शिक्षण क्षेत्राला अशोभनीय प्रकार
- Get link
- X
- Other Apps
By
vaibhavpatil
-
माजी कुलगुरु डॉ. अशोक प्रधान यांच्यावर नुकताच घरात घुसून प्राणघातक हल्ला करण्यात आला. एखाद्या घटनेचा बदला घेण्यासाठी व्यक्ती कुठल्याही थराला जाऊ शकतो हे आपण गुन्हेगारीच्या अनेक प्रकरणांमध्ये पाहिले आहे. अगदी एखाद्याच्या घरी गुंड, टोळी नेऊन त्याला धमकवण्याचे, मारण्याचे प्रकारही दिसून आलेत. मात्र शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात असे प्रकार घडणे ही चिंतेची बाब आहे. मुळात शिक्षक हा शांत, शिस्तप्रिय, सहनशील घटक म्हणून गणला जातो. मात्र आपल्या निलंबनाचा बदला घेण्यासाठी घटनेच्या अनेक वर्षांनंतर आपल्या वरिष्ठाच्या घरी जाऊन हल्ला करणे शिक्षकी पेशाला अशोभनीय आहे. तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नही याने निर्माण झालेला आहे. माजी कुलगुरू अशोक प्रधान यांना मारहाण प्रकरणी, दोन हल्लेखोरांमध्ये बडतर्फ शिक्षकासह इतर आरोपींचाही समावेश आहे. प्रधान यांना बनावट पिस्तूलचा धाक दाखविणे, त्यांच्या पत्नीला फरफटत नेणे, त्यांना बांधून ठेवणे, पैशाची मागणी करणे असे प्रकार सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. त्यानुसार ज्येष्ठ नागरिक संरक्षण कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षणक्षेत्रात योगदान असणाऱ्या एका ऋषीतुल्य व्यक्तिमत्वावर हल्ला झाल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून शिक्षण व्यवस्थादेखील हादरून गेली आहे. शाळा, महाविद्यालये, विद्यापीठांमध्ये ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या अशा हल्लेखोर शिक्षकांकडून विद्यार्थ्यांनी काय धडे घ्यायचे ?
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment