सुदृढ आरोग्यप्रति जागरुकतेचा संदेश देणारी मॅरेथॉन
दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो नवी मुंबईकरांच्या सहभागातून पाम बीच रोडवर आज २६ नोव्हेंबर रोजी स्वच्छ नवी मुंबईचा नारा देत हाफ मॅरेथॉन स्पर्धा पार पडली. नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या ह्या स्पर्धेत यंदाही मी सहभाग घेत भल्या पहाटे धावण्याचा आनंद घेतला. कार्यालयीन सहकारी डॉ सुभाष घोलप, डॉ डी वाय पाटील रुग्णालयाचे डॉ लोंढे हेदेखील सोबत होते. नवी मुंबई मनपाचे जनसंपर्क अधिकारी श्री महेंद्र कोंडे व लेखन क्षेत्रातील आमचे आदर्श पत्रकार राजेंद्र घरत सर यांचीदेखील बऱ्याच दिवसांनी या कार्यक्रमात भेट झाली. मोराज सर्कल ते नेरुळ सिग्नलपर्यंत हाफ मॅरेथॉन आम्ही पूर्ण केली. पहाटे काही वेळ पावसानेही हजेरी लावली. सुदृढ आरोग्यासाठी चालण्याचे महत्व अधोरेखित करणारा हा उपक्रम आजच्या धकाधकीच्या जीवनात किती महत्वाचा आहे हे या मॅरेथॉन मधील हजारो नवी मुंबईकरांच्या उपस्थितीने दाखवून दिले. जेष्ठ नागरिक संघ, तृतीयपंथी संस्था व अनेक स्वयंसेवी संस्थानीदेखील यात उत्स्फूर्त सहभाग घेतला. आज बैठ्या कामामुळे व आरामदायक जीवनशैलीमुळे मणके, सांधे, पाठदुखीच्या असंख्य व्याधी उद्भवत आहेत. त्यावर धावणे व चालणे हा उत्तम इलाज आहे. दररोज चालण्याचा व्यायाम आपल्याला फिट ठेवण्यास कारणीभूत घटक ठरू शकतो. मॅरेथॉन मध्ये भाग घेणाऱ्या कुणाचाही उद्देश जिंकणे नव्हताच, केवळ आपल्या आरोग्यप्रति आपण किती जागरूक आहोत हे दाखवण्यासाठी सारेजण सहभागी झाले होते. मॅरेथॉन पूर्ण केल्यावर सकाळी नऊच्या सुमारास अल्पोपहार व आरोग्यवर्धक पेयांचा आस्वाद घेत काही वेळ गप्पा रंगवत सर्वांचा निरोप घेतला. घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या नवी मुंबईकरांसाठी आजचा उपक्रम स्वच्छ सर्वेक्षणासोबतच सुदृढ आरोग्याचा उत्तम संदेश देणारा ठरला एव्हढे नक्की.
वैभव
Comments
Post a Comment