सुरक्षेतील चुका सुधारायला हव्यात
- Get link
- X
- Other Apps
By
vaibhavpatil
-
संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना थेट लोकसभेत खासदारांच्या मध्ये जात दोन व्यक्तींनी स्मोक बॉम्बचा वापर करत सभागृहात हंगामा केला. संसदेत २२ वर्षांपूर्वीच्या २००१ मध्ये याच दिवशी संसदेवर दहशतवादी हल्ला झाला होता. त्या घटनेच्या आठवणी या निमित्ताने ताज्या झाल्या. प्रश्न आहे तो संसदेसारख्या देशाच्या सर्वोच्च वास्तूच्या सुरक्षेचा. एखादी गंभीर हल्ल्याची घटना घडल्यावर तेव्हढ्यापुरते कडेकोट उपाय केले जातात. मात्र काही दिवसानंतर पुन्हा ये रे माझ्या मागल्या ! ही पद्धत दिसुन येते. मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर देखील अशीच सुरक्षा व्यवस्था वाढविली होती मात्र सध्याची मुंबईची सुरक्षाही बेभरवशी आहे. संसदेत झालेला थरार हा एक प्रकारचा धडाच आहे. गाफील सुरक्षा यंत्रणांचा परिणाम किती मोठा होऊ शकतो व त्याने किती हाहाकार माजू शकतो हे दर्शवण्यासाठी हे एक उदाहरणच आहे. संसदेत कडक सुरक्षा व्यवस्था असते. सर्वसामान्य व्यक्तीला चार स्तरीय सुरक्षा व्यवस्थेतून जावे लागते. मोबाईल, बॅगा, पाकीट, चाव्या, कंगवा, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, बेल्ट अशा कुठल्याच वस्तुंना आत घेऊन जाता येत नाही. मग धूर सोडणारे फटाके घेऊन तरुण आत प्रवेश करतातच कसे हा एक मोठा प्रश्न आहे. त्यांना सदनाचे पास देणाऱ्या खासदारांचा हेतू देखील तपासला पाहिजे. सकृतदर्शनी हा काही मोठया संहारक कटाचा भाग नसल्याचे दिसून येत असले तरी त्या तरुणांच्या ह्या अनाठायी धाडसाचे समर्थन करता येणार नाही. देशाच्या संसदेची सुरक्षा जर सर्वसामान्य नागरिकांकडून भेदली जात असेल तर त्या देशाच्या सुरक्षेची स्थिती काय असेल याचा विचार व्हायला हवा. आज अनेक दहशतवादी व अतिरेकी संघटना व त्यांना समर्थन देणारे देश भारताला लक्ष करत असताना अशा प्रकारे सुरक्षा व्यवस्थेतील चूका वेळीच सुधारल्या नाहीत तर भविष्यात देशातील महत्वाच्या स्थळांवर मोठया हल्ल्यांची शक्यता नाकारता येणार नाही.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment