ताण तणाव, राग, द्वेष, लोभ, चिडचिड कमी करण्याचा मार्ग - विपश्यना
मनाची स्थिरता मिळण्याचा प्रयास म्हणजे विपश्यना
आपल्या सर्वांच्या आयुष्यात केवळ दोनच गोष्टी महत्वपूर्ण असतात ज्यावर आपल्याला लक्ष केंद्रित करावे लागते. एक शरीर व दुसरे मन. शारीरिक स्वास्थ्यासाठी आपण व्यायाम, कसरत, चालणे, धावणे यासारखे उपाय अवलंबितो. आजकाल व्यायामशाळा, मॉर्निंग वॉक, मॅरेथॉन अशा विविध प्रकारांतून आपण आपले शारीरिक फिटनेस राखण्याचा प्रयत्न करतो. मात्र मनाच्या आरोग्याकडे कुणाचेही फार लक्ष जात नाही. आजकाल दररोजच्या नोकरी व्यवसायाच्या ताण तणावामुळे मनावरील भार प्रचंड वाढला आहे. त्याचा परिणाम मानसिक अस्थिरतेत होत आहे. त्यामुळे मानसिक स्थिरता मिळवण्याच्या विविध उपायांकडे अनेकांचा कल वाढतो आहे. यासाठी एक उत्तम व हुकमी इलाज आज प्रचलित आहे व तो म्हणजे विपश्यना धारणा म्हणजेच मेडिटेशन. श्वासाच्या गतीवर व अनापनेवर लक्ष केंद्रित करून त्यातून मनाची स्थिरता मिळवण्यासाठी केलेला प्रयास म्हणजे विपश्यना. याच विपश्यनेच्या माध्यमातुन अनेकांना लाभ होत असून मानसिक स्थिती परावर्तित करण्याची ताकत ह्या धारणेत असल्याचे सिद्ध झाले आहे. देशभरात अनेक ठिकाणी अशा प्रकारे विपश्यनेचे कोर्स चालवणाऱ्या संस्था कार्यरत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे ग्लोबल विपश्यना पॅगोडा. मुंबईतील गोऱ्हाई येथे सन २००९ पासून स्थित असलेला हा पॅगोडा म्हणजे एक अजूबाच आहे. हजारो प्रशिक्षणार्थी एकाच वेळेस बसून ध्यानधारणा करण्याची सोय या ठिकाणी आहे. हजारो स्केअर फुटच्या जागेत कुठल्याही पिलेरशिवाय निर्माण करण्यात आलेल्या ह्या पॅगोडाची निर्मिती वीट, सिमेंट असे काही न वापरता राजस्थानी दगडांच्या साहाय्याने ऐकमेकांच्या इंटरलॉकिंगच्या आधारे करण्यात आली आहे. विपश्यना ध्यानपद्धतीचे जागतिक कीर्तीचे बर्मी-भारतीय आचार्य श्री सत्यनारायण गोयंका यांच्या संकल्पनेतून विपश्यनेच्या माध्यमातून स्थिरता प्रदान करण्याच्या हेतूने या ठिकाणी पॅगोडाची निर्मिती केली गेली आहे. असे अनेक पॅगोडा जगभरात विविध ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत. मात्र सर्वाधिक उंचीचा, मोठा व अदभुत असा हा गोऱ्हाईचा पॅगोडा असून प्रत्येकाने तो पाहायलाच हवा. या ठिकाणी अनेक साधक १० दिवसांच्या व त्यापेक्षा कमी कालावधीची विपश्यना साधना शिकण्यासाठी सातत्याने येत असतात. तसेच याच धारणेवर आधारित विविध प्रकारची प्रशिक्षण शिबिरे देखील येथे आयोजिली जातात.
आमच्या कार्यालयाच्या वतीने राष्ट्रीय आयुष अभियान आणि विपश्यना रिसर्च इन्स्टिट्यूट, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १२ व १३ जानेवारी २०२४ रोजी Stress Management & Vipassana या विषयावर दोन दिवसीय प्रशिक्षण शिबीर या ठिकाणी संपन्न झाले. या शिबिरात आरोग्य सेवेत कार्यरत आयुक्तालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच रुग्णालयीन अधीक्षक, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करण्यासाठी आयकर विभागाच्या आयुक्त डॉ पल्लवी दराडे मॅडम, श्री शांताराम शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच डॉ साधना सवाई, डॉ बापू ओव्हाळ व सेवानिवृत्त अधिकारी डॉ यशवंत मुळे आणि डॉ मेश्राम यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आपले विपश्यना धारणेबद्दलचे अनुभव विषद केले. विपश्यना, आनापना तसेच तिहार जेलमध्ये विपश्यनेने घडविलेल्या बदलाबाबतचा व्हिडिओ याप्रसंगी दाखवण्यात आला. शाळांमधील मुलांसाठी मन एकाग्र करण्याच्या दृष्टीने या धारणेचा वापर अत्यंत उपयुक्त असल्याचे प्रशिक्षक शिंदे सरांनी सांगितले व त्यासाठी संस्थेच्या माध्यमातून "मित्र" नावाचा उपक्रम सुरू करण्यात आल्याचेही त्यांनी विषद केले. या स्तुत्य उपक्रमांतर्गत अनेक शाळांमध्ये काही मिनिटांची ध्यानधारणा विपश्यनेच्या माध्यमातून मुलांमध्ये बालवयातच रुजवण्यात येते ज्याचा लाभ मुलांना त्यांच्या उद्देशावर लक्ष केंद्रित करण्यासाठी होत असल्याचे दिसून आले आहे. त्याचप्रमाणे लोकसेवा, राज्यसेवा, सरळसेवा स्पर्धा परीक्षांची तयारी करणारी बहुतांश मुले अभ्यासावर एकाग्रता मिळवण्यासाठी विपश्यनेकडे वळत असल्याचे सनदी अधिकारी श्रीमती पल्लवी दराडे मॅडम यांनी सांगितले. एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर लोकसेवा आयोगाची तयारी करताना विपश्यनेचा खूप लाभ झाल्याचेही त्यांनी सांगितले. वैद्यकीय क्षेत्रातील अनेक डॉक्टर्स सध्या विपश्यनेचे लाभ व त्यातून आलेले अनुभव सर्वांसमोर मांडत ह्या पद्धतीचा विस्तार करण्यात मोलाचा हातभार लावत आहेत.
नाशिक येथील इगतपुरी, गोऱ्हाई, बेलापूर अशा ठिकाणी विपश्यनेचे वर्ग घेतले जातात व त्यासाठी कुठलेही शुल्क आकारले जात नाही. निवास, भोजन, प्रशिक्षण सर्व काही निशुल्क उपलब्ध केले जाते. त्यासाठी नोंदणी ऑनलाइन पद्धतीची असून प्रतीक्षा यादी पाहता अनेक महिने अगोदर नोंदणी करावी लागते. पॅगोडाचा परिसर अत्यंत सुंदर असून त्यामध्ये अनेक कलाकुसरीच्या व ऐतिहासिक वस्तूंची मांडणी सुंदर पद्धतीने करण्यात आलेली आहे. माणसाच्या आयुष्यातील ताण तणाव, राग, द्वेष, लोभ, चिडचिड यामुळे बिघडत असलेले मानसिक स्वास्थ्य पाहता विपश्यना हा उत्तम मार्ग सध्या आपल्यासमोर उपलब्ध आहे ज्याची वाट प्रत्येकाने चोखाळायलाच हवी. दोन दिवसांच्या प्रशिक्षण शिबिरात आम्हाला ह्या धारणेबद्दल अनेक नवनव्या गोष्टी शिकायला मिळाल्या ज्याचा लाभ दैनंदिन जीवनात नक्कीच होईल. सदर कार्यशाळेचे उत्तम संयोजन विपश्यना रिसर्च इन्स्टिट्यूट व प्रामुख्याने कोर्स समन्वयक श्रीमती शितल पाटील यांनी केले.
