प्रदूषणाबाबत जागरूकतेची गरज
प्रदूषण हा विषय अत्यंत गंभीर व दुर्लक्ष करण्याजोगा नक्कीच नाही. शहरी भागांत आढळणारी ही समस्या आता ग्रामीण भागातही डोके वर काढू लागली आहे. ज्या गोष्टींमुळे पर्यावरणाला व मानवी आरोग्याला त्रास होतो ती गोष्ट प्रदूषणाच्या व्याख्येत बसते. आज बेसुमार वाहनांमुळे तसेच बांधकामे, खोदकामे, रस्ते दुरुस्ती यांमुळे होत असणारे वायू प्रदूषण व नद्यांमधील जलप्रदूषण ही समस्या अत्यंत घातक ठरू पाहत आहे. वाढत्या लोकसंख्येला आळा घालणारे कोणतेही तंत्र किंवा उपाययोजना आज अंमलात आणण्यात येत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. या लोकसंख्येची गरज म्हणून प्रचंड संख्येने वाहने सर्वत्र वाढली आहेत. छोट्या छोट्या शहारांतदेखील हजारोंच्या संख्येने धावणाऱ्या ह्या वाहनांमुळे वायू व ध्वनी प्रदूषणाची पातळी उंचावली आहे ज्याचा थेट व विपरीत परिणाम लोकांच्या आरोग्यावर होत आहे. प्रदूषण हा थेट नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्न असल्याने त्याविषयी महापालिका व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांनी जागरूक असणे गरजेचे आहे. मात्र वाहनसंख्या व जलप्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या कारखानदारिवर अंकुश आणण्याचे प्रयत्न फार अपवादानेच होताना आढळतात. कोणत्याही प्रमुख महापालिकांत प्रदूषणासंदर्भात कोणत्याही प्रकारचे वेगळे धोरण आखले गेलेले नाही. शहरातील वायुप्रदूषण, ध्वनिप्रदूषण आणि जलप्रदूषण या तिन्ही आघाडय़ांवर पाहिल्यास निराशेचे वातावरण आहे. हे दूर करण्यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, स्वयंसेवी संस्था, नामांकित व्यक्ती, अभिनेते, विविध धर्माचे धर्मगुरू या सगळ्यांनी पुढाकार घेऊन प्रदूषणाबाबत समाजात जनजागृती करणे गरजेचे आहे. प्रसारमाध्यमांतून मोठय़ा प्रमाणात जनजागृती झाली असली तरी आपण प्रत्येक जण सण-उत्सव साजरे करत असताना कोणाला त्याचा त्रास तर होत नाही ना, हा विचार प्रत्येकाच्या मनात रुजला पाहिजे. नुकत्याच पार पडलेल्या दिवाळीत न्यायालयाने रात्री आठ ते दहा या वेळेत फटाके वाजवायला परवानगी दिली असताना आपल्यातील किती जणांनी या नियमांचे पालन केले? रात्री अपरात्री, दिवसाढवळ्या फुटणाऱ्या फटाक्यांनी नियमांची अगदी एशीशितैशी करून टाकली. प्रत्येकाने प्रदूषण नियंत्रणासाठी सुरुवात स्वतःपासून केली नाही तर प्रदूषण रोखले कसे जाणार हा प्रश्न आपल्याला पडायला हवा. सध्याच्या वाहतुकीतून होणारे प्रदूषण टाळण्यासाठी प्रशासनाकडेे काय उपाययोजना आहेत? तसेच खाडीतील प्रदूषण आणि हवेतील प्रदूषणाविषयी काय कृती आराखडा आहे ? अशा प्रश्नांना कोणत्याही स्तरातील प्रशासनाकडून नकारात्मक उत्तरेच मिळत असल्याने ही परिस्थिती कधी सुधारणार हा प्रश्न अधांतरीच आहे. सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्याची गरज असून त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाचे प्रमाणही घटू शकेल. रिक्षासारख्या वाहनांच्या माध्यमातून होणाऱ्या वायुप्रदूषणाची तीव्रता दूर करण्यासाठी प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे. खाजगी वाहने विक्रीवरही निर्बंध आणणे गरजेचे आहे. पार्किंग करण्यासाठी उपलब्ध जागा पाहूनच वाहने खरेदी करण्याची