जेष्ठ साहित्यीक प्रा डॉ राम नेमाडे सर
साहित्य व समाजसेवेचा वसा घेतलेले व्यक्तिमत्त्व
जेष्ठ साहित्यीक प्रा राम नेमाडे सर यांच्या निधनाची दुखःद बातमी मंगळवारी कानावर आली आणि धक्का बसला. प्रा नेमाडे सरांचा माझा परिचय केल्या दोनेक वर्षापूर्वीचा. त्यांच्या प्रत्यक्ष भेटीचा योग दोनदा आला. आमच्या जॉय संस्थेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात त्यांना हिरवे सरांनी प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित केले होते. त्यावेळी त्यांचे स्वागत करण्याचा व त्यांच्या हस्ते सन्मानित होण्याचा बहुमान प्राप्त झाला. दुस-यांदा आमचे मित्र अनंत बोरसे सर यांच्या शहापूर येथे आयोजित पूस्तक प्रकाशन समारंभादरम्यान सरांची भेट झाली. त्यावेळी त्यांना माझे आरोग्यमंथन भेट दिले. त्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी त्यांनी आवर्जुन फोन केला व पुस्तकातील अनेक लेख माहितीपूर्ण व विस्तृत असल्याची पोचपावतीही दिली होती. त्यानंतर काही न काही निमित्ताने सरांशी फोनवर बोलणे व्हायचे. आमच्या आरोग्य विभागाची दरमहा प्रकाशित होणारी आरोग्य पत्रिका त्यांना मी पाठवत होतो. सरांच्या निधनाची अचानक पडलेली बातमी ऐकून धक्का बसला व त्यांच्या सानिध्यातील क्षण आठवले. आगामी पुस्तकासाठी सरांची प्रस्तावना किंवा शुभसंदेश घेण्याचा माझा मानस होता जो पूर्ण होऊ शकला नाही. सरांच्या व्यक्तिमत्वाला साहित्यिक आणि समाजसेवक असे दोन पैलू होते. माझ्यासारख्या अनेक नवोदित कवी आणि लेखकांना सर मनापासून मार्गदर्शन करत.
प्रा. नेमाडे सरांची ओळख अवघ्या महाराष्ट्राला एक अभ्यासू, संवेदनशील, स्पष्ट व कडक शिस्तीचे साहित्यिक म्हणून आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. डोंबिवली येथे राहत असलेल्या प्राचार्य राम नेमाडे यांचा जन्म ८ एप्रिल १९४० रोजी शेतकरी मजूर कुटुंबात झाला. अकरावी पर्यत शिक्षण घेतल्यावर त्यांनी माध्यमिक शाळेत शिक्षकाची नोकरी स्विकारली. राष्ट्रभाषा पंडित व सीनियर हिंदी शिक्षक सनद ह्या पदव्या घेतल्या. पुढे बी.ए ऑनर्स पदवी संपादन करून रात्र कॉलेजातून पुणे विद्यापीठाचे एम.ए. व नियमित बी. एड प्रशिक्षण पदवी घेतली. मराठी, हिंदी भाषा अध्यापना बरोबरच निबंध, व्याकरण-लेखनाची पुस्तके प्रकाशित केली. त्यांचे 'ऋतुगंध,' हिरवा चाफा,' 'अभंग वारीचे- दुनियादारीचे,' 'माही लेवागणबोली आणि इतर कविता,' हे चार कविता संग्रह प्रकाशित झाले असून वृत्तपत्र, मासिकांतून कविता, लेख, कथा इ. लेखन सुरू होते. साहित्यिकांच्या पुस्तकांना प्रस्तावना, अभिप्राय देऊन प्रोत्साहित करण्याचे काम त्यांनी केले आहे. सामाजिक कार्यात ते यथाशक्ती योगदान देत होते. बर्याचशा सामाजिक व शैक्षणिक संस्थांना जात-पात असा भेदभाव न करता आर्थिक मदतही केली आहे. गरीब व होतकरू विद्यार्थी, क्रीडापटू, कलावंत यांना शिक्षणासाठी स्वतः शिष्यवृत्तीही त्यांनी प्रदान केल्या आहेत. डोंबिवली येथील लेवाभवन निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. जळगाव येथे झालेल्या पहिल्या लेवागणबोली साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष त्यांनी पद भूषविले. नुकत्याच पार पडलेल्या जादूटोणाविरुद्ध कायद्याच्या प्रबोधन यात्रेत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. पन्नास वर्षापासून जास्त शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रा डॉक्टर राम नेमाडे सरांच्या कार्यांची महती ही त्यांना आतापर्यंत मिळालेल्या शिक्षण महर्षी व अनेक राष्ट्रीय आणि आंतर्राष्ट्रीय पुरस्कारांवरून दिसून येते. थायलंड येथे 'प्राईड ऑफ नेशन' पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
नेमाडे सरांसारख्या जेष्ठ साहित्यीक, प्रोत्साहक, निडर व स्पष्ट वक्त्याचे निधन मनाला चटका लावणारे असून समाज व साहित्य क्षेत्राचे मोठे नुकसान करणारेही आहे.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
Comments
Post a Comment