ग्लोबल विपश्यना पॅगोडाविषयी....
मुंबईतील सुप्रसिद्ध ठिकाण एस्सेल वर्ल्ड च्या बाजूलाच हा पॅगोडा आहे. पॅगोडा म्हणजे खरंतर, आपल्या भारतीय बौद्ध स्तुपाचेच एक वेगळे रूप. बौद्ध धर्म भारताबाहेर जसजसा आशिया खंडात पसरत गेला, तसतसे जपान, म्यानमार या ठिकाणी बुद्धांनी सांगितलेल्या विपश्यनेसाठी ध्यानधारणेसाठी विशिष्ट वास्तुविशेषांची निर्मिती केली गेली. भारतात ज्याप्रमाणे स्तूप, विहार निर्माण झाले, तसेच अन्यत्र पॅगोडांची निर्मिती झाली. भारतातील स्तूप घुमटाकार होते, परंतु अन्य देशांतील पॅगोडा आकाशाला गवसणी घालणारे उंच उंच. त्याच धर्तीवर मुंबईतील बोरिवलीत अरबी समुद्रातील गोराई खाडीत उभा राहिलेला हा ग्लोबल विपश्यना पॅगोडादेखील आकाशाला गवसणी घालणारा आहे. म्यानमारमधील श्वाडॅगन पॅगोडाची प्रतिकृती म्हणजेच हा ग्लोबल विपश्यना पॅगोडा. श्वाडॅगन पॅगोडाची उंची ३३० फूट आहे, तर ग्लोबल विपश्यना पॅगोडाची ३२५ फूट. दोघांचा सोनेरी रंग मात्र सारखाच आहे, लांबून पॅगोडा पाहताना सुवर्णमंदिराचा भास होतो, याचा घुमट अवकाशात घुसत असल्याचेदेखील भासते. त्यामुळेच गोराईचा हा पॅगोडा, केवळ मुंबईच नाही, जागतिक आश्चर्याचाच नमुना आहे. कारण फक्त दगडांपासून बांधण्यात आलेला हा जगातील सगळ्यात मोठा पॅगोडा आहे. तसेच हा डोम बांधताना कुठल्याही प्रकारच्या खांबांचा, अथवा लोखंड-स्टीलचा आधार घेण्यात आलेला नाही.
प्राचीन भारतीय वास्तुशैलीत ज्याप्रमाणे प्रचंड आकाराचे दगड केवळ खाचांनी एकमेकांशी जोडले जायचे, त्याचप्रमाणे दगड रचून हा डोम उभारण्यात आला आहे. विशेष म्हणजे मध्यभागी असलेला वजनदार डोम जमिनीपासून ९० फुटांवर असून त्याला कुठल्याही प्रकारचा आधार दिलेला नाही. ग्लोबल विपश्यना पॅगोडामध्ये बुद्धांच्या प्रतिमा इतक्या विलक्षण आहेत की त्यावरील तेज त्यांच्या जिवंतपणाची जाणीव करून देतात. या परिसरात अनेक मुर्त्या, प्रतिमा, बोधपर फलक, पवित्र असा पिंपळ वृक्ष, फळ व फुलझाडे, उद्याने असून त्याचे निरीक्षण करत आम्ही सभोवताली एक फेरफटका मारला. या ठिकाणी विपश्यना करण्यासाठी मोठे सेंटर असून त्या ठिकाणी विपश्यना करण्यासाठी जगभरातून अनेकजण येत असतात. दहा दिवसांचे विपश्यनेचे प्रशिक्षण वर्ग याठिकाणी भरत असून त्याची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने केली जाते. भारत आणि जगभरात प्रसिद्ध असलेले विपश्यनागुरू सत्यनारायण गोएंका यांच्या मार्गदर्शनाखालीच हे सेंटर उभारण्यात आले आहे. हा पॅगोडा सर्व जातिधर्माच्या लोकांसाठी खुला आहे. पॅगोडाचा परिसर इतका मनमोहक आहे की पाहताक्षणीच आम्ही त्याच्या मोहात पडलो. प्रवेशद्वारापाशी असलेली ८० मेट्रिक टन वजनाच्या मार्बलपासून बनवलेली बुद्धमूर्ती