प्रदूषणाने जीवन होईल असह्य

प्रदूषण हा विषय अत्यंत गंभीर असून दुर्लक्ष करण्याजोगा नक्कीच नाही. ज्या गोष्टींमुळे पर्यावरणाला व मानवी आरोग्याला त्रास होतो ती गोष्ट प्रदूषणाच्या व्याख्येत बसते. आज मोठया प्रमाणावर सुरू असलेली बांधकामे, तोडकामे, मेट्रो, रस्ते, नाले यांच्या कामांमुळे हवेच्या प्रदूषणात भरमसाठ वाढ झाली आहे. मुंबईसह उपनगरांतील हवेच्या गुणवत्तेत कमालीची घट झाली असून त्यामुळे अनेक लोकांना श्वसनाचे विकार जडलेले आहेत. स्वच्छ शहर आणि राहण्याजोग्या शहरांच्या यादीत देशात तिसऱ्या क्रमांकाचा मान पटकावणारे नवी मुंबईसारखे शहरदेखील हवेच्या प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहे. नवी मुंबईची हवा देशात दिल्लीपेक्षा अतिशय वाईट असल्याचे सफर या संस्थेनेदेखील नोंदवले आहे. पावसाळ्यानंतर नवी मुंबईत हवेचा दर्जा प्रचंड खालावला आहे. नवी मुंबईत सध्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम सुरू आहे. या प्रकल्पाकरिता शेकडो मातीचे ट्रक रस्त्यावर धावत असतात. तसेच या भागात डोंगरावरील मातीचे खणन सुरू आहे. शहरात सुरू असणारे इमारतींचे बांधकाम, विमानतळाच्या पायाभरणीकरिता केले जाणारे खोदकाम यामुळे धूलिकणांचे प्रमाण वाढत आहे. त्यातच संध्याकाळी हवेत गारवा निर्माण होताच या वातावरणात धूलिकणाचा थर निर्माण होतो. यामुळे  अनेक भागात नागरिकांना रात्री घराच्या खिडक्याही बंद ठेवाव्या लागतात. दिवाळी तोंडावर आहे. त्यामुळे फटाक्यांची आतषबाजी पुन्हा एकदा जोरदार हवेमध्ये होणार आहे. त्याचाही विपरीत परिणाम हवेमध्ये जाणवणार आहे. वाढणारे प्रदूषणाचे प्रमाण, त्यातून उदभवणारे आजार असा भविष्यकाळ नको असेल तर या गोष्टी अखेर आपल्याच मुळावर येणार आहेत हे जाणून जागरुक होणे गरजेचे आहे.  प्रदूषणामुळे उद्भवणाऱ्या समस्यांची भविष्यातील दाहकता अद्यापही लोकांना कळालेली नाही त्यामुळे त्याचे प्रमाण वाढतेच आहे. या प्रदूषणामुळे श्वसनाचा त्रास आणि अस्थमा असणारे रुग्ण, जेष्ठ नागरिक यांना घराबाहेर फिरणेही धोकादायक झाले आहे. प्रदूषणाने आपली मर्यादा केव्हाच ओलांडली आहे त्यामुळे आजच आपण ते रोखण्यासाठी उपाय अंमलात आणले नाहीत तर भविष्यात माणसाचे जीवन ह्या प्रदूषणाने असह्य होऊन जाईल एव्हढे मात्र नक्की. 
 


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त