मराठी भाषिकांनीच मराठीबाबत आग्रही व्हावे
मुलुंडमध्ये घडलेला प्रकार मुंबईतील समस्त मराठीजनांना चीड आणणारा तर आहेच पण मुंबईच्या कानाकोपऱ्यात मराठीची होत असलेली दुरवस्थादेखील दर्शवणारा आहे. एकीकडे मुंबईतील सर्व दुकानांच्या पाट्या दोन महिन्यांत मराठीत लावण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेला असताना दुसरीकडे मराठी लोकांना आपला व्यवसाय करण्यासाठी भाड्यात दुकानेही मिळत नसतील तर परप्रांतीयांची मुजोरी व घुसखोरी किती प्रमाणात वाढलीय याचा प्रत्यय मुंबईकरांना आल्याशिवाय राहणार नाही. देवरुखकर परिवाराने हा मुद्दा प्रकाशात आणल्यावर त्याबाबत संतप्त प्रतिक्रिया सर्वत्र उमटल्या, मात्र अनेकांना अशा प्रकारचा अनुभव जागोजागी येत असेल. मुंबईत घर घेताना आल्यालाही असाच अनुभव आल्याचे राज्याच्या माजी मंत्री सौ पंकजा मुंडे यांनीही माध्यमांवर कबुली दिली. महाराष्ट्राशेजारील राज्ये आपापल्या भाषेचा कडवा पुरस्कार करत असताना राज्यात मात्र म्हणावे तितके महत्व मराठीला मिळत नाही ही वस्तुस्थिती सार्वजनिक ठिकाणी, प्रवासात दोन मराठी माणसे हिंदीत साधत आलेल्या संवादावरून लक्षात येईल. हीच परिस्थिती कायम राहिली तर मराठी मुंबईबाहेर हद्दपार व्हायला कितीसा वेळ लागेल? यासाठी राज्यात प्रवास, व्यवहार, कामधंदा व सार्वजनिक स्थळांवर वावरताना मराठीतच संवाद साधला पाहिजे व तसा आग्रह धरायला हवा, तरच मराठी भाषा व संस्कृती टिकेल.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
Comments
Post a Comment