साडेएकवीस फूट उंचीची असून जाताक्षणीच लक्ष वेधून घेते. त्याशिवाय बोधिवृक्ष, अशोकस्तंभ, धम्मचक्र अशी बुद्धांशी संबंधित प्रतीकेही इथे पाहायला मिळतात. दरवर्षी लाखो लोक या ठिकाणाला भेट देतात. ग्लोबल विपश्यना पॅगोडाच्या कळसाची उंची साधारणतः ९९ मीटर इतकी आहे. या पॅगोडाचा घुमट २८० फूट व्यासाचा असून हा जगातील सर्वात मोठा डोम आहे. आजवर विजापूरचा इतिहासप्रसिद्ध गोल घुमट सगळ्यात मोठा ‘स्तंभविरहित घुमट’ म्हणून प्रसिद्ध होता, परंतु कुठलाही स्तंभ किंवा लोखंडाचा वापर न करता उभारण्यात आलेला ग्लोबल विपश्यना पॅगोडाचा डोम गोल घुमटापेक्षा तिप्पटीने मोठा आहे. डोमच्या बांधणीसाठी तब्बल २५ लाख टन बेसॉल्ट आणि जोधपुरी लाल दगडांचा वापर करण्यात आलेला असून त्यांच्या जोडणीसाठी इंटर लॉकिंग पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. या डोममध्ये एकाच वेळी तब्बल आठ हजार माणसे ध्यानधारणेला बसू शकतात.
निरनिराळ्या बॅचेसमध्ये इथे ऑनलाईन नोंदणीद्वारे विपश्यना वर्ग चालत असून प्रशिक्षणार्थीना इथे राहण्याची व जेवणाची सोय उपलब्ध आहे. निवासासाठी इथे अनेक खोल्यादेखील आहेत ज्याची स्वच्छता व व्यवस्था तारांकित हॉटेल्सला लाजवेल अशी आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी सर्व सेवा ही मोफत उपलब्ध करून दिली जात आहे. केवळ मर्जीने अथवा दानशूर व्यक्तींकडून सहाय्य स्वीकारले जाते. एका दिवसासाठी भेट देणाऱ्या पर्यटकांना पॅगोडा परिसर पूर्णपणे पाहता येतो ज्यासाठीदेखील कुठलेही शुल्क नाही. उद्यान, उपहारगृह यांचा गरजेनुसार वापर करता येतो. दहा दिवस कोर्स केलेले प्रशिक्षणार्थी कधीही या ठिकाणी एक दोन दिवसांसाठी येऊन ध्यानधारणा आनापणा करू शकतात.
मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात शांत, निसर्गरम्य असे हे विपश्यना केंद्र ध्यानधारणेसाठी व मनःशांतीसाठी उत्तम ठिकाण आहे. आज विविध आजारांनी ग्रस्त लोक औषधोपचाराने आपले शरीर बरेदेखील करतील मात्र मनाचे आजारपण दूर करण्यासाठी विपश्यनेपेक्षा चांगला पर्याय असू शकत नाही.
आते जाते सांस पर, रहे निरंतर ध्यान !
कर्मो के कटे बंधन, होय परम कल्याण !
वैभव मोहन पाटील
https://youtu.be/WaMFiizeJVE?feature=shared
https://youtu.be/4sGYzlQnT-U?feature=shared
https://www.dhamma.org/en/schedules/schpattana
https://schedule.vridhamma.org/courses/vipula
https://schedule.vridhamma.org/courses/vahini
https://www.dhamma.org/en/schedules/schvatika
https://schedule.vridhamma.org/courses/giri
https://youtu.be/mAtSIuTSx90?feature=shared
https://youtu.be/cJQwzN3hGwY?feature=shared
Comments
Post a Comment