांचे मोलाचे योगदान असून या सेवा संघाच्या माध्यमातून त्यांनी साहित्य क्षेत्राशी निगडित अनेक उपक्रम राबविलेले आहेत. ग्रामीण भागातील नवोदित लेखक कवींना व्यासपीठ निर्माण करून देण्याची त्यांची धडपड उल्लेखनीय आहे. याचसाठी अभिजात मराठी साहित्य सेवा संघाचे सचिव असणारे योगेश गोतारणे यांनी आजपर्यंत दिलेले योगदान मोलाचे आहे. त्यांच्या या कथासंग्रहाचे स्वागत वाचक मंडळी करतील असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.
कुणबी बोलीभाषेतून स्वतंत्रपणे कथासंग्रहाचे प्रकाशन करण्याचा हा पहिलाच प्रयत्न असल्याचे अनेक मान्यवरांनी सांगितले.
या पुढील काळात कुणबी बोली भाषेतून अनेक साहित्य निर्माण व्हावे व कुणबी भाषेला शासन दरबारी दर्जा मिळावा अशी अपेक्षा यावेळी उपस्थित असणाऱ्या अनेक साहित्यिकांनी व्यक्त केली.
' मी कुणबी बोलतोय ' या समूहाच्या वतीने 'गौरी गणपतीची गाणी' या संकलीत पारंपारिक गाण्यांच्या पुस्तकाचेही प्रकाशन यावेळी झाले. विस्मृतीत जाऊ पाहणारी अनेक जुनी गौरी गीते या पुस्तकात संकलीत करण्यात आली आहेत.
*युवा साहित्यिक योगेश गोतारणे यांच्या आगोठच्या बाता व संकलीत गौरी गणपती गीते या दोन्ही साहित्यकृतीस खूप सार्या शुभेच्छा!!!!*
Comments
Post a Comment