दहीहंडीच्या खेळाची मजाच न्यारी
दहीहंडीच्या खेळाची मजाच न्यारी,
गोविंदा पथकांचा सराव लय भारी ।।
थरांवर थर, मनोऱ्यांवर मनोरे,
गोपाळांचा खेळ पाहताना दंग सारे ।।
गोविंदांची सुरक्षा अन आयोजकांचा थाट,
बंदोबस्ताने सरळ होते पोलिसांची पाठ ।।
न्यायालयाचे आदेश अन सरकारची बंधने,
तरीही नाही थांबली आपल्या सणांची स्पंदने ।।
पाऊस आणि मानवी मनोऱ्यांचा मनोहारी खेळ,
कृष्ण लीला आणि थरांचा मात्र बसत नाही मेळ ।।
गोविंदाचे वय झाले चौदा - सोळा,
उंचावरील गोविंदा पाहून उठतो पोटात भीतीचा गोळा ।।
सणांवरील बंधने म्हणे आता सहन होत नाहीत,
पण बालगोपाळांच्या जीवाची किंमत त्याच्या कुटुंबालाच माहीत ।।
गोविंदानो,अतिउत्साहाने देऊ नका नियमांना फाटा,
खेळाचा रसभंग होऊन उघडतील मृत्यूच्या वाटा ।।
व्यसन आणि नशेपासून अंतर राखा,
खेळ आणि संस्कृतीचा निर्मळ आनंद चाखा ।।
उत्सवाची शान अन सभ्यतेचा सन्मान,
सुरक्षा नियम पाळून बाळगा हिंदूत्वाचा अभिमान ।।
वैभव मोहन पाटील
घणसोली नवी मुंबई
Comments
Post a Comment