वृत्तपत्रलेखक वैभव मोहन पाटील यांना मशाल गौरव पुरस्कार प्रदान
वृत्तपत्रलेखक वैभव मोहन पाटील यांना मशाल गौरव पुरस्कार प्रदान
विविध क्षेत्रांमधे आदर्शवत कामगीरी करणाऱ्या समाजातील गुणीजनांना ठाणे - पालघर जिल्ह्यातील लोकप्रिय ठरलेल्या मशाल या वृत्तपत्रातर्फे 'मशाल गौरव पुरस्कार' देऊन दरवर्षी गौरविण्यात येते. वृत्तपत्रलेखक श्री वैभव मोहन पाटील यांना वृत्तपत्रलेखनातील अतुलनीय योगदानाबद्दल यंदाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मशालच्या २९ व्या वर्धापनदिनानिमीत्त गुरुवार दि. ९ नोव्हेंबर २०२३ रोजी शहापूर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या समारंभामधे सदरच्या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना नेते मा प्रकाश पाटील, शहापुरचे मा आमदार पांडुरंग बरोरा, हभप कैलास म निचिते, ठाणे जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती संजय निमसे, रंजना ताई उधळ, मशालचे संपादक शरद पाटील, विद्याताई फर्डे, परिसरातील राजकीय क्षेत्रातील मान्यवर व पत्रकार मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. शहापुरच्या सुख समृद्धी नर्सरी मध्ये पार पडलेल्या ह्या कार्यक्रमादरम्यान मशाल न्युज नेटवर्कच्या जिल्हा कार्यालयाचे उदघाटनदेखील पार पडले. गेल्या १५ वर्षांपासून सातत्याने व नियमितपणे महाराष्ट्रातील विविध वृत्तपत्रे व मासिकांमध्ये विविध विषयांवर लेखन करत असलेल्या वैभव पाटील यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आल्याने सर्व क्षेत्रांतून त्यांचे कौतुक होत आहे. त्यांची आजवर ३००० च्या वर पत्रे, लेख विविध नामांकित वर्तमानपत्रांमध्ये प्रसिध्द झाली आहेत. सामाजिक, शैक्षणिक, पर्यटन, आरोग्य यासारख्या विविध विषयांवर लेखन करत असताना त्यांना यापूर्वी सामाजिक क्षेत्रातील अनेक संस्थांनी गौरवले आहे. आरोग्य या विषयावरील लेख मालिकेचे 'आरोग्य मंथन' हे त्यांचे पुस्तकदेखील कोविड महामारीच्या काळात प्रकाशित झाले आहे. समाजामध्ये इतरांपेक्षा चांगले काम करणार्या आणि ते ज्या क्षेत्रामध्ये आहेत त्या क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या नामवंतांचा गौरव व्हायला पाहिजे, त्यांच्या कार्याची माहिती इतरांनाही कळली पाहिजे आणि त्यांच्यापासून आदर्श घेऊन इतरांनीही काहीतरी चांगलं केलं पाहिजे, या उद्देशाने दि. ०८ मे १९९४ पासून मशालचे संपादक श्री शरद पाटील यांनी मशाल गौरव पुरस्कार देण्याची परंपरा सुरु केली व ती गेली २९ वर्षे त्यांनी अविरतपणे जपली आहे.
Comments
Post a Comment