पाण्याच्या काटेकोर व्यवस्थापनाची आवश्यकता
स्वत:च्या मालकीचे धरण असलेली महापालिका म्हणून नवी मुंबईचा लौकीक असला तरी गेल्या काही वर्षांपासून मोरबे धरणाचे पाणी शहराला अपुरे पडू लागले आहे. गावठाण व परिसरात लोकवस्ती मोठ्या प्रमाणावर वाढत चालल्याने पालिकेचे पाणी नियोजन डळमळीत होताना दिसत आहे. गेल्या काही महिन्यांपासून नवी मुंबईतील विविध प्रभागांत पाण्याच्या बाबतीत सातत्याने नागरिक तक्रारी करताना दिसत आहेत. यामुळे दिवसातून दोन वेळा पाणी सोडण्याऐवजी एकदाच सहा ते सात तास पाणी वितरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. शहराच्या इतिहासात प्रथमच नागरिकांना सलग सहा ते सात तास पाणीपुरवठा होणार आहे. यावर्षी एप्रिल महिन्यात धरणात पाणीसाठा कमी शिल्लक राहिल्याने पालिकेने एप्रिलपासून शहरात आठवड्यातून एक दिवस विभागवार पाणीकपात लागू केली. मात्र मोरबे धरण १०० टक्के भरल्यानंतरही महापालिकेने पाणीकपात मागे घेतली नाही. मात्र आता नव्या नियोजनानुसार दिवसातून एकदाच सहा ते सात तास नागरिकांना पाणी मिळणार आहे. याअगोदर शहरात साधारणपणे सकाळी आणि संध्याकाळी एकाच वेळेत पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र, पाण्याचा दाब, भौगोलिक अंतर आदी कारणांमुळे काही विभागांना जास्त तर काहींना कमी पाणी मिळत होते व वितरणातील ही विषमता दूर करण्यासाठी वेळापत्रक बदलल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.
त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिकेकडून विविध दुरुस्तीच्या कारणांमुळे शहराच्या विविध भागांत पाणी कपात करण्यात येते. मुंबई व मध्य मार्गावरील उपनगरांवरील अतिरिक्त भारामुळे मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या नवी मुंबईकडे सरकली आहे. यामुळे नवी मुंबई व परिसरातील लोकसंख्येत गेल्या काही वर्षांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. एके काळी कमी गर्दीची समजली जाणारी हार्बर रेल्वे प्रवाशांच्या प्रचंड गर्दीत धावत आहे. साहजिकच याचा भार नागरी सुविधांवर पडलेला आहे. पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण असलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेने शहराची २०३५ पर्यंतची लोकसंख्या विचारात घेत मोरबे धरण विकत घेतले होते. या धरणाची पाण्याची क्षमता ४५० दशलक्ष लिटर इतकी आहे. असे असले तरी गेल्या काही काळापासून महापालिका हद्दीतील वेगवेगळ्या उपनगरांमधील पाण्याचा वापर अनिर्बंध पद्धतीने सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. पाण्याचा वारेमाप उपसा अन् मनमानी वितरणामुळे पालिकेचे जल नियोजन विस्कळीत होण्याची भीती निर्माण झाली आहे. नवी मुंबईची पाणीपट्टी आज अत्यल्प आहे. महिन्याला ३० हजार लिटर पाणी वापरावर जेमतेम ५० रुपयांचे पाणी बिलाचे सूत्र गेली १५ वर्षे शहरात राबविले जात आहे. मात्र यामुळे पाणी वापरावरील नियंत्रण सूटत चालले आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील काही परिसरालाही पालिकेमार्फत पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने गेल्या काही दिवसांपासून मोरबे धरणातील पाण्याचा उपसा क्षमतेपेक्षाही वाढला आहे. मागील महिन्यात एका दिवसात मोरबे धरणातून ५२६ दशलक्ष लिटर इतका पाण्याचा उपसा झाला. शहराच्या एका भागात अपेक्षेपेक्षा अधिक वापर तर दुसऱ्या भागात सरासरी ते कमी वापर असेही दिसून येत आहे. वाढीव वापराचा यंत्रणेवरदेखील ताण येत आहे. मोरबे धरणातून प्रक्रिया न केलेले पाणी भोकरपाडा येथील जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाते. तेथील क्षमताही ४५० दशलक्ष लिटर इतकी असताना तेथेही ४७५ दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया केली जात आहे. धरणाच्या क्षमतेनुसार शहरातील पाण्याचा वापर व्हावा असे गणित असताना गेल्या काही काळापासून शहरातील पाण्याचा वापरही वाढला आहे. मोरबेतून निश्चित केलेल्या पाणी उपशापेक्षा १० ते १५ टक्के अधिक उपसा होत आहे. याचा परिणाम भविष्यात पाणी टंचाईत होऊ शकतो. एमआयडीसीकडून मिळणारे पाणीदेखील अपुरे येत असल्याने धरणातील पाणी उपसा वाढला आहे. त्यामुळे एकंदरीत मोरबेतील अतिरिक्त पाणी उपशावर नियंत्रण आणण्याची गरज निर्माण झाली आहे. पाणी वापर मोजण्यासाठी जलमापक यंत्रे बसवण्यात आलेली असल्यामुळे अतिरिक्त पाण्याचा वापर होत असलेल्या भागांत विशेष सर्वेक्षण करण्याची गरज आहे. नागरिकांना पाणी बचतीबाबत अवगत करून जनजागृतीची गरज आहे. स्वच्छतेच्या बाबतीत आग्रही महापालिकेने पाणी वापराबाबतही दक्षता घेणे गरजेचे आहे. पाण्याचा अवाजवी वापर, गैरपवापर, नादुरुस्त जलवाहिन्या, नळ व अनधिकृत जोडण्यांवर नियंत्रण आणणे अत्यावश्यक आहे. सध्या नव्याने प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आलेली एकदाच सलग पाणीपुरवठ्याची पद्धत सर्व घटकांना सोयीस्कर नसून अतिरिक्त साठ्याचे प्रावधान नसलेल्या नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागू शकते. अशा वेळी पाणी वापरावर नियंत्रण आणण्याची आवश्यकता का निर्माण झाली याची कारणे शोधून त्या अनुषंगाने कार्यवाही करणे संयुक्तिक राहील. पाण्याच्या बाबतीत नवी मुंबईला लाभलेली स्वयंपूर्णता व सबलता अबाधित ठेऊन पाण्याचे योग्य व्यवस्थापन राखण्यासाठी शहरातील नागरिक व महानगरपालिका प्रशासन या दोहोंची सतर्कता ही काळाची गरज आहे.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
Comments
Post a Comment