परवानगी देणे गरजेचे आहे. घटनेने आपल्याला अप्रदूषित आणि स्वच्छ पर्यावरणाचा अधिकार दिला आहे. या अधिकाराचे, आपल्या पर्यावरणाचे, वन्यजीवांचे प्रत्येक राज्याने रक्षण करणे आवश्यक आहे. मात्र हा अधिकार आपल्याला मिळत आहे का, हा खरा प्रश्न आहे. या अधिकारांचे रक्षण आपण स्वतःही करत नाही हीदेखील वस्तुस्थिती आहे. प्यायला स्वच्छ पाणी नाही, हवेमध्ये वाढणारे प्रदूषणाचे प्रमाण, त्यातून उदभवणारे आजार असा भविष्यकाळ नको असेल तर या गोष्टी अखेर आपल्याच मुळावर येणार आहेत हे जाणवून आपण जागरुक होणे गरजेचे आहे. प्रदूषणाला आळा घालण्यासाठी महाराष्ट्रात प्रदूषण नियंत्रण महामंडळ अस्तित्वात आहे. मात्र या महामंडळाचे अस्तित्व व कार्य याबाबत मोठी साशंकताच आहे. त्यामुळे जनतेनेच प्रदूषणामुळे उद्भवणाऱ्या आपल्या आरोग्याबाबत जागरूकता दाखवणे गरजेचे आहे. प्रदूषण करणाऱ्या सर्वच बाबी मानवनिर्मित आहेत. निसर्गात होत असलेल्या सर्वच प्रकारच्या प्रदूषणास जबाबदार मनुष्यच आहे. त्यामुळे प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजनादेखील आपल्यालाच आखाव्या लागणार आहेत. वायू प्रदूषण कमी करण्यासाठी त्याला मुख्य कारणीभूत असलेल्या इंधनाला पर्याय वापरणे गरजेचे आहे. आज बेसुमार वाढलेली वाहने व त्यामुळे हवेत होत असलेले प्रदूषण दिवसेंदिवस वाढते आहे. त्यावर उपाय म्हणून सीएनजी, एलपीजी, इलेक्ट्रिक, सोलर अशा पद्धतीचे पर्याय पडताळून पाहावे लागणार आहेत. वाहन विक्रीवर शक्य तितके निर्बंध व सार्वजनिक वाहतूक सेवेचा अधिकाधिक वापर करण्यावर आपण भर द्यायला हवा. जेणेकरून वाहतूककोंडीतून अवास्तव वापरले जाणारे इंधन व त्यामुळे होणारे वायुप्रदूषण कमी होईल. त्याचबरोबर जलप्रदूषण हीदेखील आज प्रमुख समस्या बनली आहे. कारखान्यांतून जलाशयात सोडले जाणारे रसायन मिश्रीत पाणी व नागरी वसाहतींमधील सांडपाणी हे जलप्रदूषणाचे प्रमुख स्रोत आहेत. जलप्रदूषणाचा थेट फटका मानव, जलचर व वनस्पतींना बसत आहे. त्यामुळे शुद्ध पाणी व जलसाठे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपण समुदायिकरित्या पार पाडायला हवी. कर्णकर्कश आवाजाने निर्माण होणारे ध्वनी प्रदूषण आज सर्वच स्तरांतील लोकांची डोकेदुखी बनली आहे. वाहनांमुळे, फटाके, बांधकामे, विविध यंत्रसामग्री व सणांदरम्यान विविध वाद्यांमुळे होत असलेल्या ध्वनीप्रदूषणाने वाढणारी आवाजाची पातळी पशु, पक्षी, मानवाच्या ध्वनियंत्रणेवर विपरीत परिणाम करते. त्यामुळे प्रचलित नियमांचे पालन करून विविध माध्यमांद्वारे होत असलेल्या आवाजाच्या पातळीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारीदेखील आपलीच आहे. प्रदूषण कुठल्याही प्रकारचे असो त्याबाबत लोकांमध्ये जागरूकता नसल्याने व निरुत्साह असल्याने ते नियंत्रणासाठी म्हणावे तितके प्रयत्न होताना दिसत नाहीत. प्रदूषणामुळे उद्भवणाऱ्या समस्यांची भविष्यातील दाहकता अद्यापही लोकांना कळालेली नाही त्यामुळे त्याचे प्रमाण वाढतेच आहे. प्रदूषणाने आपली मर्यादा केव्हाच ओलांडली आहे त्यामुळे आजच आपण ते रोखण्यासाठी उपाय अंमलात आणले नाहीत तर भविष्यात माणसाचे जीवन ह्या मानवनिर्मित प्रदूषणाने असह्य होऊन जाईल एव्हढे मात्र नक्की.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
Comments
Post a Comment