कलावंतांनी व्यक्त व्हावे
प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडित हे नाव मागील आठवड्यात चर्चेत आले होते. एखादा चित्रपट किंवा भूमिका यांविषयी नाही, तर तिने ‘टोल’ या विषयावर केलेल्या वक्तव्यावर अनेक प्रतिक्रिया समाजमाध्यमांवर उमटल्या. ‘आमच्या टोलचे पैसे गेले कुठे?’ असा सडेतोड प्रश्न तिने केला आणि वादंग सुरू झाला. राज्यात पुन्हा एकदा जिवंत झालेल्या टोलच्या मुद्द्याची याला पार्श्वभूमी होती. यावर वाद-प्रतिवाद, वेगवेगळे मीम्स, तेजस्विनीवर टीकेची झोड, ट्रोलिंग असे सर्व काही सुरू आहे. मात्र एखादा सामाजिक किंवा राजकीय प्रश्न निर्माण झाल्यानंतर कलाकारांनी त्यावर बोलायला हवे असे वाटते. त्याने आपले स्पष्ट व रोखठोक मत मांडायला हवे. आज एखाद्या कलाकाराचे लाखो चाहते समाजात असतात. कलाकार हे कुठल्या राजकीय पक्षाशी, विचारधारेशी बांधील नसतात हा सर्वसामान्य तर्क आहे. त्यामुळे त्याने व्यक्त केलेले मत सर्वसामान्य लोकांच्या मनातील असायला हवे. पडद्यावरील एखाद्या कलाकाराचे रूप पाहत असताना तो प्रत्यक्षात दैनंदिन जीवनात कोणत्या भूमिकेत वावरतो हे पाहणे अनेकांसाठी औत्सुक्याचे असते. कलाकार व्यक्त होत असताना त्याच्या कलेने हजारो लोक आपली मते मांडत व्यक्त होतात. याने मोठे सामाजिक परिवर्तन शक्य आहे. तेजस्विनी नेहमीच सडेतोड आणि थेट बोलणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. यापूर्वीही तिने समाजमाध्यमांवरून विविध विषयांवर मते व्यक्त केली आहेत. तिच्या भूमिकेचे स्वागतच करायला हवे. मराठी व हिंदी सिनेसृष्टीतील कलाकारांनी ज्वलंत सामाजिक विषयांवर मौन धारण न करता खुलेपणाने व्यक्त व्हायला हवे.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
Comments
Post a Comment