ऑनलाइन शुभेच्छांची दिवाळी

*ऑनलाईन शुभेच्‍छांची दिवाळी* 
दिवाळी म्‍हटली की फराळ, फटाके, भेटवस्‍तू, आप्‍तभेटी, शुभेच्‍छापत्रे, शुभेच्‍छासंदेश अशा गोष्‍टी आपसुकच डोळयासमोर येतात. मात्र आजकाल नात्‍यांमधलेही ऋणानुबंध कमी होत चालल्‍याने पूर्वी दिवाळी सणासाठी एकत्र येणारा कुटुंबकबिला फार अपवादानेच दिसुन येतो. कौटुंबिक स्‍नेहमिलनाचा उत्‍सव म्‍हणून दृढ असलेली दिपावली सणाची ओळख आता केवळ शुभेच्‍छांपुरतीच मर्यादित राहिल्‍याचे दिसुन येत आहे. दिवाळीसह सर्वच सणांच्‍या बाबतीत थोडयाफार फरकाने हि परिस्‍थीती दिसुन येते.  आजकाल दररोज सकाळी उठून मोबाइल हातात घेतला की जवळपास ४०० ते ५०० मेसेजेस व्हाट्सअप वर दिसतात. त्यातील दिवाळी शुभेच्छांचेच ३०० ते ४००. शुभेच्छा द्याव्या पण किती ? मोबाईल, फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर मुळे आजकाल कुणी आप्तेष्ट वा मित्रमंडळींना फोन वगैरे करण्याच्या भानगडीत पडेनासाच झालाय. डायरेक्ट शुभेच्छा मेसेज द्वारेच दिल्या जातात व स्विकारल्यादेखील जातात. काल लोकलमध्ये बसल्याबसल्या असे मेसेज व्हाट्सअप वर चाळत होतो तर काही मेसेज चक्क शेकडो वेळा रिपीट झाल्याचे, तोच तोच मेसेज पुन्हा पुन्हा पाठवला जात असल्याचेही पाहायला मिळाले तेदेखील प्रत्येक मेसेजच्या खाली पाठविणाऱ्याचे नाव पत्ता जोडून. आता व्हाट्सअपवर, एका ग्रुपमध्ये दोनशेच्या वर जणांना मेसेज पाठविता येत असल्याने अनेक मेसेज सर्वच ग्रुपवर अनेक वेळा रिपीट झाल्याचे देखील आढळले. अर्थात यामध्ये चांगले व वाचनीय मेसेजची संख्यादेखील होती बरं का, पण ती अत्यंत नगण्य. यामध्ये काही संस्था व सामाजिक कार्यकर्त्यांनी दिवाळीत गोरगरिबांसाठी राबविलेले उपक्रम, शालेय मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप, लेखकांचे दिवाळी अंकांतील लेख, कविता, दिवाळी निमित्त राबविले जाणारे दिवाळी पहाट व संगीतमय कार्यक्रम, चांगल्या कथा ,कविता, बातम्या यांचाही या मेसेजेस मध्ये समावेश होता. मात्र मोबाइलमधील असंख्य मेसेजेस मुळे असे बरेचसे मेसेज दुर्लक्षित होतात. त्यामुळे ग्रुपवर शुभेच्छा पाठविताना एक ठराविक तंत्र, पद्धत व नियम असावेत असे सहज वाटले. तथापि, 'आम्ही मेसेज कसेही कोणतेही पाठवू, कोणत्याही प्रकारे शुभेच्छा देऊ, आमच्या भावना कशाही व्यक्त करू, तुम्ही सुचना करणारे कोण' असेदेखील काहींचे मत व प्रतिक्रिया असू शकेल. असो, पण एक मात्र खरे की अशा येणाऱ्या असंख्य मेसेजेसमुळे वेळ, मोबाईलची बॅटरी व स्‍पेस त्यातील इंटरनेटच्या खर्चासह वाया जाते. पूर्वी लोक शुभेच्छा द्यायला घरी येत, फोन तर आवर्जून करत मात्र काळ बदलला व तंत्रज्ञान देऊन आपुलकी मात्र घेऊन गेला असेच म्हणावे लागेल. माणसाने तंत्रज्ञानात खूप प्रगती गेली, यूरोपीय देश तर आपल्या खूप आधीच पुढारलेले. आपला देश विकसनशील असूनही सुसंस्कृत म्हणून ओळखला जातो. मात्र प्रगत तंत्रज्ञानमुळे सुसंस्कृतपणा कसा लोप पावत जातो याचे उत्तम उदाहरण म्हणजे ह्या ऑनलाईन शुभेच्छा.


वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त