आवाजाच्या पातळीवर नियंत्रण हवे
- Get link
- X
- Other Apps
यंदा गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणुकांतील डिजेच्या दणदणाटामुळे अनेक तरुणांना त्रास सुरु झाला. या आवाजामुळे त्रास होऊन सांगलीत २ आणि पुण्यात एक तरुण मरण पावला. धुळे जिल्हयात विसर्जन मिरवणुकीनंतर अनेक पोलिसांना कर्णदोषाचा त्रास होऊन उपचार घ्यावे लागले. जल्लोष, उत्साह याचा अर्थ मोठया आवाजात डीजे, लाऊडस्पीकर असा अर्थ तरूणाईकडून लावला जातो. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांनी ध्वनी प्रदूषणाच्या मर्यादा ओलांडल्या. ढोल-ताशा पथकाचे ढोलदेखील लोखंडी हातोड्याने वाजवले जातात. त्यातून मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होते. हृदय विकार रुग्ण, गरोदर स्त्रिया, विद्यार्थी, जेष्ठ नागरिक यांना मोठ्या आवाजाचा सर्वाधिक त्रास होतो. १२० डेसिबल आवाजाने कानाच्या पडद्याला गंभीर इजा पोहोचते. रक्तदाब आणि डोकेदुखी यांचा त्रास होतो. हल्ली आपल्याकडे हळद, साखरपुडा, लग्न, वाढदिवस, पूजा, सण उत्सव व इतर कोणतेही निमित्त असले की मोठया आवाजात ध्वनिक्षेपक लावले जातात. जणू ज्या कार्यक्रमातील आवाजाची पातळी मोठी तो कार्यक्रम तितकाच भव्य व मान सन्मान वाढवणारा म्हणून ओळखला जातो अशी यजमान मंडळींची भावना असते. तसेच बिनासायलेन्सरच्या गाड्या, वेळी अवेळी वाजणारे भोंगे, कारखान्यांतील आवाज, बांधकाम साईट व घरगुती कामांच्या ठिकाणी लावण्यात येणाऱ्या मोठ्या आवाजाच्या मशिन्स यामुळेही ध्वनी प्रदूषणाच्या समस्येची व्याप्ती वाढते. मात्र या आवाजाने होणाऱ्या त्रासाचा दुर्दैवाने विचार केला जात नाही. शासनाकडून कुठलाही कार्यक्रम साजरा करण्यास परवानगी देताना आवाजाची मर्यादा आखून दिली जाते. मात्र ती पातळी कधीही पाळली जात नाही व आवाज मोजण्याची कुठलीही यंत्रणाही उपलब्ध नसते. कारवाईच होत नसल्याने अशा कर्णकर्कश डीजे बहाद्दरांचे फावते व त्यांची हिंमत अधिकच वाढते. त्यामुळे पोलिसांनी नागरिकांमध्ये जनजागृतीबरोबरच साउंड, डीजे, इव्हेंट चालकांना बोलावून त्यांना जर सक्त ताकीद दिली व संभाव्य कारवाईची माहिती दिली तर अशा प्रकारांना काही प्रमाणात तरी आळा बसेल. कर्णकर्कश आवाजाने निर्माण होणारे ध्वनी प्रदूषण आज सर्वच स्तरांतील लोकांची डोकेदुखी बनली आहे. वाहनांमुळे, फटाके, बांधकामे, विविध यंत्रसामग्री व सणांदरम्यान विविध वाद्यांमुळे होत असलेल्या ध्वनीप्रदूषणाने वाढणारी आवाजाची पातळी पशु, पक्षी, मानवाच्या ध्वनियंत्रणेवर विपरीत परिणाम करते. त्यामुळे प्रचलित नियमांचे पालन करून विविध माध्यमांद्वारे होत असलेल्या आवाजाच्या पातळीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारीदेखील आपली सामूहिक आहे.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment