वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने
वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने
भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस 'वाचन प्रेरणा दिवस' म्हणून साजरा केला जातो. प्रबळ इच्छाशक्ती असलेल्या डॉ कलाम यांच्या विचारांनी व कृतीने देशातील तरुण पिढीला भारावून टाकले होते. वाचन संस्कृती विकास ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. व्यक्तिगत विकास साधण्यासाठी वाचन वृद्धिंगत करणे व दिनचर्येतील काही वेळ वाचनासाठी राखून ठेवणे फार आवश्यक आहे. यासाठी वाचन साहित्यदेखील विकसित होणे फार गरजेचे आहे. मात्र आजची डिजिटल संस्कृती वाचन संस्कृतीला पोषक नाही असेच चित्र आहे. वर्तमानपत्रे, पुस्तके आज घराघरातुन लुप्त होत चाललेली आहेत. डिजीटल क्रांतीमुळे छापील साहित्य हददपार होण्याच्या मार्गावर आहे. तरुणांच्या रुपात देशात उभ्या राहत असलेल्या भावी पिढीसाठी ही अत्यंत धोकाची घंटा आहे. तरुणवर्ग आज वाचनापासुन परावृत्त होण्यााचा प्रयत्न करतोय. हातोहाती आलेल्या इंटरनेटधारी अॅंड्रॉईड मोबाईलवर क्षणार्धात सर्व प्रकारची माहिती उपलब्ध होत असल्यामुळे वाचन संस्कृती लुप्त होत चालली आहे. पुस्तके, वर्तमानपत्रे, मासिके, नियतकालिके कालबाहय होण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे अनेक प्रकाशन संस्था, वृत्तपत्रे, वाचनालये अखेरच्या घटका मोजत आहेत. किंबहुना अनेक छोटी मोठी, स्थानिक वृत्तपत्रे बंद होत आहेत. ज्या पद्धतीने फोर जी, फाय जी तंत्रज्ञान पुढे आणले जात आहे, अँड्रॉइड, आय फोन यासारखे संगणकीय प्रतिभा धारण केलेले मोबाईल तंत्रज्ञान विकसित करण्यात येत आहे त्या पद्धतीने वाचन संस्कृती जोपासण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत हे अत्यंत खेदजनक वाटते. मोजके साहित्यिक, कवी, लेखक, विचारवंत, संपादक मुद्रित साहित्यासाठी आग्रही दिसून येतात. साहित्य संमेलने केवळ नावाला भरवली जात आहेत. तेथील पुस्तक विक्री व साहित्य कला अवगत करण्यासाठी येणाऱ्यांची संख्याही रोडावत चालली आहे. वाचन व लेखन ही मानव विकासाच्या प्रथम टप्प्यातील साधने आहेत. त्यामुळे त्यांची जोपासना व परंपरा टिकवलीच पाहिजे. अन्यथा भावी पिढी अज्ञानाच्या वाटेवर जाण्यास वेळ लागणार नाही. वाचनाविषयी इतका आग्रह इथे धरण्याचे कारण हेच की प्रत्येकाने आपल्या दिवसातील काही वेळ वाचनासाठी द्यायलाच हवा. वाचन संस्कृती जोपासली जावी यासाठी मीदेखील गेल्या काही वर्षांपासून काही न काही निमित्ताने मित्रमंडळी, आप्तेष्ट, स्वकीय, सहकारी, ओळखीतल्या व जवळच्या लोकांना पुस्तके भेट देण्याचा उपक्रम हाती घेतलेला आहे. कुणाचे लग्न असो, वाढदिवस असो, सेवानिवृत्ती असो, घरात एखादे मंगल कार्य असो, गणेशोत्सवातील दर्शनासाठी आप्तभेट असो किंवा सहज घडून आलेली भेट असो दरवेळी नवनव्या व्यक्तींना पुस्तक आवर्जून भेट देतो. आजवर मी जवळपास दीड हजार पुस्तके विविध निमित्ताने भेट स्वरूपात प्रदान केलेली आहेत. पुस्तकभेटीने घेणाऱ्या व्यक्तींच्या चेहऱ्यावर देखिल एक अनोख्या भेटीचा आनंद दरवळतो. वस्तुुऐवजी पुस्तक भेट खऱ्या अर्थाने मौल्यवान व ज्ञानवृद्धी करणारी ठरेल. मंगल प्रसंगी पुस्तकाशिवाय इतर कोणतीही भेट समरुप व मौलिक असूच शकत नाही असे माझे ठाम मत आहे. पुस्तक भेटीने वाचन संस्कृतीच्या प्रसाराचे समाधान मिळतेच पण इतरांच्या ज्ञानात भर घातल्याची तृप्तीही मिळते. त्यामुळे पुस्तके भेट देण्याचा मी सुरू केलेला उपक्रम अधिकाधिक काळ जोपासण्याचा माझा मानस आहे. वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
Comments
Post a Comment